रणजितसिंह नाईक निंबाळकर भेटले की काम होणारच!
कार्यकर्त्यांना ताकद देऊन रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यातील दीर्घ वर्चस्वाला आव्हान
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): नुकतीच अकलूजमध्ये भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण (पश्चिम) जिल्हा कार्यकारणीची बैठक पार पडली. मात्र अकलूजला आले आणि समस्या घेऊन आलेल्या प्रत्येक व्यक्तीला न भेटताच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर निघून गेले असे कधीच झाले नाही आणि होणारही नाही. बैठक पार पडल्यानंतर ते अकलूज गेस्ट हाऊसवर येऊन थांबले आणि शेवटच्या व्यक्तीला भेटूनच अकलूजहून मार्गस्थ झाले. कारण रणजितदादांनाही जनतेच्या समस्यांची जाणीव असते, आणि लोकांनाही रणजितदादा भेटले की काम होणारच! असा आत्मविश्वास असतो. आपल्या याच नेतृत्व कौशल्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी प्रस्थापितांच्या दीर्घ वर्चस्वाला आव्हान दिल्याचे दिसून येत आहे.
एकेकाळी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात ‘अकलूज म्हणजे मोहिते-पाटील आणि मोहिते-पाटील म्हणजे अकलूज’ असे समीकरणच जणू रूढ झाले होते. सत्ता, सहकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय यंत्रणेवर दीर्घकाळ प्रभाव असलेल्या या घराण्यासमोर स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करणे सोपे नव्हते. पण काळ बदलतोय, आणि त्या बदलाची चाहूल आता थेट मोहिते-पाटलांच्या बालेकिल्ल्यात अकलूजमध्ये जाणवू लागलीय. माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माढा लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही तालुक्यात गेले, तरी त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते आणि नागरिकांची होणारी गर्दी लक्ष वेधून घेते. कुणाच्या हातात अर्ज, कुणाकडे गावचा प्रश्न, कुणाचे शासकीय कार्यालयातील काम अडलेले, पण अपेक्षा एकच “एकदा दादांना भेटू; कायमचा प्रश्न मार्गी लागेल!” हीच प्रतिमा निंबाळकरांच्या राजकारणाची मोठी ताकद बनताना दिसते. या सगळ्यात सर्वाधिक लक्षवेधी घडामोड म्हणजे अकलूज परिसरातील रणजितदादांची कार्यकर्त्यांची मजबूत बांधनी… आजपर्यंत मोहिते पाटलांनी ठराविक लोकांनाच मोठे करून कार्यकर्ता म्हणजे फक्त सतरंजी उचलणाराच माणूस आहे असे चित्र निर्माण केले होते. परंतु रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सर्व स्तरातल्या कार्यकर्त्यांना ताकद देऊन मोठे करण्याचे काम केले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकलूजमध्ये बोलताना “गुंडगिरी, झुंडशाही आणि भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही” असा थेट इशारा दिला होता. त्यावर धैर्यशील मोहिते-पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत दबावाला भीक घालणार नसल्याचे म्हटले होते. यावरूनच मोहिते पाटलांची ‘दहशत’, ‘झुंडशाही’, ‘सत्तेचा दबाव’ किती होता हे दिसून येते. मार्च २०२५ मध्ये अकलूजमध्ये भाजपची शाखा सुरू करण्यावरून चेतन पवार नावाच्या तरुणाला मारहाण आणि तलवारीने धमकावल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले. एखाद्या गावात कोणत्या पक्षाची शाखा काढायची, कुणाचा झेंडा लावायचा आणि कोणत्या नेत्याचे काम करायचे यासाठीही कार्यकर्त्यावर मोहिते पाटलांची दंडेलशाही असेल तर ती लोकशाही कसली? एका बाजूला दीर्घकालीन सत्ता, परंपरागत संघटन आणि सहकारातून निर्माण झालेले राजकीय वर्चस्व आहे, तर दुसऱ्या बाजूला त्या व्यवस्थेबाहेर स्वतःचे राजकीय स्थान शोधणारे कार्यकर्ते आहेत. अशा कार्यकर्त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावून रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांना ताकद देत आपली मजबूत फळी विस्तारताना दिसतायत.