यशवंतनगर येथील जागेवर बेकायदेशीर कब्जा प्रकरणी अकलूज पोलिसांकडून दोघांना अटक
नागेश शिंदे व लक्ष्मण शिंदे यांना चार दिवसांची पोलिस कोठडी
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा डोक्यावर हात असल्याचे आरोपीचे वक्तव्य
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): न्यायालयात जमिनीचा वाद सुरू असताना न्यायालयाच्या निकालाची वाट पाहण्याऐवजी मध्यरात्री आणि पहाटेच्या अंधारात नागेश शिंदे व त्याच्या सहकाऱ्यांनी वादातील जागेवर बेकायदेशीर कब्जा केला होता. याबाबतची फिर्याद दिलीप सूर्याजी माने यांनी 21 जुलै 2026 रोजी दिली होती, परंतु आरोपी अटकेत नव्हते. मात्र सदरच्या आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यानंतर या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन व कलमामध्ये वाढ करून अकलूज पोलिसांनी नागेश शिंदे व लक्ष्मण शिंदे या दोघांना अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती फिर्यादीचे वतीने देण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी दिलीप सूर्याजी माने यांनी यशवंतनगर येथील चौधरी कॉम्प्लेक्स शेजारी जुना सर्व्हे क्रमांक 1/अ/2 आणि नवीन सर्व्हे क्रमांक 1/1/ब/प असलेला सहा गुंठ्यांचा भूखंड असल्याचे सांगितले असून, या मिळकतीसंदर्भात वसंत निवृत्ती माने, सुनंदा वसंत माने आणि धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात माळशिरस न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयात दावा सुरू आहे. तरीही 21 जुलैच्या घटनेपूर्वी रात्री सुमारे 2:00 वाजण्याच्या दरम्यान सदरच्या आरोपींनी संबंधित जागेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून तो प्रयत्न उधळून लावला होता. तरीही कायद्याला न जुमानता नागेश शिंदे व त्याच्या सहकाऱ्यांनी 21 जुलैच्या पहाटे पुन्हा त्या जागेवर कब्जा केला. या दरम्यान फिर्यादीला त्यांच्या व्यवस्थापकाने दूरध्वनी करून नागेश शिंदे यांनी भूखंडाचे गेट तोडून महिला-पुरुषांना आत घुसवले असून कामगाराला मारहाण झाल्याची माहिती दिली. त्यानंतर फिर्यादीने तातडीने 112 वर संपर्क साधून पोलिसांची मदत मागितली. सदरच्या जागेवर कब्जा करताना आरोपी नागेश शिंदे यांनी वॉचमन विठ्ठल माने याची गच्ची धरून पोटाला चाकू लावला, जीवे मारण्याची धमकी दिली आणि जागेचा कब्जा घेतल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. त्यानंतर तीन वाहनांमधून आणलेले लाकडी रॅक, किराणा माल व अन्य साहित्य मुख्य गेटचे कुलूप आणि गाळ्याचे शटर तोडून आत ठेवण्यात आल्याचाही आरोप आहे. एफआयआरमध्ये नागेश शिंदे, संजय साठे आणि त्यांच्यासोबत आलेल्या इतर व्यक्तींनी जबरदस्तीने प्रवेश करून अतिक्रमण व कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीचे म्हणणे नोंदविण्यात आले आहे. त्याचबरोबर जागेचा ताबा घेताना या प्रकरणाला जातीय रंग देण्यासाठी संबंधित दुकानात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची छायाचित्रे लावण्यात आली होती अशी माहिती फिर्यादीकडून समजते. ही छायाचित्रे कथित कब्जाच्या वेळीच जाणीवपूर्वक लावण्यात आली असल्याचे पुराव्यातून स्पष्ट झाले, तर त्यामागचा हेतू तपासणे अत्यंत आवश्यक ठरते. कारण हा मूळ वाद खासगी जमिनीच्या मालकी आणि ताब्याचा आहे. मग अचानक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा या वादात कशासाठी आणल्या गेल्या, हा प्रश्न उपस्थित होत आहे. जागेवर बेकायदेशीर कब्जा करणारे आणि या जागेप्रकरणी न्यायालयात दावा दाखल करणारे हे दोघेही मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे ताबेदाराने ते फोटो काढल्यास त्या कृतीला जातीय स्वरूप देऊन वेगळा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकला असता, अशी फिर्यादीला शंका होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे ही महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी इतिहासातील अत्यंत मोठी नावे आहेत. या महामानवांच्या प्रतिमा कोणाच्या खासगी जमीनवादातील हत्यार बनू नयेत. वॉचमनच्या म्हणण्यानुसार नागेश शिंदे यांनी त्यांना धमकावताना आपण या जागेचा कब्जा घेत असल्याचे सांगून “माझ्या डोक्यावर धैर्यशील मोहिते पाटलांचा हात आहे” असे म्हटल्याचा आरोप एफआयआरमध्ये नोंदविण्यात आला आहे, हा प्रकार खूप गंभीर आहे. ज्या जमिनीच्या न्यायालयीन वादात धैर्यशील मोहिते-पाटील यांचे नाव आहे, त्याच जमिनीच्या कब्जाच्या वेळी आरोपीच्या तोंडी त्यांच्या पाठबळाचा दावा असेल, तर त्या उल्लेखाची चौकशी करणे तपास यंत्रणेचे कर्तव्य ठरते. आता आरोपींना पोलीस कोठडी मिळाल्याने पोलिसांना या कथित घटनाक्रमाची साखळी उलगडण्याची संधी आहे. त्यामुळे या चार दिवसात काय काय बाहेर येतंय हे लवकरच समजेल.