Warning: include_once(/home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-content/mu-plugins/block-wpfm.php): Failed to open stream: Permission denied in /home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-settings.php on line 508

Warning: include_once(): Failed opening '/home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-content/mu-plugins/block-wpfm.php' for inclusion (include_path='.:/opt/alt/php84/usr/share/pear:/opt/alt/php84/usr/share/php:/usr/share/pear:/usr/share/php') in /home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-settings.php on line 508
पुणे पोलिस भरतीत 19 बोगस कुराश प्रमाणपत्रे; चौघांना अटक – Bandkhor News

LOADING...

 पुणे पोलिस भरतीत 19 बोगस कुराश प्रमाणपत्रे; चौघांना अटक
September 17, 2026

पुणे पोलिस भरतीत 19 बोगस कुराश प्रमाणपत्रे; चौघांना अटक

पुरुष ‘महिला गटात’, 60 किलोचा खेळाडू 90 किलोत! 1,500 प्रमाणपत्रे तपासाच्या रडारवर; 71 सरकारी नियुक्त्यांची चौकशी सरकारी पडताळणीची चाळणी फाटली कुठे?

पुणे (बंडखोर वृत्तसेवा): सरकारी नोकरी मिळविण्यासाठी लाखो तरुण वर्षानुवर्षे मैदानावर घाम गाळतात. कुणी अभ्यासाच्या खोलीत तारुण्य खर्च करतो, तर खरा खेळाडू पदकासाठी मैदानावर शरीर झिजवतो. अशा स्पर्धेत एखादा उमेदवार बनावट किंवा संशयास्पद क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारावर सरकारी नोकरीपर्यंत पोहोचत असेल, तर ती फक्त कागदपत्रांची फसवणूक राहत नाही ती प्रामाणिक उमेदवाराच्या हक्कावरची घुसखोरी ठरते. पुणे गुन्हे शाखेच्या तपासातून समोर येत असलेल्या कुराश क्रीडा प्रमाणपत्रांच्या प्रकरणाने आता हाच गंभीर प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा केला आहे.

तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार 2016 ते 2023 या कालखंडातील सुमारे 1,500 कुराश प्रमाणपत्रे तपासाच्या कक्षेत आली आहेत. 2023 नंतर महाराष्ट्र पोलीस आणि इतर सरकारी विभागांत नियुक्त झालेल्या 71 उमेदवारांनी अशा कुराश प्रमाणपत्रांचा वापर केल्याचा संशय तपासला जात आहे. प्रकरणाची राज्यव्यापी व्याप्ती लक्षात घेऊन विशेष तपास पथकही स्थापन करण्यात आले आहे. आतापर्यंत चार जणांना अटक झाली आहे. पण 71 जण दोषी ठरलेले नाहीत. 1,500 प्रमाणपत्रेही न्यायालयाने बनावट ठरवलेली नाहीत. हा पोलिसांचा सुरू असलेला तपास आहे. मात्र तपासात पुढे आलेल्या विसंगती इतक्या गंभीर आहेत की त्यांचा हिशोब सरकारला द्यावाच लागेल.

तपासात सापडलेल्या कथित स्पर्धा अभिलेखांमध्ये काही पुरुष उमेदवारांची नावे चक्क महिला गटातील विजेते म्हणून दिसत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एवढेच नाही, तर 60 किलोपेक्षा कमी वजनाच्या एका व्यक्तीला 90 किलो वजनी गटात खेळलेला आणि विजेता दाखविल्याचेही तपासात आढळल्याचे वृत्त आहे. काही विजेत्यांची नावे संबंधित स्पर्धेच्या सहभाग यादीतच नसल्याचेही समोर आले आहे. मग प्रश्न साधा आहे, खेळाडू मैदानावर उतरला नाही, सहभाग यादीत नाव नाही, तरी विजेतेपदाचा कागद तयार झाला कसा? आणि त्याहून गंभीर प्रश्न, असा कागद सरकारी नोकरीच्या पडताळणी प्रक्रियेतून पुढे गेलाच कसा? या प्रकरणातील आणखी एक विसंगती अक्षरशः कागदालाच बोलते करते. पोलिसांच्या तपासानुसार 2020, 2021 आणि 2022 मध्ये झाल्याचे दाखवलेल्या काही स्पर्धांच्या कागदपत्रांमध्ये ‘धाराशिव’ हे नाव वापरले गेले आहे. प्रत्यक्षात उस्मानाबादचे अधिकृत नामांतर 2023 मध्ये झाले. तसेच 2019, 2021 आणि 2022 मधील कथित स्पर्धांच्या कागदपत्रांत ‘छत्रपती संभाजीनगर’ असा उल्लेख असल्याचे तपासात आढळले; त्या काळात जिल्ह्याचे अधिकृत नाव औरंगाबाद होते.

म्हणजे कागद जर खरोखर त्याच वर्षी तयार झाला असेल तर त्याला भविष्यात होणारे नामांतर कसे माहीत? हा केवळ टंकलेखनाचा प्रश्न आहे की जुनी तारीख दाखवून नंतर कागदपत्रे तयार झाली? याचे अंतिम उत्तर फॉरेन्सिक आणि पोलीस तपासातूनच यायला हवे.

तपासातील आणखी गंभीर दावा असा आहे की, काही तालुका आणि जिल्हास्तरीय स्पर्धा प्रत्यक्ष झाल्याचा पुरावा सापडत नसताना थेट राज्यस्तरीय प्रमाणपत्रे जारी करण्यात आली.

काही सहभाग याद्या स्पर्धा झाल्यानंतर तयार झाल्याचा संशय आहे. काही कागदपत्रांवर त्या काळात संबंधित पदावरच नसलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे किंवा स्वाक्षऱ्या असल्याचेही तपासात समोर आले आहे. जर हा तपास पुढे पुराव्यांनी सिद्ध झाला तर प्रश्न केवळ “बनावट प्रमाणपत्र कोणी बनवले?” एवढा राहणार नाही. तर कागदावर स्पर्धा उभी करण्याची संपूर्ण व्यवस्था कोणी तयार केली? असा प्रश्न उपस्थित होतो. या प्रकरणातील एक विलक्षण तपशील तपासाची दिशा दाखवतो. कुराश प्रमाणपत्रांच्या आधारे नियुक्त झालेल्या काही उमेदवारांना पोलिसांनी प्रत्यक्ष मैदानावर बोलावून खेळाबद्दल प्रश्न विचारले आणि त्यांचे कौशल्य तपासले. ते खेळायला कधी लागले? कोणत्या स्पर्धेत खेळले? कोणाविरुद्ध लढले? कोणते पदक मिळवले? त्यानंतर प्रत्यक्ष कुराश खेळाडूसोबत सामना करण्यास सांगण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार काही उमेदवारांच्या या व्यावहारिक चाचण्यांचे निष्कर्ष समाधानकारक नसल्यामुळे संशय आणखी बळावला. पुणे पोलिसांच्या 104 क्रीडा जागांपैकी 19 कुराश प्रमाणपत्रधारक या प्रकरणाचा पुणे पोलीस भरतीशी असलेला संबंध अधिक गंभीर आहे. उपलब्ध माहितीनुसार पुणे पोलीस दलातील क्रीडा प्रवर्गाच्या 104 जागांपैकी 19 उमेदवारांनी कुराश प्रमाणपत्रे सादर केली होती. त्यापैकी 10 जण सेवेत दाखल होऊन प्रशिक्षण घेत आहेत, तर नऊ जण अद्याप रुजू झालेले नाहीत.

महाराष्ट्र शासनाने गुणवंत खेळाडूंना सरकारी, निमसरकारी आणि संबंधित सेवांमध्ये 5 टक्के आरक्षण दिले आहे. क्रीडा विभागाच्या अधिकृत माहितीनुसार या योजनेतून आतापर्यंत 4,949 खेळाडूंना अ, ब, क आणि ड गटातील विविध सरकारी नोकऱ्यांचा लाभ मिळाला आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रावीण्य हे या आरक्षणाचे मूलभूत तत्त्व आहे. म्हणून कुराश प्रकरणाचा सर्वांत मोठा बळी शासन नाही. खरा बळी तो प्रामाणिक खेळाडू आहे ज्याने वर्षानुवर्षे सराव केला, स्पर्धा खेळल्या, दुखापती सहन केल्या आणि पदक मिळवले. पण त्याच्यापुढे संशयास्पद प्रमाणपत्रधारक गेला असेल. असे प्रत्यक्ष घडले आहे का आणि किती प्रकरणांत घडले, हे तपासातून निश्चित झाले पाहिजे. तपासात सुमारे 2016 ते 2023 या काळातील प्रमाणपत्रे समोर येत आहेत. मग सात वर्षे प्रश्न विचारला गेला नाही? स्पर्धा कुठे झाली याची पडताळणी नव्हती? सहभाग यादी तपासली नाही? राज्य संघटनेची राष्ट्रीय संघटनेशी संलग्नता पडताळली नाही? खेळाडूचा निकाल, वजनगट, लिंग, स्पर्धेची तारीख आणि आयोजक यांची माहिती एका केंद्रीकृत यंत्रणेत तपासली जात नव्हती? जर प्रत्येक प्रमाणपत्र स्वतंत्र कागद म्हणून पाहिले गेले आणि मूळ स्पर्धेच्या नोंदीशी त्याची संगणकीय सांगड घालण्याची व्यवस्था नसेल, तर बनावट प्रमाणपत्रांसाठी ती मोठी प्रशासकीय पोकळी ठरते.

या प्रकरणात महाराष्ट्र राज्य कुराश संघटनेशी संबंधित असल्याचे सांगितल्या गेलेल्या अंकुश नागर आणि शिवाजी साळुंखे यांना आधी अटक झाली. त्यानंतर कोल्हापुरातील क्रीडा अकादमी चालवणाऱ्या श्रुती पुनगावकर आणि धैर्यशील पुनगावकर यांना पुणे गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडील कागदपत्रे आणि इतर पुराव्यांचा तपास सुरू आहे.

चार अटक म्हणजे प्रकरण संपले नाही. पोलिसांकडून 71 सरकारी नियुक्त्यांची पडताळणी सुरू असून यामध्ये पोलीस व इतर सरकारी विभागांचा समावेश आहे. तपास अधिकारी अ आणि ब गटातील पदांसाठी एमपीएससी मार्फत झालेल्या नियुक्त्यांमध्येही अशा प्रमाणपत्रांचा वापर झाला का, याची चौकशी करत असल्याचे वृत्त आहे. 2016 ते 2026 या दशकात 5 टक्के क्रीडा आरक्षणातून झालेल्या नियुक्त्यांमध्ये प्रत्येक मान्यताप्राप्त खेळातील प्रमाणपत्रांचे नमुना लेखापरीक्षण करण्याची गरज आहे.

खेळाडूचे नाव, जन्मतारीख, स्पर्धा, आयोजक संस्था, संलग्नता, निकालपत्र, सहभाग यादी, पदक आणि प्रमाणपत्र क्रमांक हे सर्व एका डिजिटल नोंदीत जुळले पाहिजे. त्यानंतरच खरा खेळाडू आणि बनावट कागद यात फरक करता येईल. कुराश प्रमाणपत्र प्रकरण हे चार आरोपी, 71 नियुक्त्या किंवा 1,500 संशयित प्रमाणपत्रांपुरते मर्यादित नाही. हा महाराष्ट्राच्या 5 टक्के क्रीडा आरक्षणाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. मैदानावर रक्त-घाम गाळणारा खेळाडू एका गुणासाठी झगडतो. आणि त्याच्यासमोर जर कागदावर तयार झालेला “विजेता” सरकारी नोकरी घेऊन गेला असेल तर ती केवळ फसवणूक नाही, तो खऱ्या खेळाडूच्या घामावर टाकलेला डाका आहे. म्हणून सरकारने 2016 ते 2026 या काळातील संशयित प्रमाणपत्रांची स्वतंत्र लेखापरीक्षण मोहीम राबवावी. 71 नियुक्त्यांचा विभागनिहाय तपशील, प्रमाणपत्र पडताळणी करणाऱ्या कार्यालयांची नावे आणि प्रत्येक संशयित प्रमाणपत्राची अंतिम स्थिती सार्वजनिक करावी. कारण आता प्रश्न एका खेळाचा राहिलेला नाही. खेळ कागदावर झाला असेल, तर नोकरी सरकारात पोहोचली कशी? हा प्रश्न महाराष्ट्र सरकारने, क्रीडा संचालनालयाने आणि भरती करणाऱ्या प्रत्येक विभागाने उत्तर दिले पाहिजे असे पोलिस क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंतून बोलले जात आहे.

Prev Post

मोहिते पाटलांच्या उपनगराध्यक्ष पदाच्या वादामुळे…

Next Post

रणजितसिंह नाईक निंबाळकर भेटले की…

post-bars

Leave a Comment