मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त बोलणाऱ्या धवलसिंह मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल करा!
मुस्लिम बांधवांतून संतप्त प्रतिक्रिया; दबक्या आवाजात गुन्हा दाखल करण्याचा सूर
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): स्वयंघोषित धर्मरक्षक धवलसिंह मोहिते पाटील यांनी मुस्लिम समाजाला “लांड्या” संबोधत विविध आक्षेपार्ह वक्तव्ये करीत धर्मनिरपेक्ष देशात जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण केली आहे. त्याचबरोबर कलम २५ ला थेट आव्हान देऊन राष्ट्रविरोधी भावना भडकाविण्याबरोबरच अंसवैधानिक भाषेचा वापर केला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन विविध कलमाअंतर्गत त्यांचेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुस्लिम बांधवांसह संविधानप्रेमी नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
ब्रम्हागांव याठिकाणी चिरंजीवी बजरंगबलीच्या मूर्तीची विटंबना झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. एखाद्या देवाची विटंबना होत असेल तर ती घटना निंदनीयच! मात्र एखाद्यामुळे पूर्ण समाजाला, धर्माला भरडणे अयोग्य आहे. धवलसिंह मोहिते पाटलांनी उमापूर, ता. गेवराई, जि. बीड याठिकाणी आयोजित केलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात बोलताना आपल्या भाषणाची सुरूवातच “लांड्यांनी” अशी करून असंवैधानिक शब्दांचा भडीमार केला आहे. कलम १९ (१) (A) प्रत्येक नागरिकाला भाषण स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यानुसार धवलसिंह मोहिते पाटील यांनाही आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु कलम १९ (२) नुसार ८ कारणांसाठी वाजवी निर्बंध लादलेले आहेत. त्यापैकी धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वक्तव्यांबाबत ३ कारणे येथे लागू होतात.
(A) सार्वजनिक सुव्यवस्थाः या निकषानुसार “हिंदूंच्या जीवावर जगणारी बांडगुळं छाटायची वेळ आली”, “डोळे काढायचे” Ramji Lal Modi Vs State of UP, 1957: धर्माच्या आधारे हिंसेला चिथावणी देणे = Public Order भंग.
(B) नीतिमत्ताः या निकषानुसार “लांड्या”, “गाढवांचा नांगर फिरवला” ही भाषा सार्वजनिक नीतिमत्तेच्या विरूध्द आहे.
(C) भारताची एकता व अखंडताः या निकषानुसार “महात्मा गांधी पाकिस्तानचे बाप”, “संविधानाचे नंतर बघू” Kedar Nath Singh Vs State Of Bihar, 1962: राष्ट्रविरोधी भावना भडकावणे.
सर्वोच्च न्यायालयाचा दंडकः Shreya Singhal Vs Union Of India, 2015: भाषण स्वातंत्र्याला महत्व आहे, पण “Clear and present danger” असेल तर १९ (२) लागू होतो.
कलम २५ नुसार सर्व व्यक्तिंना सद्सद्विवेक बुध्दीनुसार धर्म स्वीकारण्याचा, आचरण्याचा व प्रसार करण्याचा अधिकार आहे. मात्र धवलसिंह मोहिते पाटील यांनी “लांड्यांसमोर शेपूट हलविण्याचे काम काही पुढारी करीत आहेत” असे वक्तव्य करून इतर धर्मियांच्या राजकीय सहभागावर टीका केली आहे. तसेच “आधी डोळे काढायचे, संविधानाचे नंतर बघू” असे वादग्रस्त वक्तव्य करून धवलसिंह मोहिते पाटलांनी थेट कलम २५ ला आव्हानच दिले आहे.
S. R. Bommai Vs Union of India, 1994: Secularism हा संविधानाचा मूलभूत ढाचा आहे. त्यामुळे धर्माच्या नावावर राजकारण करणे म्हणजे Secularism चा भंगच आहे.
कलम १५ (१) नुसार भेदभावास मनाई आहे. राज्य, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यांपैकी कोणत्याही कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव करता येत नाही. परंतु धवलसिंह मोहिते पाटील यांनी मुस्लिम समाजाला सामूहिकरित्या “लांड्या”, “बांडगुळं” असं संबोधून धर्माच्या आधारे कलंकित केले आहे. हे कृत्य १५ (१) च्या विरूध्द आहे.
कलम ५१ ए (ई) नुसार धार्मिक, भाषिक भेदांच्या पलीकडे जाऊन बंधुता वाढवणे. मात्र “लांड्या” हा शब्द बंधुता तोडतो.
कलम ५१ ए (एच) नुसार वैज्ञानिक दृष्टीकोन, मानवतावाद, सुधारणेची वृत्ती. मात्र “संविधानाचे नंतर बघू” ही असंवैधानिक वृत्ती आहे.
कलम ५१ ए (आय) नुसार सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, हिंसाचाराचा त्याग करणे. परंतु “डोळे काढायचे” हे वक्तव्य हिंसेला चिथावणी देणारे आहे.
AIIMS Students Union Vs AIIMS, 2001: मूलभूत कर्तव्ये न्यायालयात थेट लागू करता येत नाहीत, पण कायद्याचा अर्थ लावताना मार्गदर्शक ठरतात. कलम १४ नुसार राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. मुस्लिम नागरिकांनाही इतरांइतकेच सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. मात्र धवलसिंह मोहिते पाटलांनी “गाढवांचा नांगर फिरवला” म्हणणे ही कलम १४ च्या विरूध्द सामूहिक बदनामी आहे.
वास्तविक पाहता धवलसिंह मोहिते पाटील यांच्या या वक्तव्यांवरून त्यांचेवर बीएनएस कलमाअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.
मुस्लिम समाजाबद्दल लांड्या, बांडगुळं छाटायची अशी वादग्रस्त वक्तव्ये करून धर्माच्या आधारे दोन गटांत शत्रुत्व वाढविल्याबद्दल बीएनएस कलम १९६, धार्मिक भावना दुखावल्याबद्दल बीएनएस कलम २९९, द्वेष निर्माण करणारी वक्तव्ये केल्याबद्दल बीएनएस कलम ३५३ (२), शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान केल्याबद्दल बीएनएस कलम ३५२, महात्मा गांधी यांना पाकिस्तानचे बाप म्हणून त्यांची बदनामी केल्याने बीएनएस कलम ३५६ यांसह विविध कलमाअंतर्गत धवलसिंह मोहिते पाटील यांचेवर गुन्हा दाखल होऊ शकतो. मात्र मुस्लिम समाज हा अल्पसंख्यांक असल्याने तो दहशतीखाली जगत आहे, आपल्या धर्माबद्दल धवलसिंह मोहिते पाटील इतकी खालची पातळी गाठूनही ते उघडपणे त्यांच्या विरोधात मैदानात उतरायला घाबरत आहेत. म्हणूनच ते याप्रकरणी दबक्या आवाजात संताप व्यक्त करीत आहेत. दरम्यान पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी धवलसिंह मोहिते पाटील यांचेवर वरील कलमांसह कठोर कारवाई करावी अशा दबक्या आवाजात मुस्लिम सामाजासह संविधानप्रेमी लोकांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.