अदृश्य शक्तीचा नव्हता कहर; हा तर होता ‘वसंता’चा बहर!
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): सोलापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राजेंद्र राऊत हे ३६५ मतांनी विजयी झाल्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे आमच्या अदृश्य शक्तीनं १०० मतं खेचून आणली असे म्हणत आहेत. परंतु आमदार राजेंद्र राऊत यांच्या म्हणण्यानुसार मोहिते पाटलांच्या घरातील उमेदवार असता तर तीनही मतं मिळाली नसती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना मिळालेली ११८ मतं ही त्यांच्या निगर्वी स्वभावामुळे त्यांनी जोडलेल्या वैयक्तिक रिलेशनमुळे मिळाली आहेत. त्यामुळे जो अदृश्य शक्तीचा प्रपोगंडा राबवला गेला त्या अदृश्य शक्तीचा या निवडणुकीत नव्हता कसलाही कहर, इथे होता फक्त वसंताचा बहर अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.
माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी मोहिते पाटलांच्या विरोधात बंड केल्यानंतर मोहिते पाटील हे विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत असे म्हटले होते ते बरोबरच आहे. मोहिते पाटलांनी २००९ पर्यंत फक्त आत्मकेंद्रीच राजकारण केले आहे. पण जेव्हा ते एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी देतात तेव्हा एकतर त्यांना धोका असतो, किंवा नाईलाज तरी असतो. सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत त्यांना समोर धोका दिसत असल्यामुळेच मोहिते पाटलांनी वसंतराव देशमुख यांना उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला. रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधानपरिषद संपण्यापूर्वीच त्यांना पुन्हा एकदा विधानपरिषदेवर संधी मिळावी म्हणून शिवरत्नवरील मोहिते पाटलांनी जीवाचे रान केले. कधी वर्षा बंगल्यासमोर ठिय्या मांडला, तर कधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याचे उंबरठे झिजवले. पण शेवटी मोहिते पाटलांची स्वहितासाठी दलबदलूपणाची भूमिका पाहून महायुतीने रणजितसिंह मोहिते पाटलांना कात्रजचा घाट दाखवला. त्यानंतर पक्षप्रमुख शरद पवारांनी सोलापूर विधानपरिषद निवडणूक लढवावीच लागेल असे फर्मान सोडल्यानंतर मोहिते पाटलांनी वसंतराव देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान याठिकाणी उमेदवार विजयी होण्याचे संकेत दिसले असले तर मोहिते पाटलांनी आपल्याच घरात कुणाला तरी उमेदवारी दिली असती. परंतु त्यांना समोर पराभव फिक्स दिसत होता. याठिकाणी भाजपाने वसंतराव देशमुख यांचा दारूण पराभव केलेला असतानाही ‘नाक नाही, पण भोक आहे’ या म्हणीप्रमाणे आमचा उमेदवार पडला असला तरी आम्ही ही निवडणूक लावून लोकशाही टिकविल्यामुळे समाधानी आहे असे खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तिन्ही आमदार गेल्यानंतरही खासदार धैर्यशील मोहिते पाटील एकाकीपणे लढत होते असे म्हणून त्यांचेवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला जात आहे. हा स्तुतीपाठकांचा उपक्रम त्यांना लखलाभ असो.
सत्तेपुढं शहाणपण चालत नाही अशी एक म्हण आहे ती अगदी खरी आहे. आज सत्तेत भाजपा पक्ष असला तरी १७ वर्षांपूर्वी जो तुमचा ताल होता तसा तरी मोहिते पाटलांना आव्हान देणाऱ्या त्रिमूर्तींचा ताल नाही. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार रामभाऊ सातपुते हे मोहिते पाटलांनी उध्वस्त केलेल्या लोकांना ताकद देत आहेत. त्यांच्या जुलमी अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवून दबलेल्या, पिचलेल्या, दहशतीखाली वावरणाऱ्या लोकांना लढण्यासाठी बळ देत आहेत. मोहिते पाटलांनी सत्तेचा गैरवापर करून जनतेला आंधळे, मुके व बहिरे बनवले होते. एखाद्याने त्यांच्या विरोधात आवाज उठवला तर खोट्या केसेस करून तो आवाज दाबला जात होता. तर एखादा कार्यकर्ता जास्त वळवळ करायला लागला तर आपल्या गुंडांमार्फत त्या कार्यकर्त्याला मारहाण केली जात होती. वेळप्रसंगी मोहिते पाटलांनी आपल्याला वरचढ ठरणाऱ्या कार्यकर्त्यांचे खूनही केल्याची चर्चा आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या सत्ताकाळात दहशतीच्या जोरावर अनेकांच्या घरादारांची राखरांगोळी केली आहे. आपल्या कर्माच्या भोगामुळे सध्या मोहिते पाटलांचे राजकीय अस्तित्व संपल्यातच जमा आहे, पण आता जे काही अस्तित्व आहे ते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांच्या पुण्याईमुळेच आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील लोकशाही टिकविण्यासाठी निवडणुका होणे गरजेचे आहे असे आता म्हणत आहेत. त्यांचे हे वक्तव्य पाहून ते लोकशाहीवादी कधीपासून झाले? असा आम्हाला प्रश्न पडला आहे. कारण हेच धैर्यशील मोहिते पाटील अकलूज ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जंग जंग पछाडून प्रतिस्पर्धी उमेदवारांना आपल्या कार्यकर्त्यांमार्फत उचलून नेत होते. मग यांना हुकूमशाहीबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? जोपर्यंत मोहिते पाटलांकडे एकहाती सत्ता होती तोपर्यंत त्यांनी जनतेला छळण्याचेच काम केले आहे. यांच्या दहशतीमुळे कित्येकजण अकलूज शहर सोडून निघून गेले. पण आज तेच पीडित लोक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्याकडे आशेने बघत आहेत.
लोक नेहमी उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या सूर्याला नाही. तेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तिन्ही आमदारांनी केले. आपल्या मतदारसंघाला भरभरून निधी मिळावा म्हणून त्यांनी भाजपाला मदत केली. पण आमचे आमदार तिकडे गेले, असा गळा काढणाऱ्या मोहिते पाटलांनी यापूर्वी आमदार पळवले नव्हते का? सध्याची मोहिते पाटलांची राजकीय स्थिती पाहता आपल्या कर्तृत्वहीनतेमुळेच त्यांची राजकीय अधोगती झालेली आहे. पूर्वी मोहिते पाटलांच्या दहशतीमुळे अकलूजसह परिसरातील लोक तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत असत. पण आता रामभाऊ सातपुते यांच्या रूपाने माळशिरस तालुक्याला प्रस्थापित मोहिते पाटलांच्या विरोधात लढणारा आक्रमक चेहरा मिळाल्याने मोहिते पाटलांच्या दहशतीखाली वावरणारे लोक आता बोलू लागले, अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवज उठवू लागले. अकलूजमधूनही अनेकजण मोहिते पाटलांसमोर दंड थोपटू लागले. राजकारणात कधीही काहीही घडू शकते याचा विचार करून मोहिते पाटील पुन्हा आपणांसाठी सत्तेची दारे खुली होतील या आशेवर आहेत. मात्र माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार रामभाऊ सातपुते या त्रिमूर्तींनी मोहिते पाटलांची राजकीय नसबंदी करण्याचा जणू विडाच उचलला आहे. वसंतराव देशमुख यांना आपल्या वैयक्तिक हितसंबंधामुळे निदान ११८ तरी मतं मिळाली. मोहिते पाटलांच्या घरातील उमेदवार असता तर या त्रिमूर्तींनी मतांचे अर्धशतकही पूर्ण होऊ दिले नसते असा सूर राजकीय जाणकारांतून निघत आहे.