अकलूजची वाटचाल परिवर्तनाच्या दिशेने !
अकलूज नगरपरिषदेची पहिलीच निवडणूक भाजपा-शिवसेना, महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट-आरपीआय (आठवले) अशी तिरंगी लागली होती. मात्र खासदार धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्याच लढतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण दोघांचे एकमेकांवर होत असलेले आरोप-प्रत्यारोप! अकलूज नगरपरिषद निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर २०२५ रोजी हाती येईल. या निवडणुकीत कमळ फुलेल, तुतारीचा निनाद घुमेल की घड्याळाची टिकटिक वाढेल हे निकालाच्या दिवशी कळेलच. मात्र यानिमित्ताने अकलूजची वाटचाल सरंजामशाहीकडून लोकशाही मूल्ये रूजवत परिवर्तनाच्या दिशेने सुरू असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या ४५ वर्षांपासून अकलूजकरांवर मोहिते पाटलांच्या सत्तेची दहशत होती. दिवस उगवल्यानंतर तो मावळतीला जातोच हा निसर्गाचा अलिखित नियमच आहे. त्याच पद्धतीने जो सत्ताधीश होतो तो काय मरेपर्यंत आपल्या डोक्यावर सत्तेचा राजमुकुट घेऊन जन्माला येत नाही. जनतेच्या विद्रोहामुळे सत्ताधीशाला कधी ना कधी आपल्या सत्तेला मुकावेच लागते. किंवा एखादा परिवर्तनवादी लीडर कधी येतोय याची जनता आतुरतेने वाटच पहात असते. कारण ती सत्ताधीशांच्या जुलमी व्यवस्थेने पिचलेली असते. या पिचलेल्या जनतेला रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून एक लढवय्या, आक्रमक चेहरा मिळाल्याने अकलूजकरांनी त्यांचेवर विश्वास टाकायला सुरूवात केलेली दिसत आहे. जयसिंह मोहिते पाटील यांनी जेव्हा सुमित्रा पतसंस्थेच्या माध्यमातून जनतेला उध्वस्त करायला सुरुवात केली तेव्हा मोहिते पाटलांच्या विरोधात विद्रोहाची ठिणगी पेटायला सुरुवात झाली होती. या ठिणगीने तापलेल्या तव्यावर उत्तमराव जानकर यांनी आपली पोळी भाजून घेण्यास सुरुवात केली. माळशिरस तालुक्यातील कट्टर मोहिते पाटील विरोधक म्हणून उत्तमराव जानकर यांनी महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली. मात्र अखेर आमदारकीच्या अतृप्त इच्छेखातर त्यांनी त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या जयसिंह मोहिते पाटील यांचे बुटासकट पाय धरले हे माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी लोकांना पटले नाही. माढा लोकसभा मतदारसंघातून खासदारकी पटकाविण्यासाठी जशी आमदार उत्तमराव जानकर यांना सोबत घेणे ही शिवरत्नवरील मोहिते पाटील यांची गरज होती तशीच माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्यासाठी जानकरांना या मोहिते पाटलांची गरज होती. तरीही प्रचारसभेत बोलताना जयसिंह मोहिते पाटील यांनी उत्तमराव जानकर जेव्हा आम्हाला शरण आले तेव्हा आमदार झाले असे म्हणून त्यांचा स्वाभिमान पायदळी तुडवला. असो. मोहिते पाटील विरोधक म्हणून ३५ वर्षे काम करणारे उत्तमराव जानकर यांनी आपल्या आमदारकीसाठी मोहिते पाटलांशी जुळवून घेतले तरीही जनता त्यांच्या पाठीमागे गेली नाही. या मोहिते पाटील विरोधक असलेल्या जनतेने मोहिते पाटलांच्या विरोधात आक्रमकपणे लढणाऱ्या रामभाऊ सातपुते यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली. म्हणजेच मोहिते पाटील विरोधी चेहऱ्याची रिप्लेसमेंट झाली. उत्तमराव जानकरांचाही संघर्ष अंगावर काटे आणणारा आहे. परंतु त्यांनी आमदारकीसाठी जयसिंह मोहिते पाटलांच्या बुटासकट पाया पडलेले माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी जनतेला आवडले नाही. मात्र वेळप्रसंगी कुठलीही किंमत मोजेन, पण मोहिते पाटलांसमोर कधीही झुकणार नाही ही भूमिका घेतलेल्या रामभाऊ सातपुते यांच्या आक्रमक, स्वाभिमानी व लढवय्या भूमिकेने त्यांनी सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. रामभाऊ सातपुते यांनी कुणाच्याही वशिल्याशिवाय केलेल्या हजारो लोकांच्या कामांनी जनतेला भुरळ पाडली आहे. म्हणूनच अकलूजकरही त्यांच्याकडे आकर्षित झाले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रामभाऊ सातपुते यांचा पराभव होऊनही खचून न जाता त्यांनी माळशिरसमध्ये सक्रीय राहून जनतेचे विविध प्रश्न सोडविण्यावर भर दिला. त्याचबरोबर अकलूजमधील लोकांना विश्वासात घेऊन नगरपरिषद निवडणुकीसाठी पूर्ण ताकद लावली. यासाठी सर्वप्रथम त्यांनी अकलूजमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत केले. तसेच सत्तेच्या माध्यमातून त्यांनी अकलूजमधील कार्यकर्त्यांना सर्वतोपरी ताकद दिली. तर जयसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विविध संस्थांमध्ये केलेल्या घोटाळ्याबद्दल आक्रमक पवित्रा घेऊन पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी या पीडितांसोबत राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे अकलूजमधील जनतेलाही रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून आशेचा किरण दिसू लागला. एकट्या रामभाऊ सातपुते यांनी अकलूज नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार करताना प्रत्येक प्रभागातील एक ना एक घर पिंजून काढले. त्यामुळे शिवरत्नवरील मोहिते पाटीलही हवालदिल झाले. परिणामी त्यांनाही अकलूजच्या गल्लीबोळातून फिरावे लागले. एकंदरीत पाटलांना मतांसाठी जनतेला पैसे वाटावे लागले अशी अकलूजकरांतून चर्चा होत आहे. निकाल काहीही लागो, मात्र या निमित्ताने अकलूजची वाटचाल परिवर्तनाच्या दिशेने सुरू असल्याचे दिसून येत आहे.