रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या संस्कारांवर बोलणाऱ्यांनी आधी आपले संस्कार तपासावेत
खुर्चीपुराण..!
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): सांगोला येथे स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमात खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना बसण्यासाठी खुर्ची न दिल्याच्या बातम्या विविध प्रसारमाध्यमांद्वारे दाखविण्यात आल्या. यावेळी काहीँनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे संस्कार काढले. तर काहींनी धैर्यशील मोहिते पाटलांचा संघर्ष खुर्चीसाठी कधीच नव्हता असे म्हणून त्यांचे गोडवे गायले. मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांच्या खुर्चीच्या असूरी इच्छेमुळेच शिवरत्न व प्रतापगडामध्ये दरी निर्माण झाली हेही समर्थकांनी लक्षात ठेवावे. राहिला विषय रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या संस्काराचा, तर भूमीपूजनाचा मंत्रोच्चार सुरू असताना रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांच्या हातात अक्षता दिल्या. त्यानंतर भूमीपूजनाची कुदळ मारल्यानंतर त्यांनी कुदळही धैर्यशील मोहिते पाटलांच्या हातात दिली. त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या संस्कारांवर बोलणाऱ्यांनी आधी आपले संस्कार तपासावेत असा सूर त्यांच्या समर्थकांतून आवळला जात आहे.
भूमीपूजन कार्यक्रमाच्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी फक्त मंत्र्यांच्याच खुर्च्यांची व्यवस्था केली होती. त्यामुळे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, दीपक साळुंखे व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना खुर्ची मिळाली नव्हती. ही बाब मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा खुर्च्या मागवून घेतल्या. तेव्हा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना इशारा करून खुर्चीवर बसायला सांगितले. मात्र त्याठिकाणी आमदार बाबासाहेब देशमुख बसले. त्यानंतर जसजशा खुर्च्या आल्या तसतसे सर्वजणच बसले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या उपसा सिंचन योजनेचा भूमीपूजन कार्यक्रम असल्यामुळे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत प्राधान्याने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पूजेसाठी बसविण्यात आले होते. यात जाणीवपूर्वक ते बसण्याचा प्रश्नच नाही. मात्र पराचा कावळा करून जाणीवपूर्वक रणजितसिंह नाईक निंबाळकरांना टार्गेट करण्याचे कसब मोहिते पाटील समर्थकांना चांगलेच अवगत आहे. आजपर्यंत मोहिते पाटलांनी सोलापूर जिल्ह्यातील कित्येक नेत्यांना जाणूनबुजून खुर्चीपासून दूरच ठेवले, इतका सत्तेचा अहंकार मोहिते पाटलांना होता. म्हणूनच सर्वांनी मिळून पंढरपूरमध्ये मोहिते पाटलांचा करेक्ट कार्यक्रम केला होता. महाराष्ट्रातील मातब्बर नेते भाजपासमोर हतबल झालेले असतानाही भाजपाकडून विधानपरिषदेची आमदारकी घेऊन रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपाशी गद्दारी केली याला कुठले नाव द्यावे? अहंकार की पक्षाशी केलेली गद्दारी म्हणावे? भाजपाचे आमदार असताना रणजितसिंह मोहिते पाटलांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाशी केलेली गद्दारी पाहून यांच्याकडे कुठली सभ्यता शिल्लक आहे का? असा प्रश्न पडतो. केंद्रासह महाराष्ट्रातही भाजपाचीच सत्ता असल्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाच जास्त महत्व असते हे लहान मुलगाही सांगेल. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे छोटी असामी नाहीत. त्यांच्या बसण्यावरून व उठण्यावरून कमेंट करण्याएवढी कुणाची पात्रताही नाही. रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायचे असेल तर परवानगीची गरज नाही, इतके त्यांचे भाजपात महत्व आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार असले तरी ते सत्ताधारी पक्षाचे नाहीत. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना सन्मान मिळालाच पाहिजे. तो सन्मान भाजपाचे नेते देतातही. पण खासदार धैर्यशील मोहिते पाटील आले म्हणजे सर्वांनी उठून त्यांनाच खुर्ची दिली पाहिजे हा खुळचटपणा आहे. उगीच खुर्चीपुराणाच्या माध्यमातून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना टार्गेट करण्याचे धंदे मोहिते पाटील समर्थकांनी बंद करावेत. नाहीतर वड्याचे तेल वांग्यावर निघेल हे मात्र नक्की असा सूर रणजितसिंह नाईक निंबाळकर समर्थकांतून निघत आहे.