सवंग प्रसिद्धीसाठी जातचोर जानकरांची राजीनामा नाट्याची स्टंटबाजी
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): उत्तम जानकर पूर्वी वेळापूरचे चित्रपटगृह चालवत होते. चित्रपट पाहून जानकरांना नाट्यमय जीवन जगण्याची चांगली कला अवगत आहे. त्यांच्यातील नेता आणि अभिनेता दोन्हीही पात्रे नाटकी आहेत. जातचोर उत्तम जानकरांनी बोगस जातीच्या दाखल्याआधारे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदारकी मिळवली. मात्र त्यांच्या जातीच्या दाखल्यावर टांगती तलवार असून तो दाखला कधी रद्द होईल, आणि आमदारकी कधी जाईल हे सांगता येत नाही. म्हणूनच जातचोर उत्तम जानकरांनी मारकडवाडीतून ईव्हीएमच्या विरोधातील राजकारणाला सुरुवात करुन राजीनामा नाट्याला सुरुवात केली. आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे द्यायचा असताना जानकरांनी २३ जानेवारीला निवडणूक आयोगाकडे राजीनामा देणार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आमदार उत्तम जानकरांचे हे राजीनामा नाट्य म्हणजे सवंग प्रसिद्धीसाठी असलेली राजकीय स्टंटबाजी आहे अशा प्रतिक्रिया माळशिरस तालुक्यातून उमटत आहेत.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून बोगस जातीच्या दाखल्याआधारे उत्तम जानकरांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र त्यांच्या या बोगस दाखल्याविरोधात मुंबई हायकोर्टात केस सुरू असल्याने त्यांना मिळालेली आमदारकी कधीही जाऊ शकते याची त्यांनाही कल्पना आहे. म्हणून तर स्टंटबाजी करून महाराष्ट्रात आपले नाव करण्यासाठी उत्तम जानकरांनी धडपड सुरू केली आहे. कधी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात, तर कधी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांवर टीका करतात. मधूनच आपण महाराष्ट्राचे दिग्गज नेते असल्यासारखे वागून राष्ट्रीय मुद्द्यांना हात घालतात. मोहिते पाटील व जानकरांची युती असतानाही एकट्या रामभाऊ सातपुते यांनी १ लाख ८ हजार ५५६ मतं घेतल्यामुळे उत्तम जानकर सैरभैर झाले आहेत. मी १ लाख २१ हजार मतांनी निवडून यायला पाहिजे होतो, मात्र फक्त १३ हजार १४८ मतांनीच कसा निवडून आलो? असा विचार करुन जानकरांची झोप उडाली आहे. म्हणूनच मारकडवाडीतून उत्तम जानकरांनी ईव्हीएमच्या विरोधात मोहिम सुरू केली. त्या दरम्यान इलेक्ट्रॉनिक मीडियाने उत्तम जानकर व रामभाऊ सातपुते यांना समोरासमोर चर्चेसाठी बोलावले होते. तेव्हाही उत्तम जानकरांनी मी आमदारकीचा राजीनामा देतो, निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या असे म्हटले होते. पण रामभाऊ सातपुते यांनी मी राजीनामा देताना माझ्यासोबत यावे अशी अट घातली होती. वास्तविक पाहता झुंडशाहीने मारकडवाडीत जाऊन त्याठिकाणी मतदारांवर दबाव निर्माण करुन त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला असता तो डाव प्रशासनाने उधळून लावला होता. मात्र उत्तम जानकरांना ईव्हीएमच्या विरोधातील नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात पुढे यायचे आहे. रामभाऊ सातपुते यांच्यावर स्वतः व आपल्या समर्थकांमार्फत सातत्याने टीका करणे म्हणजे रामभाऊ सातपुते यांना जनतेचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून तिळपापड होण्याचाच प्रकार आहे. जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून तर उत्तम जानकर हतबलच झाल्याचे दिसून येत आहे. आपली आमदारकी आज ना उद्या जाणारच आहे, आणि आपण अडचणीत येणारच आहे याची पूर्ण कल्पना उत्तम जानकरांना आहे. म्हणून तर त्यांचा हा अट्टाहास सुरू आहे. आमदारकी गेली तर मी ईव्हीएमच्या विरोधात लढलो म्हणून माझा बळी घेतला असे म्हणायला ते मोकळे ! एकंदरीत काही काळापुरती मिळालेली आमदारकी गेली तर मी किती आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढतो हेच उत्तम जानकरांना महाराष्ट्राला दाखवून द्यायचे आहे. मात्र जनता दूधखुळी नाही, आम्ही तुमची स्टंटबाजी आणि तडजोड अगदी जवळून पाहिलीय. तुमची स्टंटबाजी नेमकी कशासाठी आहे ? हे न समजण्याइतपत जनता मूर्ख नाही असा सूर माळशिरस तालुक्यातील जनतेतून उमटत आहे.