आंबेडकरवाद्यांनो षंढपणा सोडा !
एकदिलाने व्यवस्थेतील मनुवादी प्रशासन, राज्यकर्त्यांविरुद्ध बंड करण्याची गरज
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): परभणी येथील काही जातीयवादी, संविधानविरोधी मानसिकतेच्या प्रवृत्तीने संविधान स्तंभाची विटंबना केल्यानंतर या घटनेचा महाराष्ट्रभर उद्रेक झाला. मात्र मनुवादी प्रशासनाने परभणीत कोम्बिंग ऑपरेशन करून आंबेडकरी अनुयायांनाच बेदम मारहाण केली. खैरलांजी हत्याकांडानंतर जो प्रकार सोलापूरात घडला तोच प्रकार परभणीतही घडला आहे. जातीयवादी प्रशासनाचा हा प्रकार आंबेडकरी चळवळीला चिरडण्याचा असल्याने आता आंबेडकरी चळवळीच्या तव्यावर आपली भाकरी भाजून घेणाऱ्यांनी कुपमंडूक वृत्ती सोडून षंढपणा सोडावा व मनुवादी प्रशासन, राज्यकर्त्यांविरुध्द बंड करण्यासाठी रस्त्यावर उतरावे अशा प्रतिक्रिया भीमसैनिकांतून उमटत आहेत.
एखाद्या विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी जातीय दंगली घडविल्या जातात. मात्र यासाठी आंबेडकरी अनुयायांनाच टार्गेट करण्यासाठी त्यांच्या अस्मितेवर हेतूपुरस्सर घाला घातला जातो. हे पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे. अगोदर घटना घडवून आणायची आणि नंतर ती व्यक्ती माथेफिरू आहे हे सिद्ध करायचे. तो माथेफिरूच असेल तर त्याला फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांची स्मारकेच कशी दिसतात? दंगली घडवायच्या आणि आंबेडकरी अनुयायांचे जीवन उध्वस्त करायचे हे कटकारस्थान मनुवादी प्रशासनाचे नेहमीच असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भीमसैनिकांची अस्मिता असल्याने त्यांच्याविरुद्ध काही प्रकार घडला की लहान मोठ्यांसह महिलाही रस्त्यावर उतरतात. तर एखादी व्यक्ती कितीही जातीयवादी असली तरी त्या व्यक्तीने तात्पुरता बाबासाहेबांचा उदोउदो केला की सर्वजण त्याच्या प्रेमात पडतात. आंबेडकरी अनुयायांना कसे भडकवायचे आणि कसे जवळ घ्यायचे याचे कसब जातीयवाद्यांना चांगलेच अवगत आहे. मात्र भीमसैनिकांनो, रात्रच नाही तर दिवसही वैऱ्याचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामाठीपुरा येथे भाषण करताना तेथील महिलेची व आपल्या कष्टाळू महिलेची तुलना करताना इज्जतीला किती महत्त्व असते हे समजावून सांगितले होते. काही राजकीय नेते आंबेडकरी अनुयायांना ‘लक्ष्मी’दर्शन घडवून त्यांचा कडीपत्त्यासारखा वापर करतात. पण त्यांना ठोस असे काही दिले जात नाही. राजकारण व समाजकारण याची भेसळ न करता प्रत्येकाने आपापल्या परीने राजकारण करावे, कुणाच्याही पालखीचे भोई बनावे. मात्र आपल्या अस्मितेवर कुणी घाला घालत असेल तर गटबाजी, द्वेष, मत्सर बाजूला ठेवून निळ्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र आलेच पाहिजे! कारण एक ऊस सहज मोडला जातो, पण ऊसाची मोळी सहजासहजी मोडली जात नाही. आज जात्यातल्यांची पाळी असली तरी सूपात आपण आहोत हे लक्षात ठेवावे. आणि राजकीय जोडे बाजूला ठेवून सामाजिक आंदोलनात सहभागी व्हावे. यादरम्यान कोण काय करतोय? कुठल्या पक्षाचे काम करतोय? याची उणीदुणी न काढता बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपली आंबेडकरी चळवळ सक्षम करण्यासाठी व मनुवादी प्रशासन, राज्यकर्ते यांच्या जुलमी व्यवस्थेच्या विरोधात आक्रमकपणे लढा उभा करण्यासाठी भीमसैनिक म्हणून सर्वांनी निळ्या झेंड्याखाली एकत्र आले पाहिजे. त्याचबरोबर काहीजण चिथावणीखोर कृती किंवा वक्तव्ये करुन सोशल मीडियाच्या माध्यमातून आगीत तेल ओतण्याचे काम करतात. मात्र बौध्द समाज हा पुढारलेला वैचारिक मंथन करणारा समाज असल्याने नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी युवकांना भरकटू न देता संविधानिक मार्गाने व्यापक लढा उभारला पाहिजे. आमच्या अस्मितांचा अवमान केला तरी आम्ही प्रशासनाला जाब विचारायचा नाही का? ही लोकशाही आहे! संविधानाने भाषण स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य व मत मांडण्याचा अधिकार सर्वांनाच दिलेला आहे. मग एखाद्या क्रूर हुकूमशहाप्रमाणे जुलमी प्रशासन आंबेडकरी अनुयायांशी का वागत आहे?लोकशाहीने सर्वांना मत मांडण्याचे स्वातंत्र्य दिले, पण सोशल मीडियावर कोणतीच मर्यादा राहिलेली नाही. पोलिसांच्या सायबर क्राईमने बघ्याचीच भूमिका घेतल्याने सोशल मीडियावरील काही वक्तव्यांवरुन खूनी हल्ल्यासह खून होण्यापर्यंतच्या घटना घडलेल्या आहेत. काही बांडगुळे धार्मिक कार्यक्रम व सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक आंबेडकरी चळवळीतील युवकांना वाद घालण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे ज्या पद्धतीने पोर्न साईड बंद केल्या त्याच पध्दतीने देव, महापुरुष, नेते, जाती यावर चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्यांची निगराणी करुन त्यांचा तात्काळ शोध घ्यावा व त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन कठोर निर्बंध घालावेत. तरच भविष्यात दंगली होणार नाहीत. परभणी येथील गुन्हेगाराला पोलिस प्रशासनाने अटक केलीच आहे, पण त्याचा मास्टरमाईंड कोण? याचा तपास लावण्यासाठी आंबेडकरी अनुयायी लढणारच! मात्र लोकशाही मार्गाने लढणाऱ्या भीमसैनिकांना बळाचा वापर करून मनुवादी प्रशासन पोलिसी खाक्या दाखवून त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या छताखाली निवेदने देऊन मनुवादी प्रशासन व राज्यकर्त्यांच्या विरोधात लढत असला तरी भव्य लढा उभारण्यासाठी गटबाजी, अहंकार बाजूला ठेवून निळ्या झेंड्याखाली सर्वांनी एकदिलाने लढा उभारावा अशा प्रतिक्रिया आंबेडकरी जनसमुदायातून उमटत आहेत.