नितेश राणे यांनी निघून जा म्हटले, रणजितसिंह जनाची नाही तर मनाची बाळगा !
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरविणाऱ्या मोहिते पाटलांवर नियतीने कसा सूड उगवलाय ते पहा ? अख्ख्या महाराष्ट्रात विजयसिंह मोहिते पाटलांनी आपला नावलौकिक केलेला असताना त्यांचे सूपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील मात्र आपल्या बापजाद्यांची प्रतिमा मलीन करताना दिसतायेत. विजयसिंह मोहिते पाटील यांनी पक्षनिष्ठा जोपासून राष्ट्रवादी काँग्रेससाठी आयुष्य घालविलेले असताना रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश करून भाजपाची आमदारकी घेऊन सुद्धा लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काम केले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाली तेव्हा त्याठिकाणी उपस्थित राहिलेल्या आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना काल झालेल्या आमदार नितेश राणे यांनी “तू इथे कसा? देवाभाऊच्या विरोधात गेलास, चल निघ इथून” असे म्हणून खडसावले असता रणजितसिंह मोहिते पाटील तिथून निघून गेले. ही बाब शिवरत्नवरील मोहिते पाटलांसाठी खूपच लाजीरवाणी असून रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जनाची नाहीतर मनाची बाळगून भाजपाचा राजीनामा देत स्वाभिमान जपावा अशी चर्चा माळशिरस तालुक्यातील जनतेतून होत आहे.
मारकडवाडी हे गांव बॅलेट पेपरवरील मतदानाच्या मागणीमुळे देशभरात प्रसिध्दीच्या झोतात आले आहे. बनावट एस.सी.दाखल्यावर आमदार झाल्यानंतर उत्तम जानकर यांनी केलेल्या ईव्हीएम मशीनच्या नौटंकीमुळे जनमतात संभ्रमावस्था निर्माण झाल्याने त्यासंदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी मारकडवाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी उपस्थित हजारोंच्या जनसमुदाय व महाराष्ट्रातून आलेल्या विविध प्रसारमाध्यमांसमोर गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणाचा गौप्यस्फोट केला. या गौप्यस्फोटानंतर आज रोजी महाराष्ट्रात असलेली मोहिते पाटलांची राजकीय किंमत व वजन याची प्रचिती आली. काही वर्षांपूर्वी सत्तेच्या यशोशिखरावर असताना मोहिते पाटलांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा, पंढरपूर, मंगळवेढा, करमाळा या तालुक्यात सुध्दा आपल्याच घराण्याकडे सत्ताकेंद्र असावे या असूरी इच्छेपोटी बबनराव शिंदे, संजय शिंदे, प्रशांत परिचारक यांच्या विरोधात कटकारस्थानं करण्याबरोबरच तासगांवात जाऊन स्व. आर. आर. पाटील यांना पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवारांना विजयसिंह मोहिते पाटील यांनी मंत्रीमंडळातून काढून टाकले होते. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला कोणी वरचढ नसावा हीच मोहिते पाटलांची भूमिका होती. तसेच आनंदराव देवकाते यांच्यासारख्या बहुजनवादी विचारसरणीच्या नेतृत्वावर राजकीय संन्यास घेण्याची वेळ आणली. दरम्यान भाजपाला मोहिते पाटलांचा हा पूर्वेतिहास चांगलाच ठाऊक असून सुद्धा त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांना विनाविलंब विधानपरिषदेची आमदारकी दिली. त्याचबरोबर शंकर कारखान्याला ११३ कोटी देण्याचा उदारपणा दाखवला. तसेच सराटी ते तोंडले-बोंडले दरम्यानचे संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे कोट्यवधी रुपयांचे काम दिले. यासह अकलूज नगरपरिषद हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन व पाणी पुरवठ्याच्या योजनेकरिता कोट्यवधी रुपये दिले होते. मात्र यांच्या नैसर्गिक स्वभावाप्रमाणे, भाजपात गेल्यानंतर पक्षाशी एकरुप होऊन पक्षाला बळकटी आणण्याऐवजी भाजपाच्या निष्ठावंतांवरच कुरघोड्या करुन मोहिते पाटील यांनी मोहिते पाटलांनी आपले खायचे दात दाखवले. सत्तेच्या जोरावर एकेकाळी मोहिते पाटलांची अकलूजसह माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात प्रचंड दहशत होती. त्यावेळी एका कार्यकर्त्याने अकलूजमध्ये स्वाभिमानी पक्ष काढण्याचा प्रयत्न केला असता त्या कार्यकर्त्याला मारहाण केली होती. तो राग नितेश राणे यांच्या मनात होताच! विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवडीवेळी हा राग उफाळून आला. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पाठीमागून राजकारण आलेल्या नितेश राणे यांनी त्यांना खडसावणे हे मोहिते पाटलांच्या इभ्रतीला मूळीच शोभणारे नाही. जेव्हा मोहिते पाटील सत्तेच्या धुंदीत वावरत त्यांनी राजकारणातून सहकार व सहकारातून स्वाहाकार करीत त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या सुमित्रा पतसंस्था, राजहंस कुक्कुटपालन, विजय नागरी पतसंस्था, विजय शुगर अशा अनेक संस्थांच्या नावांवर त्यांचे मनसुबे साध्य करण्यासाठी सोलापूर डीसीसी बॅंकेतून ती थकवली. आपले वजन वाढवून परतफेड करण्याचा व्यावहारार्यता दाखवली नाही. त्यामुळे त्यांच्यासह जिल्ह्यातील त्यांच्या छत्रछायेखाली वावरणाऱ्यांवर विभागीय उपनिबंधक यांनी ८८ नुसार कारवाई करीत व्याजासह रक्कम वसूल करण्याचा बडगा उगारल्यानंतर मोहिते पाटलांच्या पायाखालची वाळू सरकली असून आयुष्यभर निष्कलंकपणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदापर्यंतचे राजकारण करणाऱ्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या राजकीय जीवनावरही ठपका लागल्याची खंत तालुक्यातील अनेक लोकांनी व्यक्त केली. कारण हे लोक विजयसिंह मोहिते पाटलांना त्यांच्या स्वभावामुळे व कर्तृत्ववामुळे त्यांचेवर प्रेम करतात. याउलट त्यांचीच सावली असणारे रणजितसिंह मोहिते पाटील यांना कुणी नमस्कार केला तरी ते त्यांच्याकडे बघत नसत, इतका पराकोटीचा अहंकार रणजितसिंहांमध्ये ठासून भरल्याचे याच मोहिते पाटील समर्थकांत दबक्या आवाजात चर्चा होत असून रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आमदारकीसाठी लाचारी पत्करण्यापेक्षा जाहीरपणे टीका करणाऱ्यांच्या तोंडावर राजीनामा फेकून मारावा असे बोलले जात आहे. त्याचबरोबर जयसिंह मोहिते पाटलांना ज्या उत्तम जानकरांनी कित्येक वर्षे छळले, त्रास दिला त्या उत्तम जानकरांशी जयसिंह मोहिते पाटलांनी जुळवून घेतल्याने अनेक मोहिते पाटील समर्थकांना पटले नाही. तर विजयसिंह मोहिते पाटील यांनी ज्या पध्दतीने संयमी राजकारण केले त्याच पध्दतीने खासदार धैर्यशील मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, संग्रामसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, स्वरुपराणी मोहिते पाटील यांनीही राजकारण करुन विजयसिंह मोहिते पाटलांच्या संयमी राजकारणाचा वारसा पुढे चालवावा अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.