जातचोराची नौटंकी..!
आमदारकीची ऊब घेण्यासाठी उत्तम जानकरांनी धनगर-खाटीक या बोगस जातीच्या दाखल्याआधारे एससी समाजाच्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण केलेले असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर बेगडी प्रेम दाखविण्यासाठी त्यांनी चैत्यभूमी येथे जाऊन मारकवाडीची माती बाबासाहेबांना अर्पण केली. एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एससी समाजाला दिलेले संविधानिक हक्क बोगस दाखल्याआधारे हिसकावून घ्यायचे आणि दुसरीकडे आंबेडकरी समूहाची मनं जिंकण्यासाठी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांसमोर नतमस्तक व्हायचे ही जातचोर उत्तम जानकरांची नौटंकी न ओळखण्याइतकी आंबेडकरी जनता नक्कीच खुळी नाही.
माळशिरस तालुक्यातील प्रस्थापित मोहिते पाटलांना कडवा विरोध करणाऱ्या उत्तम जानकरांनी २००९ साली माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर धनगर-खाटिक हा बोगस जातीचा दाखला काढला. तेव्हा त्यास मदत करणाऱ्या बाळासाहेब धाईंजे यांना मोहिते पाटलांची एकाधिकारशाही, हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी मला आमदार व्हावेच लागेल, आमदारकीशिवाय मी हा जातीचा दाखला कुठेही वापरणार नाही असे उत्तम जानकर म्हणाले होते. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील प्रस्थापित मोहिते पाटलांची हुकूमशाही, सरंजामशाही संपविण्यासाठी बाळासाहेब धाईंजे यांनी त्यांना मदत केली होती. मात्र उत्तम जानकरांनी आपल्या जातीच्या दाखल्याआधारे त्यांच्या मुलीला आळंदीचे नगरसेविका बनविले. मुलगा जीवन याचाही जातीचा दाखला काढून आपल्या दोन्ही मुलांची जातपडताळणी प्रक्रियाही सुरू केली. स्वतः शासनाची २ कोटींची फिशटॅंक योजना घेतली. अशा पध्दतीने उत्तम जानकर एससी समाजाच्या हक्कांवर गंडांतर आणत असतानाच स्व. हनुमंतराव डोळस यांनी त्यांच्या या बोगस जातीच्या दाखल्याला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सूपुत्र संकल्प डोळस यांच्या डोक्यात वेगळाच संकल्प घोळत असल्याने त्यांनी या लढ्याला कमकुवत करुन २०२४ साठी आमदारकीची वाट मोकळी करून दिली. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर उत्तम जानकरांचा जातीचा दाखला रद्द होण्याची शक्यता दिसत असल्याने त्यांनी मारकडवाडी येथील मतदानाचे भांडवल करीत स्टंटबाजी सुरू केली आहे. आपली आमदारकी जाणारच आहे, तर मारकडवाडीचा राजकीय स्टंट करुन चर्चेत राहू हा उत्तम जानकर यांचा डाव आहे. महाराष्ट्रात सध्या महायुतीची सत्ता असल्याने उत्तम जानकरांना भाजपाशी केलेल्या गद्दारीची किंमत मोजावीच लागणार आहे. त्यामुळे त्यांचा दाखला रद्द होऊन माळशिरस विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच मी १ लाख २१ हजारांच्या लीडने निवडून यायला हवा होतो, परंतु केवळ १३१४८ मतांनी कसा निवडून आलो? असा प्रश्न उपस्थित करुन उत्तम जानकरांनी स्टंटबाजी सुरू केली आहे. पण जे बुटासकट मोहिते पाटलांच्या पाया पडतात ते मारकडवाडीतील मतदारांना कसे ग्रहीत धरु शकतात? मारकडवाडीत उत्तम जानकरांची मक्तेदारी आहे काय? हे गाव पारंपरिक मोहिते पाटील विरोधकांचे गाव असल्याने जे मोहिते पाटील विरोधक त्यांनाच हे गाव मतदान करतंय हे वेळोवेळी दिसून आलंय. पण या गावाने उत्तम जानकरांना त्यांची लायकी दाखविल्यानेच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. सुपडा साफ झालेल्या महाविकास आघाडीलाही मारकडवाडीचे आयतेच भांडवल मिळाल्याने त्यांनी महाराष्ट्रासह देशभरात वातावरण ढवळून काढण्यासाठी या गावावर फोकस केला आहे. यादरम्यान लोकशाही वाचविण्यासाठीच आम्ही मैदानात उतरलोय असे म्हणून उत्तम जानकर मारकडवाडीची माती घेऊन चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी अर्पण करण्याचे नाटक करीत असले तरी त्यांच्या नौटंकीला कुणीही भूलणार नाही. वयाची साठी पार केली तरी चैत्यभूमीकडे न फिरकणाऱ्या उत्तम जानकरांना आताच बाबासाहेबांची उपरती का आली? एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून एससी समाजाला मिळवून दिलेले हक्क आणि अधिकार बोगस दाखल्याआधारे हिसकावून घ्यायचे आणि दुसरीकडे आंबेडकरी समुदायाला इमोशनल करण्यासाठी चैत्यभूमीवर जायचे ही जातचोर संधीसाधू उत्तम जानकरांची दुटप्पी भूमिका आहे. त्यांच्या या नौटंकीला कुणी बळी पडणार नाही. तसेच त्यांच्या समर्थनार्थ ढोल बडविणाऱ्या दलालांनाही आंबेडकरी समूहाने थारा देऊ नये. इतकेच…!