‘उत्तम’क्रांतीसाठी ‘बाळ’ने लंगोट (डायपर) बांधणे योग्य आहे का?
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): एससी समाजाच्या हक्काच्या जागेवरून बोगस जातीच्या दाखल्याआधारे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर यांच्या प्रचाराचा नारळ अकलूजमध्ये फुटला. यादरम्यान एक बाळ म्हणाले, मी आता लंगोट बांधलीय. त्यामुळे उत्तम जानकर एक लाख एक हजार मतांनी विजयी होतील. या बाळाचे वक्तव्य ऐकून रथी महारथी मनातल्या मनात हसत होते. कारण लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना माळशिरस तालुक्यातून ७० हजाराचे लीड मिळालेले असताना त्याच तालुक्यातून एक लाख एक हजार मतांचे लीड देण्याचे वक्तव्य करणे म्हणजे बालिश बडबड नव्हे काय? वास्तविक पाहता माळशिरस विधानसभा राखीव मतदारसंघात एससी समाजासाठी आरक्षण असताना त्यांना संधी देण्याऐवजी एससी समाजाला कुजविण्यासाठी शिवरत्नरील एका प्रस्थापिताने दुसऱ्या प्रस्थापितासाठी उभारलेला ‘उत्तम’ लढा म्हणजे शिवरत्नवर केलेला प्रचाराचा प्रचाराचा शुभारंभ! मोहिते पाटलांच्या या भूमिकेमुळे एससी समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार झालेला असताना एका बाळाने ‘उत्तम’क्रांतीसाठी लंगोट बांधलंय. पण या बाळाने हे लंगोट (डायपर) बांधणे योग्य आहे का? असा प्रश्न एससी समाजातून उपस्थित केला जात आहे.
इतनी खामोशी से जनता का मजाक ना उडाईए साहब,
जानता तो आपको भी तब से हूँ जब से हम लंगोट भी नहीं पहनते थे|
लंगोट या शब्दावरून बाळाला आम्ही सांगू इच्छितो, लंगोटसाठी कॉटनचे कापड लागते. बारामतीच्या कॉटनकिंगमध्ये हजारो लोकांना रोजगार मिळाला तसा एखादा प्रोजेक्ट शिवरत्नने उभारून इथल्या जनतेला रोजगार मिळवून दिला का? लोकांना आर्थिकदृष्ट्या गुलाम बनवून ठेवणे आणि आपल्याच शिवरत्नच्या पायऱ्या चढायला भाग पाडणे यासाठी धूर्त, शोषक शिवरत्नने कुटील राजनितीचा वापर केला आहे. परंतु आमदार रामभाऊ सातपुते यांना तालुक्यातील जनतेसाठी रांजनगावसारखी पंचतारांकित एमआयडीसी निर्माण करायची आहे. त्यामुळेच ते माळशिरस विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा लढत आहेत. दरम्यान तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या बाळाने लंगोटचा उच्चार करून एससी समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार केला आहे.
वास्तविक पाहता प्रचाराचा नारळ गरूड बंगल्यावरच फुटायला पाहिजे होता. मात्र शिवरत्नला हवे असतात आपल्या दावणीला बांधलेले बैल! परंतु आमचा आज खडा सवाल आहे, दावणीला बांधलेला बैल चांगला जरी असला तरी औताला जुंपल्यावर बसला तर त्याचा आम्हाला काय उपयोग? अशीच अवस्था राखीव मतदारसंघातील प्रस्थापित शिवरत्नने करून लोकशाही व्यवस्थेचा खेळ चालविला आहे. माझ्यासारख्या घरकुलमध्ये राहणाऱ्या पत्रकारावर मोहिते पाटलांकडून एक कोटीचा दावा दाखल केला जातो. इतकी ॲलर्जी त्यांना एससी समाजाबद्दल आहे. २६ जानेवारीच्या अकलूज येथील पथसंचलनात सुध्दा मोहिते पाटील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एकही बॅनर लावत नाहीत. त्यामुळे शिवरत्नच्या डोक्यातून हा जातीयवाद जाणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होतो.
२०२४ ची विधानसभा निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. ही निवडणूक माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी बाण्याची जनता विरूध्द मोहिते पाटील व जानकर या दोन प्रस्थापितांविरूध्द आहे. ६० वर्षे राजकारण खेळणाऱ्या शिवरत्नमधून आज एकही आरोग्यदूत म्हणून कुणीही का नावारूपाला आला नाही? गरिबांसाठी लढता लढता स्वतः कोट्यधीश, अब्जाधीश झालेल्या शिवरत्नविरूध्दचा हा लढा आहे. शिवरत्नला तालुक्यातील जनतेचा खडा सवाल आहे, उत्तम जानकरांचा माणूस म्हणून तुम्ही अनेकांना उध्वस्त केले. त्यांचे खच्चीकरण केले. त्याच गरूड बंगल्यावर जाताना तुम्हाल जनाची नाही मनाची तरी काही वाटली पाहिजे होती. स्वतःच्या स्वार्थासाठी दोन्ही प्रस्थापित एकत्र आले, परंतु तुमच्या दोघांच्या कुटील राजकारणात हजारो लोक भरडले गेले, चिरडले गेले, उध्वस्त झाले. त्या गोरगरीब जनतेचे काय? खासदार धैर्यशील मोहिते पाटील काय, किंवा उत्तम जानकर काय, दोघांनीही कारखाने विकून टाकले. ही माणसे मोठेपणाची झूल पांघरलेली नंदीबैल तर नव्हेत ना? असे काही स्वाभिमानी लोकांतून बोलले जात आहे. तुम्हाला स्वतःचे कारखाने सांभाळता येत नाहीत, मग तुम्ही एमआयडीसी आणून हजारो लोकांना काम काय देणार? उत्तम जानकर व खासदार धैर्यशील महिते पाटील यांच्यावरील गुन्ह्यांची बेरीज केली तर सहजपणे अर्धशतक पार करेल. लोकप्रतिनिधींकडून जनतेच्या काहीतरी अपेक्षा असतात. जनतेसमोर एक आदर्श असावा. माळशिरस तालुक्यातील जनता मात्र या नादान नेत्यांमुळे आदर्शाच्या दुष्काळात होरपळत आहे. अशा उत्तमसाठी बाळने लंगोट बांधणे किती योग्य आहे? असा प्रश्न स्वाभिमानी जनतेतून उपस्थित केला जात आहे.