वंचितच्या राज कुमारची उमेदवारी बदलून द्यावी यासाठी पदाधिकाऱ्यांचे जाहीर राजीनामे
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुक्याने वंचितने जाहीर केलेले उमेदवार श्री. राज कुमार हे बदलून मिळावेत यासाठी वरिष्ठांकडे मागणी केली होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माळशिरस तालुका पदाधिकाऱ्यांनी अकलूज येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर राजीनामे दिले आहेत. त्यामुळे उमेदवार श्री. राज कुमार यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
राज कुमार यांनी २०१९ साली माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी लढवली होती. मात्र निवडणूक पार पडल्यापासून त्यांनी माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. बाभूळगाव येथील वंचितच्या कार्यकर्त्यांवर जातीयवाद्यांनी अन्याय केल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी बाभूळगाव ते माळशिरस पायी मोर्चा काढल्यावर सर्व प्रकरण शांत झाल्यानंतर राज कुमार बाभूळगाव येथे आले होते. मात्र त्याठिकाणी जातीयवाद्यांनी हल्ला करताच पळून गेल्यानंतर वरिष्ठांनी आपली माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यावरच ते उगवले आहेत. त्यामुळे राज कुमार यांच्याबरोबरच वरिष्ठांबद्दलही कार्यकर्त्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जे उमेदवार कार्यकर्त्यांच्या अडचणीच्या काळात पाठीशी उभे रहात नाहीत त्यांचा प्रचार आपण का करावा? असा प्रश्न उपस्थित करून वरिष्ठांकडून होत असलेल्या गळचेपीच्या निषेधार्थ माळशिरस तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सामुदायिक राजीनामाअस्त्र उपसले आहे. यावेळी माळशिरस तालुक्यातील माळीनगर, श्रीपूर, पिलीव, अकलूज, चांदापूरी, बचेरी आदी शाखेच्या अध्यक्ष, पदाधिकारी यांनी राजीनामे सादर केले आहेत. तसेच दिनांक 23/10/2024 रोजी नवनियुक्त 10 पैकी 5 पदाधिकरी यांनी जाहीर राजीनामे दिले असून सदरचे राजीनामे प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांना सादर केले आहेत.
सदरच्या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड. सुमित सावंत यांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांची सविस्तर भूमिका मांडून हात जोडून वरिष्ठांना राज कुमार यांची उमेदवारी बदलून मिळावी अशी विनंती केली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नौशाद शिकलगार, माजी तालुकाध्यक्ष अभिजीत गायकवाड, मा. तालुका उपाध्यक्ष समाधान साबळे, अक्षय देठे, लिंगेश्वर सातपुते, सागर सरतापे, विकास दळवी, मनोज जगताप, सुहास गायकवाड, शुभम वाघमारे, सुनील कांबळे, आदर्श गायकवाड, अजय कांबळे, जय खरे, कुंडलिक कांबळे, रामजी लोंढे आदिसह बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.