अकलूजमध्ये ३ सप्टेंबरला माळशिरस तालुका अनुसूचित जाती हक्क संरक्षण कृती समितीची सर्वपक्षीय बैठक
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी माळशिरस तालुक्यातील स्थानिक भूमीपुत्र व खरा दलित उमेदवार आमदार करण्यासाठी व प्रस्थापित पक्षाने तसे जाहीर करण्यासाठी माळशिरस तालुका अनुसूचित जाती विधानसभा मतदार संघातील सर्वपक्षीय सकल दलित समाजाची अत्यंत महत्वपूर्ण व तातडीची निर्णायक बैठक मंगळवार दिनांक ३/९/२०२४ रोजी सकाळी ११ अन्नपुर्णा मंगल कार्यालय, प्रतापसिंह चौक, धवलनगर रोड, अकलूज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे अशी माहिती अनुसूचित जाती हक्क संरक्षण कृती समिती (सर्वपक्षीय) यांच्या वतीने देण्यात आली आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघ २००९ पासून अनुसूचित जातीसाठी राखीव झालेला असतानाही सलग तीनवेळा चर्मकार या एकाच जातीला प्रस्थापित राजकीय पक्षांनी आमदार केले आहे. आता केवळ दोन टर्म शिल्लक राहिल्याने २०२४ व २०२९ या दोन्ही टर्ममध्ये माळशिरस तालुक्यातील स्थानिक बौध्द व मातंग समाजाला आमदारकीची संधी मिळावी यासाठी दोन्ही समाजातील कार्यकर्ते व नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी माळशिरस तालुका पिंजून काढत अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व जातींची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस अनुसूचित जातीतील प्रमुख नेते व विचारवंत हजर राहून मार्गदर्शन करणार आहेत व त्यानंतर सर्व संमतीने पुढच्या रणनितीची दिशा आखली जाणार आहे. तरी अनुसूचित जातीतील सर्वांनी या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यावेळी काढलेल्या प्रसिध्दीपत्रकात “अपने अधिकार और हक्क की लड़ाई खुद लडनेवाले ही समाज के हिरो होते है। खुद का फायदा देखकर समाज से द्रोह करके झूठ को बढावा देनेवाला नेता नही दलाल होता है।” हे स्लोगन छापले असले तरी यानुसार कितीजण वाटचाल करतात हे या बैठकीनंतरच कळेल.