रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार रामभाऊ सातपुते नॉट रिचेबल
६५ हजार मतदान दिलेल्या मोहिते पाटील विरोधकांनी कुणीकडे जायचे?
मोहिते पाटील विरोधकांचा चेहरा म्हणून ॲड. सोमनाथअण्णा वाघमोडे यांच्याकडून अपेक्षा!
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार रामभाऊ सातपुते व माढा लोकसभा मतदारसंघात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाल्यापासून या दोघांनीही माळशिरस तालुक्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणवरच फोकस केला आहे, तर आमदार रामभाऊ सातपुते यांनी मुंबई, पुण्याच्या वाऱ्या सुरू केल्या आहेत. आपला आमदारकीचा कालावधी शिल्लक असतानाही त्यांनी माळशिरस तालुक्याकडे पाठ फिरवली आहे. दरम्यान कार्यकर्त्यांनी वारंवार फोन करूनही रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार रामभाऊ सातपुते हे नॉट रिचेबल झाल्याने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यातून ६५ हजार मतदान दिलेल्या मोहिते पाटील विरोधकांनी आता कुणीकडे जायचे? असा प्रश्न विरोधकांतून उपस्थित केला जात आहे. यादरम्यान आता स्थानिक विरोधकच सक्षम करावा असा जनतेतून सूर निघत असून ॲड. सोमनाथअण्णा वाघमोडे यांच्याकडे मोहिते पाटील विरोधकांचा लढवय्या चेहरा म्हणून पाहिले जात आहे.
माढा लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांच्या विरोधात प्रचार करताना माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लावला तर एकेकाला बघून घेईन अशी वक्तव्ये करीत निवडणुकीपुरती स्टंटबाजी करणाऱ्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढ्यात पराभव झाल्यापासून माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संपर्क तोडला आहे. पूर्वी नेहमी माळशिरस तालुक्यात हेलपाटे मारुन अकलूजवर फोकस करणारे निंबाळकर आता फलटणपुरते मर्यादित राजकारण करीत आहेत. त्यामुळे ‘नाद केला, पण वाया गेला’ अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. माढ्यातील पराभवामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाकच गेल्याने भाजपा पक्षश्रेष्ठींच्या सतत संपर्कात राहून आपल्या पदरात काय पडतंय का याचसाठी त्यांचा सध्या अट्टाहास सुरू आहे. पण यादरम्यान त्यांचे राजकारण जनतेसाठी नव्हे, तर स्वहितासाठीच सुरू होते हे आता लोकांना चांगलेच कळून चुकले आहे. निरा देवधर व पंढरपूर-लोणंद रेल्वेमार्गाचे भूमीपूजन लवकरच करण्यात येईल असे रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणत होते, मात्र विरोधकांनी यास निधीच उपलब्ध नाही असे म्हटल्यानंतरही त्यांनी याला उत्तर दिले नाही. यावरुन त्यांच्या घोषणा या केवळ वावड्या होत्या, तसेच माळशिरस तालुक्यावर त्यांचे केवळ दिखाऊ प्रेम होते हे यावरून माळशिरसकरांच्या लक्षात आले आहे. त्याचबरोबर आमदार रामभाऊ सातपुते यांना माळशिरस तालुक्यातून पुन्हा एकदा आमदार व्हायचे होते. परंतु भाजपा पक्षश्रेष्ठींनी त्यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर त्याठिकाणी सातपुतेंचा पराभव झाला. तेव्हापासून त्यांनी माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांचे फोन उचलणेही बंद केले आहे. पराभवाचा दुखवटा म्हणून काही दिवस शांत राहणे ठीक आहे. मात्र आमदार रामभाऊ सातपुते आता माळशिरस तालुक्याकडे फिरकतच नाहीत. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आमदार रामभाऊ सातपुते यांच्या पराभवाला माळशिरस तालुक्यातील जनता जबाबदार आहे का? मग आपली आमदारकी अजून काही महिने शिल्लक असताना ते जनतेला वाऱ्यावर का सोडत आहेत? त्यांच्या या भूमिकेमुळे साडेचार वर्षात त्यांनी जे कमावले ते गमावल्याचे जनतेतून बोलले जात आहे. आमदार रामभाऊ सातपुते यांनी अल्पावधीतच खूप मोठे काम केले आहे. पण आता त्यांच्या दुर्लक्षामुळे ते केवळ पुढची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विकासकामे करीत होते का? असा जनतेतून प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकंदरीत रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार रामभाऊ सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील जनतेला वाऱ्यावर सोडल्याने आता स्थानिक विरोधक सक्षम करणे काळाची गरज आहे.
ॲड. सुभाष (अण्णा) पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात १९९५ साली माळशिरस विधानसभा निवडणूक लढवून ४४४४५ मतं घेतली होती. धनगर समाज हा पारंपरिक मोहिते पाटील विरोधक आहे. ॲड. सुभाष (अण्णा) पाटील हे माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाचे प्रेरणास्थान आहेत. पण कालांतराने धनगर समाजातीलच उत्तम जानकर यांनी मोहिते पाटलांवर वारंवार टीका करुन कट्टर मोहिते पाटील विरोधक म्हणून आपली ओळख निर्माण केली. ॲड. सुभाष (अण्णा) पाटील यांच्यानंतर इतक्या आक्रमकपणे मोहिते पाटलांच्या विरोधात बोलणारा कुणीतरी आहे म्हणून माळशिरस तालुक्यातील जनतेने त्यांना डोक्यावर घेतले. मात्र संधीसाधूपणाच्या राजकारणामुळे त्यांनी मोहिते पाटलांशी हातमिळवणी करून त्यांनी आत्मघात करुन घेतला. त्यामुळे आजपर्यंत शिवरत्नच्या उंबरठ्यावर न गेलेले व सातत्याने एमआयडीसी, पंढरपूर-लोणंद रेल्वेमार्गासाठी धडपडणाऱ्या ॲड. सोमनाथअण्णा वाघमोडे यांनी जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे. ॲड. सोमनाथअण्णा वाघमोडे यांनी आपल्या कर्तृत्वावर शेती महामंडळाच्या जमिनींचे प्रश्न सोडविले. माळशिरस तालुक्यातील गारवाडच्या माळरानावर मुंबई-बेंगलोर कॉरिडॉरसाठी सातत्याने पाठपुरावा करुन तो प्रश्न मार्गी लावला. त्याचा सर्व्हे करण्यासाठी अधिकारी येऊ लागले आहेत. तसेच पंढरपूर-लोणंद रेल्वेमार्गासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते पाठपुरावा करीत आहेत. कुणावरही टीका न करता मोहिते पाटील विरोधक म्हणून ॲड. सोमनाथअण्णा वाघमोडे युवकांच्या रोजगारासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विकासात्मक कामे करत राजकारणात सक्रीय असलेल्या ॲड. सोमनाथअण्णा वाघमोडे यांनाच ताकद देऊन मोठे करावे अशी जनतेतून मागणी होत आहे.