दक्षिण सोलापूर मतदारसंघात धवलपर्व अवतरणार?
सोलापूर (बंडखोर वृत्तसेवा): लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाने स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू केलेल्या डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेसच्या माध्यमातून एक मोठे वलय निर्माण केले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे ते निकटवर्तीय असून राजकीय कुरूक्षेत्रात प्रतापगडाला मोठे करण्यासाठी नाना पटोले यांचाही प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील कार्य लक्षात घेता काँग्रेसच्या माध्यमातून डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांना त्याठिकाणाहून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात धवलपर्व अवतरणार असल्याची शक्यता राजकीय जाणकारांतून वर्तवली जात आहे.
डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस वाढविण्यासाठी गावोगावी दौरे केले होते. काही गावांमध्ये मुक्कामी राहून डॉ. धवलसिंह यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवून कार्यकर्त्यांची भक्कम मोळी बांधली आहे. म्हणूनच माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांचे नाव चर्चेत होते. परंतु काही कारणास्तव तेथून त्यांचे नाव जाहीर होऊ शकले नसले तरी विधानसभेसाठी मात्र त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेची खूप कामे केली आहेत. अनेकांच्या अडचणी सोडवून तेथील लोकांना मोठा आधार दिला आहे. म्हणून तर तेथील जनतेला प्रतापगडाबद्दल खूप आपुलकी आहे. याचा फायदा डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला होणार आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव असल्यामुळे डॉ. धवलसिंह यांच्यासारख्या लढवय्या नेतृत्वाला आमदार करण्यासाठी दक्षिण सोलापूर मतदारसंघ एकदम सुरक्षित आहे. तेथील जनता स्व. प्रतापसिंह मोहिते पाटलांनी केलेल्या उपकाराची परतफेड मतांच्या माध्यमातून नक्कीच करतील. त्यामुळे प्रतापगड समर्थकांतून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून डॉ. धवलसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी द्यावी अशी काँग्रेसकडे मागणी केली जात आहे.