माढ्यात भाजपला संपविणाऱ्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षश्रेष्ठी आणखी किती दिवस पोसणार?
माढा (बंडखोर वृत्तसेवा): शिवरत्नने आजपर्यंत संयमीच राजकारण केले. मात्र माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी माढ्यात टगेगिरी करून शिवरत्नला आव्हान दिल्यानंतर खासदार शिवरत्नने जशास तशी भूमिका घेत माढा काबीज केला. परिणामी आपल्या हट्टीपणामुळे टगेगिरी करीत माढ्याची जागा गमाविणाऱ्या माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना भाजपा आणखी किती दिवस पोसणार? असा प्रश्न भाजपप्रेमी जनतेतून उपस्थित केला आहे.
राजकारण करीत असताना डोक्यावर बर्फ व तोंडात साखर असावी लागते. सत्ताधारी असो की विरोधक, सर्वांशी चांगले संबंध ठेवले तरच राजकारणात यशस्वी होता येते. उदाहरणच द्यायचे असेल तर खासदार नितीन गडकरी व विजयसिंह मोहिते पाटील यांचे देता येईल. उपमुख्यमंत्री हे पद उपभोगलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर वारंवार कुरघोड्या होऊनही त्यांनी राजकारणात संयमी भूमिका घेतली. तर नितीन गडकरी यांच्यावरही पक्षातूनच कुरघोड्या करून विरोधकांना रसद पुरविल्याचे बोलले जात होते. तरीही त्यांनी आपला संयम न सोडता विजयाचा झेंडा रोवला. माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकरांमुळे भाजपाची मान शरमेने खाली गेली आहे. कारण रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या टगेगिरीमुळे ते पराभूत झाल्यामुळे भाजपा पक्षश्रेष्ठींची सत्तेची नशाच उतरली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वात नव्हे, तर बोलण्यातच दम आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अकलूजमध्ये येऊन निवडून आलेल्या उमेदवाराला दमबाजी करणे, दबाव निर्माण करणे, सूडाचे राजकारण करणे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना चांगलेच भोवले आहे. त्यांच्या टगेगिरीमुळेच जनतेने त्यांना नाकारल्याची चर्चा आहे. राजकारण हे केवळ पैशांच्या जोरावर होत नसते, तर माणसेही पाठीशी लागतात. आणि त्या माणसांना जपणारेही नेतृत्व असावे लागते. शिवरत्नला आव्हान देत रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी निवडक लोकांना सोबत घेऊन सत्तेची स्वप्ने पाहिली. मात्र त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. नुकताच जुन्या भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांनी पक्ष का सोडला याचाही भाजपा पक्षश्रेष्ठींनी विचार करणे गरजेचे आहे. माढ्यातील जनतेने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना का नाकारले व पदाधिकारी पक्ष का सोडतायत याचा भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी विचार करावा. इथून पुढे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासारखे प्रचारक भाजपाला लाभले तर भाजपाचे नामोनिशाण मिटायला वेळ लागणार नाही. तसेच मोहिते पाटलांच्या रूपाने माढ्यात भाजपा पक्ष बळकट झाला होता, मात्र केवळ रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या हिटलरी प्रवृत्तीमुळे माढ्यातून भाजपाचे नामोनिशाण मिटले. दरम्यान या सर्व बाबींचा विचार करून पुढील काळात भाजपाला सक्षम करायचे असेल तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांसारख्या हेकेखोर नेतृत्वाला भाजपाने काम करण्याची संधी द्यावी की नाही याचा पक्षश्रेष्ठींनी विचार करावा अशी जनतेतून चर्चा होताना दिसत आहे.