रणजितसिंह नाईक निंबाळकरांची स्टंटबाजी म्हणजे फुसका बार! कार्यकर्त्यांनो सावधान..!
माढा (बंडखोर वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांच्या विरोधात प्रचार करताना अकलूजमध्ये येऊन ‘मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांना जेलमध्ये टाकणार’ अशी वल्गना करत अकलूज परिसरातील कार्यकर्त्यांना भुलवून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्टंटबाजी केली. पण त्यांची स्टंटबाजी म्हणजे फुसका बार असल्याचे दिसत असून लढाऊ कार्यकर्त्यांनी या स्टंटबाज रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यापासून सावध रहावे अशी चर्चा अकलूज परिसरात होताना दिसत आहे.
२०१९ चा कार्यकाळ संपल्यानंतर २०२४ च्या लोकसभेचा खासदार मीच होणार असा अट्टाहास धरून भाजपा पक्षश्रेष्ठींकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवली. पण पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली तर मी निवडणूक लढविणार अशी भीष्मप्रतिज्ञा केलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातून खासदारकी लढवली आणि जिंकलीही! मात्र यादरम्यान दोन वर्षांपूर्वी अकलूजमध्ये झालेल्या एका मर्डरमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव असण्याची शक्यता वर्तवून त्यांना लवकरच चौकशीअंती जेलमध्ये टाकणार, मोहिते पाटलांची जुलमी राजवट संपविणार असे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वक्तव्य केले. त्याचबरोबर मोहिते पाटलांनी काही केसेसमध्ये गुंतविलेल्या कार्यकर्त्यांना मी आपल्या पाठीशी नेहमी राहीन असे म्हणून त्यांनी या धाडसी कार्यकर्त्यांना अकलूज परिसरात निवडणुकीसाठी वापरले. मात्र पराभव झाल्यानंतर त्यांनी माळशिरस तालुक्याकडे साफ दुर्लक्ष केले. काही कार्यकर्त्यांना तडीपारीचे टेंशन घेऊ नका, मी रद्द करतो म्हणाले. मात्र अजूनही तडीपारीची परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच आहे. त्यामुळे काही कार्यकर्त्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे लढवय्ये व धाडसी नेतृत्व आहे, आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत म्हटल्यावर घाबरण्याचे कारण नाही असे कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांचा केवळ निवडणुकीपुरता वापर केला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फक्त स्टंटबाजी करतात, आणि वेळेनुसार कार्यकर्त्यांशी संबंध ठेवतात. त्यामुळे स्वतःच्या हिंमतीवर लढा, स्टंटबाजच्या नादी लागून आपला वापर होऊ देऊ नका असे मोहिते पाटील विरोधकांतून बोलले जात आहे.