उत्तम जानकरांची आमदारकी म्हणजे नाकापेक्षा मोती जड!
जानकरांना आमदार करुन मोहिते पाटील आपल्या पायावर धोंडा मारुन घेतील का?
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): शिवरत्नवरील मोहिते पाटलांनी २०१९ साली भाजपात प्रवेश केल्यानंतर माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे आयात उमेदवार रामभाऊ सातपुते यांना मोहिते पाटलांनी आमदार केले. मात्र ते काही काळातच मोहिते पाटलांना डोईजड झाले. उत्तम जानकर तर माळशिरस तालुक्यातीलच उमेदवार आहेत, मग त्यांना शरद पवार व त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे मोहिते पाटलांनी उत्तम जानकरांना आमदार केल्यास नाकापेक्षा मोती जड अशी त्यांची अवस्था होईल. त्यामुळे उत्तम जानकरांना आमदार करुन मोहिते पाटील स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतील का? अशी चर्चा माळशिरस तालुक्यातील राजकीय जाणकारांतून होताना दिसत आहे.
उत्तम जानकर हे संधीसाधू राजकारणी आहेत. मोहिते पाटलांच्या विरोधात बोलून त्यांनी आमदार संजय शिंदे व प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवारांची ताकद वापरली. शिंदे बंधू व परिचारक यांचेकडून जानकरांनी भरभरून मदत घेतली. मात्र कालांतराने त्यांनी आमदार संजय शिंदे व प्रशांत परिचारक यांच्याच विरोधात काम केले. तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आपले जुने सहकारी मित्र व लढवय्ये नेतृत्व म्हणून उत्तम जानकरांना वेळोवेळी सहकार्य करीत असल्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर व मोहिते पाटलांमध्ये दुरावा निर्माण झाला. परंतु ऐन लोकसभा निवडणुकीत आमदारकीसाठी उत्तम जानकरांनी आपले विरोधक मोहिते पाटलांशी जुळवून घेत ज्यांनी आपल्याला सांभाळले त्याच रणजितसिंह नाईक निंबाळकरच्या विरोधात काम केले. ज्यांची मदत घ्यायची त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसायचा या जानकरांच्या कुटनीतीमुळे कट्टर मोहिते पाटील विरोधकांचा त्यांच्यावर तिळमात्र विश्वास राहिलेला नाही. मग आपण आमदार केल्यावर उत्तम जानकर आपल्याशी तरी प्रामाणिक राहतील का? अशी भीती मोहिते पाटलांना वाटणे साहजिकच आहे. आणि मोहिते पाटलांनी उत्तम जानकरांना आमदार केल्यास हळूहळू माळशिरस तालुक्याचे सत्ताकेंद्र गरुड बंगला झाल्याशिवाय राहणार नाही. २०१९ साली भाजपाने लादलेल्या रामभाऊ सातपुते यांना आमदार करून मोहिते पाटलांनी जी चूक केली ती चूक भविष्यात ते कधीच करणार नाहीत. कारण आमदार रामभाऊ सातपुते बाहेरचे असून सुद्धा डोईजड झाले, उत्तम जानकर तर तालुक्यातील आहेत. मग सत्तेच्या माध्यमातून ते मोहिते पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करणारच अशी माळशिरस तालुक्यात चर्चा सुरू आहे.
दरम्यान शरद पवार व मोहिते पाटलांनी उत्तम जानकरांना विधानसभा निवडणुकीत आमदार करण्याचा शब्द दिला असला तरी माळशिरस तालुक्यातील बौध्द व मातंग समाजात तीव्र नाराजी आहे. कारण धनगर-खाटीक या एससी समाजाच्या बोगस दाखल्यावर जातचोर उत्तम जानकर यांनी एससी प्रवर्गात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा २००९ पासून एससी प्रवर्गासाठी २५ वर्षे म्हणजे पाच टर्म राखीव आहे. त्या २५ वर्षांपैकी गेली १५ वर्षे म्हणजे तीन टर्म चर्मकार या एकाच जातीचे आमदार माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले आहेत. तर बौद्ध व मातंग हे लोकसंख्येने जास्त असूनही या दोन्ही जातींना जाणीवपूर्वक सत्ताधारी मोहिते पाटलांनी आमदारकीपासून वंचित ठेवले आहे. आमदार रामभाऊ सातपुते यांचे नाव भाजपाश्रेष्ठींकडून आलेले असले तरी तत्पूर्वी मोहिते पाटलांनी डॉ. विवेक गुजर या चर्मकार समाजातील व्यक्तीला उमेदवारी दिली होती. त्यामुळे मोहिते पाटलांनाही बौध्द व मातंग समाजाबद्दल पुळका आहे असे नाही. बौध्द व मातंग समाजाच्या उमेदवारीबद्दल ‘सब एकही थाली के चट्टे बट्टे हैं।’ असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. माळशिरस विधानसभा मतदारसंघ आता केवळ दहा वर्षे म्हणजे दोन टर्मच राखीव राहिलेला आहे. त्यामुळे एक टर्म बौध्द व एक टर्म मातंग समाजाला आमदारकी मिळावी यासाठी माळशिरस तालुक्यात जोरदार हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उत्तम जानकरांना माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास बौध्द व मातंग समाजातील उद्रेकाचा तीव्र फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसू शकतो. त्यामुळे उत्तम जानकरांच्या उमेदवारीबद्दल शरद पवार व मोहिते पाटलांना विचार करावाच लागेल. तसेच माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उत्तम जानकर आमदार झाले तर त्यांची आमदारकी मोहिते पाटलांसाठी नाकापेक्षा मोती जड याप्रमाणे ठरेल. मोहिते पाटलांच्या सत्तास्थानाला यामुळे हादरे बसतील. त्यामुळे मोहिते पाटीलही उत्तम जानकरांना आमदार करुन आपल्या पायावर धोंडा मारुन घेणार नाहीत अशा प्रतिक्रिया माळशिरस तालुक्यातील राजकीय जाणकारांतून उमटत आहेत.