तत्कालीन महापालिका आयुक्तांमुळे महापालिकेची प्रतिमा मलीन!
उच्चस्तरीय चौकशी करण्याची डॉ. रमेश शेलार यांची मुख्य सचिवांकडे मागणी
पुणे (बंडखोर वृत्तसेवा): तत्कालीन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यामुळे महापालिकेची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे या प्रकारची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रभारी पर्यावरण व्यवस्थापक (अकार्यकारी) डॉ. रमेश शेलार यांनी राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडे केली आहे.
डॉ. शेलार यांच्या पत्रानुसार पुणे महानगरपालिकेचे हद्दीमधील कल्याणीनगर या ठिकाणी असलेले बॉलर पब व इतर पब विषयी प्रसार माध्यमामध्ये बातमी प्रसिद्ध झालेली आहे. प्रसिद्ध केलेल्या बातमीमध्ये विक्रम कुमार, तत्कालीन महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका व इतर यांचे बॉलर पबचे मालक यांच्या समवेत उपस्थित असलेला फोटो आलेला आहे. बॉलरसह १४ पबवर कारवाई केल्याची बातमी प्रसिद्ध झालेली आहे. बातमीमध्ये “एरवी कुणालाही सहज न भेटणारे” या लिखाणावरून सर्व सामान्य पुणेकर नागरिक व महानगरपालिकेतील आजी-माजी अधिकारी/कर्मचारी यांना महापालिकेच्या तत्कालीन महापालिका आयुक्त यांच्या वर्तनाविषयी शंका निर्माण होणेस वाव मिळत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांचे कार्यकाळात सेवकांचे गैरवर्तन या संबंधी केलेल्या शिक्षा याबाबत शंका निर्माण होत आहे. तसेच विक्रम कुमार व इतर अधिकारी आणि बॉलर पबचे मालक यांच्या समवेत उपस्थित असलेला फोटोसह प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे पुणे महानगरपालिकेची प्रतिमा मलीन झालेली आहे. त्यामुळे या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी डॉ. शेलार यांनी केली आहे. यापूर्वीही अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्कालीन आयुक्त विक्रमकुमार यांच्यावर कारवाई करण्यासाठी निवेदने दिली होती. मात्र त्यांच्यावर बड्या राजकीय धेंडांचा आशीर्वाद असल्याने त्यांचेवर कारवाई केली नाही. मात्र आता तरी त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी अशा प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांतून उमटत आहेत.