शिवरत्नचे कवचकुंडल बनून प्रतापगडाला काय मिळालं?
एकेकाळी शिवरत्न सत्तेच्या यशोशिखरावर होता, मात्र शिवरत्नला यशोशिखरावर पोहोचविणारा प्रतापगड संधी मिळूनही सत्तेपासून उपेक्षितच राहिला. त्याचे प्रमुख कारण म्हणजे बंधूप्रेम! माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील या आपल्या बंधूच्या प्रचारासाठी भाजपाकडे मुलासाठी आमदारकीचा मोबदला मागतात, तर विजयसिंह मोहिते पाटलांच्या सांगण्यावरून एका क्षणात स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील खासदारकीचा राजीनामा देतात. यावरूनच स्व. प्रतापसिंह आपल्या बंधूवर किती प्रेम करीत होते, तर विजयसिंह आपल्याच या बंधूशी किती व्यावहारिक वागत होते हे दिसून येते. विरोधकांनी शिवरत्नचा नाद केला तर क्षणाचाही विलंब न करता विरोधकांच्या दारात जाऊन त्यांची जिरविण्याची धमक स्व. प्रतापसिंह मोहिते पाटलांमध्ये होती. मात्र हयातभर शिवरत्नचे कवचकुंडल बनून प्रतापगडाला काय मिळालं? तर याचं उत्तर शून्यच असेल.
स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील हे धाडसी व सडेतोड व्यक्तिमत्त्व होते. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. म्हणूनच त्यांना स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर डीसीसी बॅंकेचे चेअरमन व्हावे असे वाटत होते. मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांनी पुत्रप्रेमापोटी त्यांना विरोध करुन डीसीसी बॅंकेच्या चेअरमनपदी रणजितसिंह मोहिते पाटील यांची निवड केली. शिवरत्नला कुणी डिवचले तर स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील तात्काळ धावून जात असत. रणजितसिंह मोहिते पाटलांच्या गाडीवर बाभूळगावमध्ये दगडफेक झाल्यानंतर त्या कार्यकर्त्यांच्या प्रमुख नेत्याकडेच जाऊन निर्वाणीचा इशारा दिला होता. सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटलांना कुणी भिडले तर त्यांचा बंदोबस्त स्व. प्रतापसिंह मोहिते पाटलांनी करायचा, मात्र सत्तेचा सारा मलिदा प्रतापसिंहांना वगळून आपापसात वाटून खायचा हेच शिवरत्नचे धोरण होते. माळशिरस तालुक्यातील कुणी शिवरत्नवरील मोहिते पाटील परिवाराशी पंगा घेतला तर प्रत्येकजण धवलसिंह यांची भीती दाखवायचा. अशा पध्दतीने शिवरत्नवरील मोहिते पाटलांनी डॉ. धवलसिंह मोहिते पाटलांची जनमाणसात गुंड म्हणूनच प्रतिमा बनवली. डॉ. धवलसिंह हे ठोकून काढायचे, पण गावगुंडांना, मुलींची महिलांची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना. मात्र शिवरत्नने हेच भांडवल करुन डॉ. धवलसिंह यांची गुंड म्हणून प्रतिमा तयार करून त्यांना राजकारणातून अलिप्तच करण्याचा प्रयत्न केला. स्व. प्रतापसिंह मोहिते पाटलांनी ठरवले असते तर ते आज भाजपातील खूप मोठे नेते झाले असते. सोलापूरातून भाजपाकडून लोकसभेच्या पोटनिवडणुकीत स्व. गोपीनाथ मुंडे यांनी विजयसिंह मोहिते पाटलांना फोन करून प्रतापसिंह मोहिते पाटलांच्या प्रचारासाठी बोलावले. तेव्हा आपल्या या सख्ख्या भावाच्या प्रचारासाठी येताना यात माझा काय फायदा? असे ते म्हणाले. त्यांची ही भूमिका पाहून बोला तुमची काय अपेक्षा आहे? असे मुंडे यांनी म्हणताच मला माझ्या रणजितसिंहसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची बिनविरोध आमदारकी पाहिजे असे ते म्हणाले. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी त्यांची ही मागणी मान्य करून स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील निवडून आल्यानंतर पूर्णही केली. परंतु शरद पवारांच्या सांगण्यावरून विजयसिंह मोहिते पाटलांनी खासदार झालेल्या प्रतापसिंहांकडे राजीनामा द्यावा अशी मागणी करताच त्यांनी तात्काळ राजीनामा दिला.
२००३ साली लालकृष्ण अडवाणी रथयात्रा काढून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे नांव जाहीर करायला आले होते. तेव्हा विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले की, तुझे नांव अडवाणीने जाहीर केले तरी तू उभे रहायचे नाही, मला मोठे व्हायचे आहे. प्रतापसिंहांच्या लोकप्रिय राजकीय इमेज आणि ताकदीचा उपयोग विजयसिंहांनी स्वतःला सत्ता मिळविण्यासाठी केला. मात्र प्रतापसिंहांना त्यांच्या हक्काचे मिळू दिले नाही. जे मिळाले ते लोकांनी विजयसिंहांना न जुमानता मिळवून दिले. प्रत्येक ठिकाणी विजयसिंहांनी अडवणूकच केली. यादरम्यान प्रतापसिंहांनी तुमचा भाऊ म्हणून जन्माला येऊन खूप मोठे पाप केले काय? असा प्रश्न उपस्थित होतो.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या वेळी १९९२ सालीही प्रतापसिंहांना विरोधच केला. १९९७ ला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आमदारकीसाठी प्रतापसिंहांचे एकमेव नाव होते तिथेही त्यांना आमदार होऊ दिले नाही. दरवेळी त्यांनी स्वतःसाठी माघार घ्यायला लावली आणि त्यानंतर रणजितसिंह यांना आमदारकी बिनविरोध द्यायला लावली. आता तीच खेळी डॉ. धवलसिंह यांच्या बाबतीत खेळली जात आहे. प्रत्येक ठिकाणी अडवायचे, त्यांना त्यांच्या हक्काचेही मिळवून द्यायचे नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा, खोट्या केसेस करायच्या. प्रतापसिंह यांनी मोठा भाऊ म्हणून सर्व शब्दांचा मान ठेवला. तेच धवलसिंहांनी पण करावे असे शिवरत्नला वाटत आहे. त्यांना मोठे होऊ द्यायचे नाही. २०१२ साली डॉ. धवलसिंह मोहिते पाटलांना पंचायत समितीच्या निवडणुकीतून राजकारणात सक्रीय करण्याचा निर्णय स्व. प्रतापसिंह मोहिते पाटलांनी घेतला. तेव्हा धैर्यशील मोहिते पाटलांनी यास तीव्र विरोध करुन अकलूज गणावर आपला दावा सांगितला. तिथूनच भगवा झेंडा हाती घेऊन डॉ. धवलसिंह यांनी शिवसेनेच्या माध्यमातून स्वतंत्रपणे राजकारणाला सुरुवात केली. मात्र डॉ. धवलसिंहांनी राजकारणात यशस्वी होऊच नये यासाठी शिवरत्न नेहमी रणनिती आखत गेला. २०१२ साली पंचायत समितीच्या निवडणुकीत धैर्यशील यांनी डॉ. धवलसिंहांना विरोध करुन स्वतःकडे सभापतीपद घेतले. शंकर कारखाना खोटी खेळी करून ताब्यात घेतला व रणजितसिंह यांना चेअरमन केले. स्व. प्रतापसिंहांच्या त्यागाचे प्रतापगडाला हेच का फळ? परंतु या सर्वांशी त्यांच्या रडीच्या डावाला डॉ. धवलसिंह एकटे पुरून उरतायत. आपल्याच भाऊबंदकीच्या विरोधात ते एकाकीपणे लढत आहेत. २०१९ च्या माढा लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना १,१६,००० चे लीड मिळाले. ते आम्ही म्हणजेच शिवरत्ननेच दिले असे सांगतात. मग २०२४ साली उत्तम जानकर सोबत असतानाही धैर्यशील यांना ७०,००० लीड कसे मिळाले? म्हणजेच माळशिरस तालुक्याने धैर्यशील यांना पाहिजे तेवढी साथ दिली नाही. ५० टक्के लीड कमी झाले.
डॉ . धवलसिंह हे स्व. प्रतापसिंह मोहिते पाटलांच्या तालमीत तयार झालेले धाडसी नेतृत्व आहे. सध्या ते कॉंग्रेस (आय) चे सोलापूर जिल्हाध्यक्ष आहेत. २०१९ साली माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांनी अकलूजसह परिसरातील गावे पिंजून काढली होती. तर २०२४ सालीही उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांनी अकलूजसह परिसरात होम टू होम प्रचार करून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन केले होते. स्व. प्रतापसिंह मोहिते पाटलांनी शिवरत्नचे न ऐकता त्याचवेळी भाजपाच्या माध्यमातून सत्ता उपभोगली असती तर आज प्रतापगड सत्तेच्या यशोशिखरावर पोहोचला असता. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे एकाकी झुंज देत आहेतच! पण शिवरत्नचे कवचकुंडल बनून प्रतापगडाच्या वाट्याला केवळ संघर्षच आला. सत्तेपासून उपेक्षित राहणे हीच प्रतापगडाला त्यांच्या त्यागाची पावती मिळाली. तूर्तास इतकेच!
गौतम भंडारे, संपादक, साप्ताहिक बंडखोर