वसूलदार निकम यांच्या कृपाशीर्वादाने वाळूमाफिया मोकाट!
अकलूज बंडखोर वृत्तसेवा): स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने महादेवाच्या पिंडीवर जसा भुजंग वेढा टाकून बसतो तसे पोलिस कर्मचारी निकम अकलूजमध्ये ठाण मांडून बसले आहेत. कारण त्यांची कुठेही बदली झाली तरी राजकीय वरदहस्ताने ते पुन्हा अकलूजमध्येच आलेले आहेत. आणि आता तर त्यांच्या हाती तिजोरीच्या चाव्या आल्यात असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण आता अकलूजसह परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची वसुली करण्यासाठी त्यांची नेमणूक झालेली आहे. अकलूजसह परिसरात सुरू असलेल्या इतर अवैध धंद्यांसह वाघोली, वाफेगांव, संगम, जांभूड याठिकाणी वाळूतस्करी करीत असलेल्या वाळूमाफियांवर वसूलदार निकम यांचा कृपाशीर्वाद असल्याने वाळूमाफिया मोकाट असल्याचे दिसत आहे.
अकलूज म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. म्हणून तर निकम यांना दररोज सोन्याचे अंडे देणारे अकलूज सोडू वाटत नाही. ड्युटीवर असताना काही मोहिते पाटील समर्थक कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे केल्यानंतर त्यांची अकलूजमधून इतरत्र बदली करण्यात आली होती. मात्र निकम हे स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याने त्यांना पुन्हा अकलूजला आणून त्यांची वसूलदार म्हणून नियुक्ती केली आहे. अकलूजमध्ये २० वर्षांच्या आसपास कार्यकाळ घालविल्याने वसूलदार निकम यांना अकलूजसह परिसरातील अवैध धंद्यांची व गावगुंडांची नस ना नस माहिती आहे. निकम यांचे स्थानिक सत्ताधाऱ्यांशी अत्यंत सलोख्याचे संबंध असल्याने इतर वसूलदारांपेक्षा त्यांचा मानमरातब वाढलेला दिसत आहे. त्याचबरोबर बहुसंख्य वाळूमाफिया हे सत्ताधाऱ्यांचेच कार्यकर्ते असल्याने निकम व त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे या वाळूमाफियांवर निकम यांचे विशेष लक्ष आहे. या बदल्यात त्यांना मुबलक लक्ष्मीदर्शन तर होतेच. पण अधिक कार्यकाळ झाल्यामुळे कुठून कशी सूत्रे हलवायची व आपले इप्सित कसे साध्य करायचे? याचाही दांडगा अभ्यास त्यांचा झालेला आहे. वाळूमाफिया वाघोली, वाफेगांव, संगम, जांभूड याठिकाणाहून अवैधरित्या बेसुमार वाळूतस्करी करीत असतानाही वसूलदार निकम लक्ष्मीदर्शनापोटी त्यांना मोकळीक देत असल्याने शासनाचा महसूल तर बुडतोयच, परंतु नदीपात्राचीही वाट लागत आहे. वाळूतस्करीला खतपाणी घालण्याबरोबरच वसूलदार निकम यांच्या राज्यात चाललंय काय? याचा इतिवृत्तांत समोर येईलच, परंतु अकलूजमध्ये गेल्या २० वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या, गावगुंडांशी सलोख्याचे संबंध ठेवून त्यांच्या गैरकृत्यांना खतपाणी घालणाऱ्या वसूलदार निकम यांची तात्काळ बदली व्हावी अशी जनतेतून मागणी होत आहे. (क्रमशः)