‘झुकेगा नहीं साला|’
पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व कार्यतत्पर आमदार रामभाऊ सातपुते यांचा पराभव झाल्यानंतर शिवरत्नवरील मोहिते पाटलांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. आपण खासदार झाल्यामुळे आता महाराष्ट्रात शिवरत्न पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी सज्ज झाला आहे, तर आपले विरोधक पुन्हा शक्तिहीन होऊन निपचित पडले असे त्यांना वाटत असले तरी ‘एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही’ अशी ग्रामीण भागात एक म्हण आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार रामभाऊ सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटलांची मक्तेदारी मोडीत काढत त्याठिकाणी स्वाभिमानी कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण करण्यावर भर दिला होता. माळशिरस तालुक्याला मोहिते पाटलांच्या दहशतीतून, गुलामगिरीतून मुक्त करण्यास त्यांनी सुरूवात केली होती. पण तुतारीच्या हवेत या दोन्ही लढाऊ, दबंग लोकप्रिय लोकप्रतिनिधींचा पराभव झाला असला तरी एका पराभवाने त्यांचे नेतृत्व संपेल इतके ते कमकुवत नाहीत. परिणामी सत्ता कुणाचीही असो, ते कधीही डगमगणार नाहीत, हार मानणार नाहीत. त्यामुळे मोहिते पाटील विरोधकांनी ‘झुकेगा नही साला’ ही भूमिका घेऊन स्वाभिमानी, लढाऊ खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार रामभाऊ सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ देणे गरजेचे आहे.
धैर्यशील मोहिते पाटील खासदार झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी भैय्याजी असा ट्रेंड सुरू करून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार रामभाऊ सातपुते यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीका करायला सुरूवात केली आहे. आमदार रामभाऊ सातपुते यांना बीडचं पार्सल असे संबोधून मोहिते पाटील एकप्रकारे भारतीय संविधानाने दिलेल्या हक्क आणि अधिकाराच्या विरोधात वक्तव्य करीत आहेत. कारण कुठल्याही व्यक्तीला महाराष्ट्रात कुठूनही निवडणूक लढविण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे. माळशिरस तालुक्यावर काय तुमचाच शिक्का मारलेला नाही! व्यक्ती कुठली आहे हे पाहण्यापेक्षा ती कर्तृत्ववान आहे की, केवळ जनतेला गाजर दाखविणारी आहे हे पाहणे महत्वाचे असते. बाहेरचा उमेदवार मतदारसंघाचा विकास करू शकत नाही या वाक्याला कर्तव्यदक्ष आमदार रामभाऊ सातपुते यांनी मोडीत काढले आहे. माळशिरस तालुक्यात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळताच रामभाऊ सातपुते यांनी आपल्या मतदारसंघाचा न भूतो न भविष्यति असा विकास केला आहे. हीच मोहिते पाटलांची पोटदुखी आहे. तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निरा देवधर पाण्याचा प्रश्न, रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच माढा लोकसभा मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. ते पण मोहिते पाटलांना विश्वासात न घेता! वास्तविक पाहता आमदार असो की खासदार असो मोहिते पाटलांना विचारल्याशिवाय आपल्या मतदारसंघात कामे करायची नाहीत असा मोहिते पाटलांचा नियमच होता. मात्र या जोडीने मोहिते पाटलांना न जुमानता आपल्या मतदारसंघात विकासकामांचा पाऊस पाडल्याने आपले अस्तित्व संपतेय की काय या भीतीपोटी मोहिते पाटलांच्या मनामध्ये सुप्त भीतीचे सावट होते. म्हणूनच धैर्यशील मोहिते पाटलांनी खासदारकीसाठी आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान मोहिते पाटलांनी ३०-३५ वर्षे सत्ता उपभोगून काय दिवे लावले? ते माळशिरस तालुक्यात एमआयडीसी आणू शकले नाहीत, कोथळे-कारूंडे याठिकाणी एमआयडीसी मंजूर झालेली यांनी रद्द करायला लावली. सत्तेच्या दबावतंत्राचा वापर करून सयाजीराजे वॉटरपार्कला बेकायदेशीर मंजुरी मिळवली असे मोहिते पाटलांच्याच जवळच्या कार्यकर्त्याने आम्हाला सांगितले आहे. सुमित्रा पतसंस्था व विजय नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून अनेकजणांना देशोधडीला लावले, विजय शुगरला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत, विजय शुगर हा कारखाना नीट सांभाळता आला नाही म्हणून सोलापूर डीसीसी बँकेच्या थकीत कर्जापोटी नाईलाजाने त्याचा लिलाव करावा लागला. चार टाळकी सांभाळली म्हणजे जनतेचा विकास होत नसतो. सत्तेच्या माध्यमातून मोहिते पाटलांची सुरू असलेली मनमानी, दहशत व मक्तेदारी मोडीत काढण्याचे काम खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार रामभाऊ सातपुते यांनी सुरू केले होते. म्हणूनच या दोन लढाऊ लोकप्रतिनिधींना मोहिते पाटलांनी प्रखरपणे विरोध करायला सुरूवात केली होती. आजपर्यंत सत्तेचा वापर करून मोहिते पाटलांनी अनेकांच्या संसाराची राखरांगोळी केली होती. काहींना संपवले, काहींना गाव सोडून जायला मजबूर केले, तर काहींना जेलमध्ये सडवले. अशाच शोषित, अत्याचारी लोकांना ताकद देण्यास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुरूवात केली होती. मोहिते पाटलांची ठोकशाही, हिटलरशाही मोडीत काढायला सुरूवात केली होती. मात्र तुतारीच्या वाऱ्यात त्यांचा पराभव झाला. परंतु खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे रावडी नेतृत्व आहे. ते कुणालाही न घाबरणारे, सडेतोड भूमिका घेऊन जनतेसाठी लढणारे नेतृत्व आहे. त्यांच्या पराभवानंतर मोहिते पाटील समर्थक खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना वीरप्पनची उपमा देत असले तरी हे वीरप्पन शिवरत्नची मक्तेदारी, दहशत, हिटलरशाही, ठोकशाही संपविण्यासाठी सदैव माळशिरस तालुक्यातील जनतेसोबत असणार आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार रामभाऊ सातपुते म्हणजे शोलेमधील ‘जय विरू’ची जोडी आहे. ही जोडी माळशिरस तालुक्यातील गब्बरची दहशत मोडीत काढण्यासाठी सदैव आपल्यासोबत असल्याने मोहिते पाटील विरोधकांनी खचून जाऊ नये. इतकेच!