उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील बेदखल
अकलूजमध्ये पुष्पगुच्छ घेऊन स्वागतासाठी थांबलेल्या रणजितसिंहांकडे ना. फडणवीसांनी फिरवली पाठ
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): रणजीतसिंह मोहिते पाटील हे भाजपाचे आमदार असतानाही त्यांचा भाऊ भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. यादरम्यान रणजितसिंहांचे वडील विजयसिंह मोहिते पाटील, मुलगा विश्वतेजसिंह यांच्यासह त्यांच्या घरातील सर्वजण धैर्यशील यांचा प्रचार करीत असताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी अकलूजला आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यासाठी अकलूज बायपासला आमदार रणजितसिंह मोहिते पाटील पुष्पगुच्छ घेऊन थांबले होते. मात्र आपल्या पाठीत खंजीर खुपसून पुन्हा अकलूज नगरीत पुष्पगुच्छ घेऊन थांबलेल्या रणजितसिंहांना बेदखल करुन ना. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे पाठ फिरविली. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलांचा पुष्पगुच्छ सुकला तशीच शिवरत्नची राजनिती कोमेजून गेल्याचे दिसत आहे.
आमदार रणजितसिंह हे भाजपाचे आमदार आहेत. त्यामुळे तालुक्यातील भाजपाच्या सभेचे नियोजन त्यांनीच पुढाकार घेऊन करणे आवश्यक होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचे नियोजन आणि व्यवस्थापनात आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांचा सहभाग का नाही? रणजितसिंह मोहिते पाटील हे भारत देशातील आणि महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत की ते भाजपश्रेष्ठी आपल्या तालुक्यात व गावात असताना विरोधकांसारखे वागले आहेत. भाजपाच्या कोट्यातून आमदारकी मिळवायची आणि विरोधकांची बाजू भक्कम करण्याचे काम आमदार रणजितसिंह यांच्याकडून होत असल्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गुच्छ स्विकारला नाही. रणजीतसिंह मोहिते पाटील हे भाजपाचे आमदार असताना ते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात काम करुन धैर्यशील यांना मदत करीत असल्याने भाजपा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा एक गट आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांच्या विरोधात आक्रमक झाला असून त्या गटाने आमदार रणजितसिंह यांची पक्षातूनच हकालपट्टी करण्याची मागणी ना. फडणवीस यांच्याकडे केली आहे. वास्तविक पाहता राजकारणात तुम्ही ज्या पक्षात असता त्या पक्षाच्या विचारधारेशी पद आहे तोवर तरी एकनिष्ठ राहिले पाहिजे असा अलिखित संकेत आहे. पण रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपाश्रेष्ठींच्या पाठीत खंजीर खुपसून आपले बंधू धैर्यशील यांनाच मदत करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या भाऊबंदकीला मदत करणाऱ्या रणजितसिंहांकडे एक तर संस्था आहे का? त्यांच्याकडे संस्था आणि संघटन कुठे आहे? सर्व संस्थांवर जयसिंहांनी मजबूत पकड ठेवली आहे. पण भाजपाने शंकर साखर कारखान्याला मदत केल्यामुळे तो कारखाना तरी रणजितसिंहांना मिळाला, आमदारकी मिळाली. तरीही रणजितसिंहांनी भाजपा पक्षश्रेष्ठींच्या पाठीत खंजीर खुपसल्याने मग भाजपाश्रेष्ठी रणजितसिंहांना आपल्याजवळ कसे उभे करतील? भाजपाशी गद्दारी करूनही रणजितसिंह मोहिते पाटील अकलूजमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणल्यानंतर आपल्यावर कृपादृष्टी रहावी म्हणून त्यांचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन थांबल्यानंतर त्यांच्यासमोरून उपमुख्यमंत्री महोदयांचा ताफा त्यांना बेदखल करून निघून गेला. त्यामुळे “राजकारणात राजकारण्यांनी आमदार रणजितसिंहासारखे दोन डगरीवर हात ठेवून राहिले तर गावातही इज्जत राहत नाही.” हा शिवरत्नसाठी एक संदेश आहे असे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.