शरद पवारांना धैर्यशील यांच्या माध्यमातून माढ्याचा बिहार करायचा आहे का?
३१ गुन्हे दाखल असणाऱ्या धैर्यशील यांना उमेदवारी
माढा (बंडखोर वृत्तसेवा): निकोप लोकशाहीसाठी राजकारण आणि गुन्हेगारी यांची फारकत असणे अत्यंत महत्वाचे आहे. मात्र शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देऊन गुन्हेगारांचे उदात्तीकरण केलेले आहे. धैर्यशील यांना उमेदवारी देताना त्यांनी सदरच्या उमेदवाराचे क्रिमिनल रेकॉर्ड तपासले नव्हते का? तसेच अख्ख्या देशाची खबर ठेवणाऱ्या शरद पवारांना धैर्यशील यांच्या गुन्हेगारी कृत्याचा मागमूसही कसा लागला नाही? अकलूजच्या पोलिस स्टेशनमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांवर तब्बल ३१ गुन्हे दाखल आहेत. गुन्हा स्वरूप गंभीर, अती गंभीर, फसवणूक करणे, मारहाण, जीवे मारण्याचा प्रयत्न, दहशत निर्माण करणे, धमकाविणे असे अनेक गुन्हे धैर्यशील यांच्यावर दाखल असताना त्यांना उमेदवारी देऊन शरद पवारांना माढ्याचा बिहार करायचा आहे का? तसेच भारतीय राजकारण ही गुंडाची शेवटची पायरी तर शरद पवारांना बनवायची नाही ना? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडीओ भर सभेत लावण्याअगोदर आपल्या माढा मतदार संघातील उमेदवाराने निवडणूक फॉर्म भरताना त्याच्यावर दाखल असणाऱ्या गुन्ह्यांचे पुरावे सुध्दा जोडले होते. शरद पवारांना माढ्याची उमेदवारी काही स्वच्छ चारित्र्य आणि उच्च विद्याविभूषित युवकांनी मागितली होती. सांगोल्याचे शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख असतील, संजीवराजे निंबाळकर असतील अशा अनेकांना डावलून धैर्यशील यांना उमेदवारी देताना शरद पवारांनी नेमके निकष काय लावले? धैर्यशील मोहिते पाटलांवर एकूण ३१ गुन्हे दाखल आहेत. २०१८- २ गुन्हे, २०१९- ६ गुन्हे, २०२०- ९ गुन्हे, २०२२- ११ गुन्हे, २०२३- ३ गुन्हे. एकूणच चंबळ खोरे येथील डाकूंवर सुध्दा एवढे गुन्हे नसतील हे मुरब्बी आणि अभ्यासू शरद पवारांना समजले नाही का? जनतेला छळणारे आणि खुनशी राजकारण करणाऱ्यांचे कधीच भले होत नसते, कारण त्यांनी स्वतःचा वेळ लोकांचे शाप मिळविण्यातच खर्च केलेला असतो. एकंदरीत उमेदवाराची वरील पार्श्वभूमी पाहता धैर्यशील यांना माढ्यातून निवडून आणून शरद पवारांना माढ्याचा बिहार करायचा आहे का? असा सर्वसामान्यांना प्रश्न पडलेला आहे. दरम्यान धैर्यशील यांनी फॉर्ममध्ये नोकरी, व्यवसाय, शेती याचा उल्लेख का केला नाही? आपली संपत्ती १२ कोटी दाखवत असतील तर विजय शुगरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे बील का अदा केले नाही? विजय नागरीचे ठेवीदार देशोधडीला लागले त्यांच्या ठेवी का अदा केल्या नाही? हा माढा मतदार संघातील जनतेचा, मतदारांचा शरद पवारांना खडा सवाल आहे. हत्तीचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात, त्याप्रमाणेच धैर्यशील मोहिते पाटलांचा खरा चेहरा वेगळा आहे. तो चेहरा निवडणूक आयोगासमोर कधी येणार? असे जनतेतून बोलले जात आहे.