धनगर समाजासह सर्व पक्षीय नेत्यांच्या जानकरांच्या निर्णयावरील बहिष्कारामुळे धैर्यशील यांचा पराभव अटळ!
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): उत्तम जानकरांची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरसारखी झाली आहे. ज्या तमाशाला गावाच्या बाहेर काढायचे होते त्याच फडात तुणतुणं वाजवायची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. ऑक्सिजन असो की राजकारणातील जगत असलेले विचार, पातळी खाली आली की धोका वाढतो. अगदी तेच जानकरांचे झालेले आहे. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी मोहिते पाटलांनी जानकरांना मतांच्या जोगव्यासाठी जवळ केले. जानकरांनी
धैर्यशील यांना पाठींबा जाहीर केला. मात्र स्वाभिमानी बाण्याच्या विरोधकांनी “खुडूस” गावात सर्व पक्षीय बैठक घेतली .माळशिरस तालुक्याच्या ४५ गावातून धनगर समाजातील स्वाभिमानी नेत्यांनी आपला स्वाभिमानाचा सुर्य कधी मावळू द्यायचा नाही. तो स्वाभिमानाचा सुर्य अधिक तेजाने प्रज्वलित करण्याचा ठाम निर्धार केला. संधीसाधू, मतलबी, स्वार्थी जानकरांच्या निर्णयावर ४५ गावातील धनगर समाजातील सरपंच, उपसरपंचांसह सर्व पक्षीय नेत्यांनी बहिष्कार टाकल्याने धैर्यशील यांचा पराभव अटळ आहे असे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.
ऍड. सोमनाथ वाघमोडे यांनी विविध नेते व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर सदरची बैठक आयोजित केली होती. (आम्ही यापूर्वी लिहले होते, जानकर मोहिते पाटलांकडे गेले तरी पारंपारिक विरोधक आणि विरोधात मतदान करणारा वर्ग आजही मोहिते पाटलांच्या विरोधात ठाम आहे.) भारतीय राजकारणाचे एक वैशिष्ट्य आहे, “ज्याप्रमाणे दुकानदार एकदा विकलेली वस्तू पुन्हा स्विकारत नाहीत त्याप्रमाणेच भारतीय जनता विकाऊ माणसे, मांडवली करणारे, स्वार्थासाठी तह करणारी मतलबी माणसे स्विकारत नाहीत. खुडूसच्या बैठकीत घराणेशाहीच्या राजकारणाच्या अंताचा प्रारंभ झाला. खुडूसची बैठक माळशिरस तालुक्यातील परिवर्तनीय क्रांतीला सुरूवात आहे. त्यातून समाज समुहात परिवर्तन होऊन मोहिते पाटलांची एकाधिरशाही मोडीत निघणार आहे. माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदेंना सोलापूरमधून मुलगी प्रणिती शिंदेंना दिल्लीला पाठवायचे आहे, खासदार शरद पवारांना आपली मुलगी सुप्रिया सुळेंना दिल्लीला पाठवायचे आहे, माजी उपमुख्यमंत्री
विजयसिंह मोहिते पाटलांना पुतण्याला दिल्लीला पाठवायचे आहे. महाविकास आघाडीत घराणेशाही जोपासली जात आहे. मात्र माळशिरस तालुक्याच्या भूमित घराणेशाहीला विरोध करून एक प्रगल्भ लोकशाही निर्माण करायची आहे. घराणेशाहीत स्वत:चा उदो उदो केला जातो. २०१४ मध्ये खासदार म्हणून निवडून आल्यावर हायमास्ट दिवे, पिकअप शेड, त्यावरील मोहिते पाटलांची नावे याशिवाय
कुठलाही विकास झाला नाही. मात्र २०१९ ते २०२४ पर्यंत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी निरा देवधर योजनेतून १६ गावांचा समावेश केला, २२ गावांना पाणी मिळवून दिले. तालुक्याच्या शेतकऱ्यांचे अर्थकारण शेतीवर आहे. शेतीला पाणी आवश्यक आहे हे ओळखून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य दिल्याने पाणीदार खासदार म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले.
भारतीय संसदेत कायदे तयार करायचे असतात. कायदे मोडणाऱ्यांना भारतीय संसदेत पाठवायचे का? ३१ गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगार व्यक्तीला भारतीय संसदेत पाठवायचे का? स्वच्छ चारित्र्य आणि प्रखर समाजसेवेचे व्रत घेतलेली माणसे राजकारणात आत्मविश्वासाने वावरत असतात. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांमध्ये प्रचंड आत्मविश्वास दिसत आहे. गतवेळी माळशिरस तालुक्यातून १ लाख १६ हजारांचे लीड मिळाले. यावेळी अधिक लीड मिळेल असे ते आत्मविश्वासाने सांगतात. माढा लोकसभा मतदारसंघात १९ लाख ९६ हजार १०० मतदार आहेत. ९०० गावातून हे मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढा मतदारसंघातून विजयश्री खेचून आणण्यासाठी परिश्रम घेत आहेत. माळशिरसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली तरी आमच्या मागे माळशिरस तालुक्यातील ९० टक्के लोक राहतील असे वक्तव्य करणाऱ्या जयसिंह मोहिते पाटलांच्या मुलाला त्यांच्याच अकलूजमधील एका वॉर्डात चारीमुंड्या चीत करणारे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील आणि हिंदुराव माने पाटील यांच्या बैठकीतील उपस्थितीमुळे खासदार रणजितसिंह नाईक निबाळकरांना अकलूजमधूनच लीड मिळण्याची शक्यता आहे असे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.