जानकर-मोहिते पाटलांच्या एकीमुळे वेळापूरच्या देशमुखांत संतापाची लाट!
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्यातील ४० वर्षांचे हाडवैर संपले, दोस्ताना झाला, गळाभेट झाली, जानी दुश्मनी संपली. मात्र स्वयंघोषित जाणते राजे आणि स्वयंघोषित दयावानयांनी स्वार्थी मतलबी राजकारणाचा अतिरेक केला. वेळापूरच्या साठ साहेबांना प्रश्न पडला, आपले आता काय?मोहिते पाटलांच्या कुटील राजकारणात आपला फक्त कडीपत्याप्रमाणे वापर झाला. “तू इकडे गेलास, आमच्याकडे येऊ नकोस. तू त्याच्याकडे गेला आमच्याकडे येऊ नकोस!” असे वेळापूरातील मोहिते पाटील समर्थकांना टोमणे ऐकावे लागायचे. जाणत्या राजाने कपटीपणात, खुनशीपणात पीएचडी केली आहे. पुतण्या तर त्यांचाच आदर्श ठेवतोय. दोघे एकाच माळेचे मणी आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या मतलबी काका पुतण्यांच्या कुटील राजकारणामुळे वेळापूरच्या देशमुखांची एकीची माळ विखुरली गेली असून जानकर-मोहिते पाटलांच्या एकीमुळे वेळापूरच्या देशमुखांत संतापाची लाट पसरली आहे.
उत्तम जानकर यांना धनगर समाजाचे नेतृत्व मानले जाते. मोहिते पाटलांशी चर्चा, विनिमय, बैठक, सभा घेताना जानकरांसोबत धनगर समाजातील मातब्बर नेते बरोबर होते. मात्र मोहिते पाटलांना मराठा समाजात आज तरी शून्य किंमत असल्याचे दिसून येते. माने पाटील, देशमुख परिवाराशी कट्टर शत्रूप्रमाणे वागणे, पैसा आणि सत्तेच्या धुंदीत, मस्तीत आपली माणसे शिवरत्नला कधीच समजलीच नाहीत. आता समजली तरी फार उशीर झाला आहे. शिवरत्नचे नेतृत्व पूर्वी जयसिंहांकडे होते, आता धैर्यशील यांच्याकडे आहे. आज धैर्यशील व जयसिंहांमध्ये खुनशी, कपटी व सूडबुद्धी हे समान गुण आहेत. त्यामुळे सगेसोयरे, पाहुणे यांच्यात आज तरी शिवरत्नला शून्य किंमत असल्याचे मराठा समाजात बोलले जात आहे. फक्त स्वार्थी पाहुणे स्वयंघोषित जाणत्या राजाकडे पाहुणे म्हणून आले आणि घर करून राहिले याशिवाय जिव्हाळ्याची नाती आहेत तरी का?
मोहिते पाटलांशी रक्ताचे नाते असलेल्या देशमुखांना साधा ग्रामपंचायतचा सदस्य सुध्दा ठरवता येत नाही. मोहिते पाटलांना विचारल्याशिवाय या देशमुखांना कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. मग उत्तम जानकरांना सोबत घेताना मोहिते पाटलांनी वेळापूरच्या देशमुखांना निर्णय प्रक्रियेत सामील करून का घेतले नाही? मोहिते पाटलांनी देशमुखांचा फक्त लोणच्यासारखा वापर केला आहे. ज्या देशमुखांनी आतापर्यंत मोहिते पाटलांची पालखी खांद्यावर घेऊन उत्तम जानकरांशी कट्टर विरोध केला त्या देशमुखांनी आता चार महिन्यानंतर स्वयंघोषित दयावान लोकसभेत पराभूत झाल्यावर गरूडाची पालखी खांद्यावर घ्यायची का? अशा प्रतिक्रिया वेळापूरातील देशमुखांतून उमटत असून मोहिते पाटलांच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. लोकसभेच्या पराभवानंतर येणाऱ्या विधानसभेत जानकर गरूड भरारी घेतील आणि काका पुतण्या कदाचित गरूडाच्या पालखीलाही खांदा देतील. मग जानकर आमदार झाल्यावर स्वयंघोषित जाणता राजा आनंदाने बेभान होऊन आवडता खेळ लेझिम वेळापूरच्या चौकात खेळताना दिसतील असे जनतेतून बोलले जात आहे.