राजकारण ही सेवा आहे, उत्तमराव जानकरांनी त्याचा धंदा करु नये!
वैयक्तिक नव्हे, तर मोहिते पाटील विरोधक म्हणून जानकरांना एक लाख मतं मिळाली
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या दमनशाहीला, दहशतीला, एकाधिकारशाहीला वैतागलेले लोक विरोधकांच्या शोधात असतात. या प्रस्थापितांच्या अन्याय अत्याचाराविरोधात एखाद्याने लढायला सुरूवात केली की, जनता त्याला डोक्यावर घेत असते. उत्तमराव जानकर हे प्रस्थापित मोहिते पाटलांच्या विरोधात गेल्या ३०-३५ वर्षांपासून लढत असल्यामुळेच त्यांना लोकांनी डोक्यावर घेतले. मात्र आपल्या पाठीशी असलेल्या जनमताच्या जोरावर उत्तमराव जानकर यांनी राजकारणाच्या माध्यमातून सेवा न करता त्याचा धंदा केला तर ते कुणालाही रुचणार नाही. मोहिते पाटील विरोधक म्हणून जानकरांच्या पाठीशी आलेली जनता जानकरांनी मोहिते पाटलांशी मांडवली केली तर त्यांच्या मागे कदापि जाणार नाही, कारण जनतेने वैयक्तिक जानकरांना नव्हे तर मोहिते पाटील विरोधक म्हणून मतदान केले आहे असा सूर कट्टर मोहिते पाटील विरोधकांतून निघत आहे.
राजकारण म्हणजे समाजसेवेची एक फांदीच आहे. मात्र उत्तमराव जानकरांच्या सर्व चालू घडामोडीकडे पाहिल्यावर राजकारणाला तालुक्यात मांडवलीचे स्वरूप आणणारा धुर्त आणि कावेबाज राजकारणी म्हणून जानकरांकडे जनता पहात आहे. राजकारणी हा तत्व आणि विचार जगणारा असावा, राजकारणाला बिझनेसचे स्वरूप आणणारा नसावा. शिवरत्नने २७ केसेस करून उत्तमराव जानकरांना जेरीस आणले होते. माळशिरस तालुक्यातील विरोधी पक्षातील लोकांच्या खंबीर साथीने शिवरत्नला टक्कर देताना जानकर एखाद्या योध्द्याप्रमाणे शिवरत्नशी लढताना जानकरांबद्दल महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील लोकांना अभिमान वाटत होता. परंतु योध्दा जेव्हा लढायचे सोडून तलवार म्यान करतो आणि स्वहितासाठी गुडघे टेकतो तेव्हा रणमैदानात तो एक रणछोडदास म्हणून ओळखला जातो. राजकारण म्हणजे गरीबांसाठी लढता लढता श्रीमंत होण्याचा मार्ग तर नव्हे ना? असाही प्रश्न जनतेला पडत आहे.
एकेकाळी सुमित्रा पतसंस्थेच्या भ्रष्ट आणि गलथान कारभाराबद्दल लढा उभा करणारे उत्तमराव जानकर फार मोठा मोर्चा काढणार होते. त्या मोर्चाला बी. जी. कोळसे पाटील यांना आणणार होते. मात्र शिंगणापूरच्या गेस्टहाऊसवर स्वयंघोषित दयावान, स्वयंघोषित जाणते राजे आणि गरूड एकत्र आले. तेव्हा दुसऱ्या दिवशी आंदोलन स्थगितच झाले. त्यावेळी मोर्चा का निघाला नाही? हे जनतेच्या मनात एक कोडेच राहिले. मात्र या मांडवलीच्या राजकारणात गोरगरीब भरडला गेला, चिरडला गेला. हे गरूडाला मूळीच शोभले नाही. उत्तमराव जानकरांनी दिनकर भोसले आत्महत्या प्रकरणाचेही भांडवल केल्याचा आरोप त्यांच्या काही सहकाऱ्यांनी केला. श्रीमती कल्याणी भोसले यांच्यावरही सरकारी वकील बदलण्यासाठी जानकरांनी दबाव आणला होता असे त्या प्रक्रियेत असलेल्या काही लोकांनी सांगितले. मोहिते पाटलांनी एखाद्यावर अन्याय अत्याचार केला की जानकरांनी तो विषय जास्तीत जास्त ताणायचा आणि मांडवली करायची हे पीडित कर्जदार व ठेवीदार यांच्यासह काही प्रकरणांवरुन दिसून आले आहे. आता तर गत विधानसभा निवडणुकीत पडलेल्या एक लाख मतांच्या जोरावर उत्तमराव जानकर यांनी मतांचा बाजार मांडून भाजपा व महाविकास आघाडीला झुलवत ठेवून मांडवली करण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान आपले कट्टर विरोधक मोहिते पाटील यांच्याबरोबरच समझोता करण्याचा निर्णय ते घेत असल्याचे दिसून येत आहे. उत्तमराव जानकर हे माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या खासदारकीला पाठिंबा जाहीर करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांना खास विमानाने नागपूरला बोलावले. तेव्हा आमचे बरेच विषय मार्गी लागले आहेत, गेल्या अनेक वर्षांपासूनचे कार्यकर्त्यांचे प्रश्न सुटले आहेत असे म्हणून त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. तर दुसऱ्याच दिवशी पुण्याला शरद पवारांची भेट घेण्यासाठी ते धैर्यशील मोहिते पाटील यांच्याबरोबर मांडवली करण्यासाठी गेले. यादरम्यान उत्तमराव जानकरांना माझी हक्काची एक लाख मतं आहेत असे वाटत असले तरी तो त्यांचा भ्रम आहे. कारण आमदार रामभाऊ सातपुते यांच्या विरोधात प्रचार करताना ते आरएसएसचे असून भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी आहेत असा प्रचार केला होता. तसेच ते आयात उमेदवार असल्याने त्यांच्यापेक्षा उत्तमराव जानकर बरे असे म्हणून लोकांनी त्यांना मतदान केले होते. या मतांच्या जोरावर उत्तमराव जानकर मोहिते पाटलांशी मांडवली करीत असले तरी त्यांची ही मांडवलीची भूमिका पाहून जनता मात्र त्यांच्या मागे मूळीच जाणार नाही असे दिसून येत आहे. माळशिरस तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उत्तमराव जानकर या आपल्या विरोधकांचे काम करतात म्हणून मोहिते पाटलांनी विरोधी कार्यकर्त्यांना खूप त्रास दिला आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. मग हे लोक जानकरांच्या मागे का जातील? माळीनगर कारखान्याचे चेअरमन रंजनभाऊ गिरमे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना १ लाखाचे लीड देणार असे काही दिवसांपूर्वी वक्तव्य केले आहे. तसेच के. के. पाटलांसारखा खंबीर योध्दा विरोधी पक्षाचा बुरूज लढायला सिध्द आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी अकलूजमधील जनताही मोठ्या प्रमाणात उभी राहताना दिसत आहे. पण उत्तमराव जानकर जरी तुतारीसोबत गेले तरी माढ्याच्या रणांगणात मतांचा बाजार मांडून मांडवली करणाऱ्या जानकरांच्या मागे मोहिते पाटलांचे पारंपरिक विरोधक अजिबात जाणार नाहीत असा सूर मोहिते पाटील विरोधकांतून निघत आहे.