रणजितसिंह मोहिते पाटलांची हकालपट्टी करुन भाजपाने उत्तमराव जानकरांना विधानपरिषदेवर घ्यावे!
डबल ढोलकीवाल्या रणजितसिंहांना बळ देण्यापेक्षा जानकरांना ताकद देण्याची भाजपा कार्यकर्त्यांची मागणी
माढा (बंडखोर वृत्तसेवा): रणजितसिंह मोहिते पाटलांकडे विधानपरिषदेची आमदारकी असताना माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील यांच्यासाठीही त्यांना खासदारकी हवी होती. मात्र भाजपाने एकाच घरात सत्तेचा मलिदा देण्यास नकार दिल्यानंतर धैर्यशील यांनी खासदारकीसाठी तुतारी हातात घेतली. तेव्हा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे वडील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व पुत्र विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते पाटील या उत्साही व आनंदी कार्यक्रमात सामील झाले होते. भाजपाची आमदारकी घेऊन रणजितसिंह आपल्या वडिलांना व मुलालाही थांबवू शकत नाहीत म्हणजे ही बाब खूपच हास्यास्पद आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमास उपस्थित नसले तरी त्याठिकाणी वडील आणि मुलगा अग्रस्थानी असताना रणजितसिंहांकडे भाजपाची आमदारकी ठेवण्यात अर्थ तरी काय? असा प्रश्न उपस्थित करून भाजपाने डबल ढोलकी वाजविणाऱ्या रणजितसिंह मोहिते पाटलांची तात्काळ विधानपरिषदेतून हकालपट्टी करावी व मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक उत्तमराव जानकर यांना ती आमदारकी बहाल करावी अशी मागणी भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांतून केली जात आहे.
गेल्या ३०-३५ वर्षांपासून उत्तमराव जानकर यांनी मोहिते पाटलांच्या विरोधात अविरतपणे संघर्ष केला आहे. मात्र त्यांच्या या संघर्षाला अद्यापही यश मिळाले नाही. सत्तेच्या सारीपाटात बेरजेचे राजकारण करण्याच्या नादात भाजपाने २०१९ साली मोहिते पाटलांना ताकद देऊन राजकीय अस्तित्व संपत चाललेल्या शिवरत्नला नवसंजीवनी दिली. परंतु भाजपाने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर बळ आलेल्या शिवरत्नने पुन्हा एकदा भाजपाच्या विरोधात भूमिका घेऊन शरद पवारांची तुतारी हातात घेतल्यानंतर उत्तमराव जानकरांना आपल्या पक्षात घेण्यासाठी धडपड सुरू केली आहे. मात्र भाजपाने यापूर्वीही जानकरांना फसविल्याने ते लोकसभा निवडणुकीत त्यांना मदत करण्यासाठी सहजासहजी तयार होताना दिसत नाहीत. गत विधानसभा निवडणुकीत उत्तमराव जानकरांना एक लाखापेक्षा जास्त मते पडली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत उत्तमराव जानकरांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. उत्तमराव जानकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार संजय शिंदे, आमदार शहाजीबापू पाटील यांचा चांगला दोस्ताना आहे. तरीही रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मदत करण्यास ते असमर्थता दर्शवितात. कारण भाजपावर त्यांचा विश्वास नाही. तर मोहिते पाटील त्यांना आमदारकीचे गाजर दाखवित आहेत. माळशिरस विधानसभा मतदारसंघ २००९ साली एससीसाठी राखीव झाल्यापासून जानकर या मतदारसंघातून आमदार होण्यासाठी धडपडतात. २०१९ च्या विधानसभेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तमराव जानकरांना जातीच्या दाखल्याबाबत मदत केली होती. तेव्हा त्यांनी जानकरांना फलटणमधून विधानसभा लढण्यास सांगून माळशिरस विधानसभा मतदारसंघातून रामभाऊ सातपुते यांना उमेदवारी दिली होती. त्यादरम्यान जानकरांनी हो म्हणून ऐनवेळी रामभाऊ सातपुते यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली होती. तेव्हापासून जानकर व भाजपाचे बिनसले होते. मात्र त्यावेळी उत्तमराव जानकरांनी एक लाखापेक्षा जास्त मतं मिळविल्याने अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष त्यांनी वेधून घेतले होते. त्या मतांच्या जोरावरच उत्तमराव जानकर यांनी महायुती व महाविकास आघाडी या दोघांनाही गॅसवर ठेवले आहे. वास्तविक पाहता उत्तमराव जानकर यांच्या पाठीशी एक लाख मतं असल्याने जिकडे जानकर तिकडचा खासदार हे निश्चितच आहे. एका बाजूला आपल्या पाठीशी एक लाखापेक्षा जास्त मतं असलेले उत्तमराव जानकर आमदारकीसाठी झुंजताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला ज्यांच्या पाठीशी आपल्या वडिलाचे व मुलाचेही मत नाही ते रणजितसिंह मोहिते पाटील थाटामाटात भाजपाने दिलेली विधानपरिषदेची आमदारकी भूषवत आहेत. पक्ष अडचणीत असताना आमदारांनी दिवसरात्र पक्षवाढीसाठी पळाले पाहिजे. मात्र रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पूर्ण कुटुंबाने भाजपा पक्ष सोडलेला असतानाही ते काहीही करू शकत नाहीत. मग त्यांच्या आमदारकीचा उपयोग काय? तीच आमदारकी मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक उत्तमराव जानकर यांना दिली तर ते दिवसरात्र भाजपासाठी कार्यरत राहतील. मोहिते पाटलांच्या गद्दारीचा बदला घेण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही नामी संधी असून त्यांनी या संधीचे सोने करून प्रस्थापित मोहिते पाटलांच्या विरोधात जानकरांना ताकद देणे गरजेचे आहे असा सूर माळशिरस तालुक्यातून निघत आहे. शिवरत्नने रणजितसिंहांची आमदारकी शाबूत ठेवून तत्व आणि विचारांना पायदळी तुडवत राजकीय स्वार्थासाठी तुतारी हातात घेतली आहे. अशावेळी त्या त्या भागातील सर्व आमदारांनी भाजपा उमेदवारांचा प्रचार करून त्यांना मताधिक्य मिळवून देणे हे भाजपा आमदारांचे आद्यकर्तव्य आहे. मात्र आमदार रणजितसिंह यांच्याकडे भाजपाबद्दल एकनिष्ठता आणि प्रामाणिकपणाचा अभावच दिसून येत आहे. त्यामुळे भाजपा पक्षश्रेष्ठींनी रणजितसिंहाची आमदारकीवरून हकालपट्टी करून त्याठिकाणी उत्तमराव जानकरांचा विचार करावा अशी मागणी भाजपाच्या कार्यकर्त्यांतून जोर धरत आहे. दरम्यान एका हाताने दोन्ही बाजूने ढोलकी वाजवता येत नसते, त्यासाठी स्वतंत्रच हात लागतात हे शिवरत्नने लक्षात ठेवावे. दरम्यान रणजितसिंहांच्या कुटुंबाने तुतारी हाती घेतल्याने भाजपा पक्षश्रेष्ठींनी लेली असली तरी भविष्यात तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले अशी अवस्था शिवरत्नची झाल्याशिवाय राहणार नाही असे भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्यांतून बोलले जाते. दरम्यान रणजितसिंहाचे पूर्ण कुंटूबच भाजपाच्या विरोधात उतरल्याने पक्षशिस्त म्हणून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी रणजितसिंह मोहिते पाटलांचे भाजपाचे सभासदत्व काढून घेऊन त्यांची आमदारकीवरून हकालपट्टी केल्यास आणि त्याठिकाणी उत्तमराव जानकरांची वर्णी लावल्यास भाजपाच्या उमेदवारास माढा लोकसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळू शकते असे भाजपातील निष्ठावंत कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे.भाजपाने हा निर्णय या अगोदरच घेणे योग्य होता असे राजकीय जाणकारातून बोलले जाते.