विरोधकांना देशोधडीला लावणाऱ्या खुनशी धैर्यशील यांना उत्तमराव जानकर खासदार करणार का?
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी निर्भीडपणे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढणाऱ्या नेतृत्वाच्या मागे जनता जात असते. व्यक्ती म्हणून नव्हे, तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढणारा एक खंबीर विरोधक म्हणून लोक त्यांना डोक्यावर घेत असतात. उत्तमराव जानकर हे गेल्या ३० वर्षांपासून मोहिते पाटलांच्या विरोधात उभे राहिल्याने व धनगर समाज हा मोहिते पाटलांचा पारंपरिक विरोधक असल्यामुळेच मोहिते पाटील विरोधकांनी जानकरांना डोक्यावर घेतले. गत विधानसभा निवडणुकीत उत्तमराव जानकर यांना एक लाखापेक्षा जास्त मतं पडली ती मोहिते पाटील विरोधक म्हणूनच! मात्र या मतांच्या जोरावर उत्तमराव जानकर माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटलांशी समझोता करीत असले तरी विरोधकांना देशोधडीला लावणाऱ्या खुनशी धैर्यशील मोहिते पाटील यांना उत्तमराव जानकर खासदार करणार का? असा संतप्त प्रश्न मोहिते पाटील विरोधकांकडून विचारला जात आहे.
उत्तमराव जानकर यांना मोहिते पाटलांच्या विरोधात लढताना खूप मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. मानसिक त्रास देऊन जानकरांना संपविण्यासाठी मोहिते पाटलांनी त्यांच्यावर २७ केसेस केल्या. पण न डगमगता ते मोहिते पाटलांच्या विरोधात ठामपणे उभे राहिले. कारण ॲड. सुभाष पाटील व स्व. दत्ताआप्पा वाघमारे यांची त्यांना खंबीर साथ होती. उत्तमराव जानकर यांच्यासारख्या धाडसी लढवय्या विरोधकाचे नेतृत्व मोहिते पाटील विरोधकांना लाभल्याने हळूहळू जानकर समर्थकांमध्ये वाढ होऊ लागली. परंतु सत्तेच्या धुंदीत असलेल्या मोहिते पाटलांनी आपले विरोधक संपविण्यासाठी जानकर समर्थकांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. यात मोहिते पाटील घराण्यातील खुनशी नेतृत्व धैर्यशील मोहिते पाटील अग्रेसर होते. धैर्यशील यांच्या खुनशी राजकारणामुळे अनेक मोहिते पाटील विरोधकांच्या संसाराची राखरांगोळी झाली. धैर्यशील यांच्या दहशतीमुळे अकलूजमध्ये विरोधकांची संख्या वाढत नव्हती. आपल्या विरोधकांना धैर्यशील यांनी कार्यकर्त्यांमार्फत मारहाण केल्याने त्यांना गाव सोडून जावे लागले. तर काहीजण आपले व्यवसाय बंद करून अकलूजमधून गायब झाल्याचे पुण्यात स्थायिक झालेल्या अकलूजमधील एका मित्राने सांगितले. मोहिते पाटलांची ही दहशत व एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी काही विरोधकांनी आपले घरदार पणाला लावले. पण मोहिते पाटलांच्या मनी पॉवर, मसल पॉवर व सत्तेच्या गैरवापरामुळे मोहिते पाटील विरोधक वेळोवेळी अपयशी ठरले. मात्र २०१९ साली माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाल्यानंतर व माळशिरस विधानसभा मतदारसंघातून रामभाऊ सातपुते आमदार झाल्यानंतर माळशिरस तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते पाटील विरोधकांना बळ आले. भाजपाने मोहिते पाटलांची एकाधिकारशाही व मक्तेदारी संपविली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटलांचा प्रचंड विरोध असतानाही भाजपाने माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी मोहिते पाटलांनी तुतारी हातात घेऊन आपले अनेक वर्षांपासूनचे कट्टर विरोधक उत्तमराव जानकर यांच्यासमोर समझोत्यासाठी हात पुढे केला आहे. यादरम्यान उत्तमराव जानकर यांचाही हिरवा कंदील असल्याचे दिसून येत आहे. पण खुनशी नेतृत्व असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदार करण्यासाठी मदत करताना त्यांच्यामार्फत आपल्या समर्थकांना किती त्रास झालाय? याचा जानकरांनी कधी विचार केलाय का? आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार बहुतांशी जानकर समर्थकांनी मोहिते पाटलांशी हातमिळवणी करण्यास नकार दिला आहे. आपण मोहिते पाटलांशी हातमिळवणी केल्यास पुढची आमदारकी आपल्या पदरात पडेल असे जानकरांना वाटत असले तरी तो तुमचा भ्रम आहे. कारण मोहिते पाटलांनी जरी तुम्हाला माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवून दिलीच, तरी तुमचे आमदारकीचे स्वप्न हे स्वप्नच राहणार यात शंका नाही. कारण तुम्ही मोहिते पाटील विरोधक म्हणूनच जनता तुमच्या मागे होती. आता तुम्ही त्यांच्याच गोटात गेला तर जनता आहे तिथेच राहील व तुमचे मोजके समर्थक मात्र तुमच्या मागोमाग येतील. मात्र कट्टर मोहिते पाटील विरोधकांतूनच नवनेतृत्व पुढे येईल. यादरम्यान तुम्ही धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत केली तर कट्टर मोहिते पाटील विरोधक मात्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही हे मात्र निश्चित!