माळशिरस तालुक्यातील मतदार वेडा आहे – जयसिंह मोहिते-पाटील
माळशिरस तालुक्यातील जनतेत संतापाची लाट
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): मतदार हे लोकप्रतिनिधींसाठी दैवत असतात. ऐन निवडणुकीत विविध आश्वासने देऊन निवडणूक लढविणारे उमेदवार अक्षरशः मतदारांचे पाय धरतात. कारण लोकशाहीने मतदारांना राजा बनवले आहे, तर खासदार, आमदारांना सेवक! परंतु आपल्या माळशिरस तालुक्यातील मतदारांबद्दल एका न्यूज चॅनलशी बोलताना जयसिंह मोहिते पाटील म्हणतात की, “माळशिरस तालुक्यातील मतदार वेडा आहे, एक वानरसेना आहे, ही सेना उधळली की कुणाचेच ऐकत नाही” असे त्यांनी वक्तव्य केल्याने जयसिंह मोहिते पाटील व शिवरत्नबाबत माळशिरस तालुक्यातील मतदारांमध्ये एक संतापाची लाट उसळली आहे.
यादरम्यान दलित व मुस्लिमांबद्दल बोलताना ते म्हणतात की, भिमा कोरेगाव येथील दंगलीमुळे दलित समाज आमच्याबरोबर आला नाही आणि राम सातपुते हे आरएसएसचे असल्यामुळे मुस्लिम समाजातील २५ ते ३० हजार मतदान आम्हाला मिळाले नाही. तसेच यापूर्वी सोलापूरमधून प्रतापसिंह मोहिते पाटील यांना निवडून आणताना आरएसएस आणि भाजपाने आम्हाला अजिबात मदत केली नाही, असे म्हणून जयसिंहांनी अकलेचे तारे तोडले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण दलित आणि मुस्लिम समाजाच्या वोट बँकेवरच शिवरत्नचे आजवरचे राजकारण टिकलेले असताना त्यांच्याबद्दल एका न्युज चॅनेलवर बोलणे म्हणजे जयसिंहांचा कृतघ्नपणाचा कळसच आहे.
“रणजितदादा आमच्याबरोबर नाहीत, ते फडणवीस यांच्याबरोबर आहेत. गरज पडली तर भाजपाच्या व्यासपीठावर जा” या जयसिंह यांच्या वक्तव्याने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे माळशिरस तालुक्यातील स्थान आणि वलय किती किरकोळ आहे हेच सिध्द होत आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांनी आपल्या एकुलत्या एक मुलासाठी ३५ वर्षाच्या राजकारणात किती संस्था उभ्या केल्या? उत्तर आहे शून्य. शंकरनगरचा साखर कारखाना आणि शिक्षण प्रसारक मंडळ याची स्थापना महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी केली. मात्र दोन्हीही प्रबळ संस्था एकट्या जयसिंहांनी गिळंकृत केल्या. रणजितसिंहांना संघटनात्मक काम करण्यासाठी लोकसंपर्क, जनसंपर्क करण्यासाठी हाती राहिले तरी काय? जयसिंहांनी कारखाना मुलीस दिला तर शिक्षण संस्था मुलास दिली. विजयदादांवर प्रेम करणाऱ्या तालुक्यातील जनतेचा थोरल्या दादांना खडा सवाल आहे “तुम्ही रणजितदादांवर एवढा अन्याय का केलात? सदाशिवनगरचा कारखाना म्हणजे पडक्या वाड्याची पाटीलकी आहे. तो कारखाना चालविताना रणजितदादांची अवस्था अत्यंत केविलवाणी तर आहेच, परंतु तारेवरची कसरतच आहे. आज रणजितदादा भाजपाच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत ते फक्त चुलत्याने दोन्ही प्रबल संस्था गिळंकृत केल्यामुळेच. अन्यथा आज धैर्यशीलच्या ठिकाणी भाजपाला चॅलेंज देऊन रणजितदादांनीच लोकसभेचा फॉर्म भरला असता.
“उत्तमराव जानकर हे लोकसभा निवडणुकीत शिवरत्नला मदत करणार आहेत. धैर्यशील त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करतील” या जयसिंहांच्या वाक्यातून राजकारणातील मांडवलीचे दर्शन घडते. उत्तमराव जानकर जरूर तुमच्याबरोबर येतील, परंतु विरोधी पक्षातील लोकांना दुश्मनाप्रमाणे वागणूक देणाऱ्या शिवरत्नला विरोधी पक्ष मुळीच माफ करणार नाही. विरोधी पक्षातील माणसाची पत्नी एखाद्या अंगणवाडीत काम करीत असेल तर ती अंगणवाडी स्मार्ट अंगणवाडी होऊ दिली जात नाही एवढ्या नीच पातळीवरील धैर्यशील यांच्या राजकारणाला तालुक्यातील विरोधी पक्ष वैतागला आहे. शासनाचाच निधी येतो आणि विरोधकांची गळचेपी करताना शिवरत्नला याची थोडीशी सुध्दा लाज आणि शरम वाटत नाही.
संजय शिंदे आणि बबनराव शिंदे यांचेवर मुलाखतीत तोंडसुख घेताना जयसिंह मोहिते पाटलांना एवढेच सांगायचे आहे की, दोन्ही बंधूंनी बारापेक्षा जास्त कारखाने उभारून आपल्या तालुक्याला सुध्दा रोजगार दिले आहेत. आपल्या कारखान्यापेक्षा कामगारांना जास्त वेतन दिलेले आहे. स्वस्तातील मजुर वापरायचे, माणसांचा कडीपत्याप्रमाणे वापर करायचा, त्यांना परत वेडा म्हणून हिणवायचे वानरसेना (माकड) म्हणून अपशब्द वापराचे, पुतण्याची रणजितदादांची केविलवाणी अगतिक अवस्था निर्माण करायची हे फक्त जयसिंह यांनाच जमू शकते, कारण तेवढे षड्विकार त्यांच्या मेंदूत गच्च भरलेले आहेत.