राष्ट्रवादी (शरद पवार) ने धैर्यशील मोहिते पाटलांना अद्याप उमेदवारी का दिली नाही ?
माढा (बंडखोर वृत्तसेवा): खासदार शरद पवार व संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरुषप्रधान संस्कृती मोडीत काढून स्त्रियांनाही मोठ्या प्रमाणात राजकीय संधी मिळावी यासाठी पुढाकार घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या अंतर्गत झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत उमेदवार देताना महिलांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे असा विचार पुढे आला होता. कारण महिलांच्या प्रश्नावर बोलण्यासाठी संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्याबरोबर लोकसभेत आपण महिलांचे नेतृत्व दिले पाहिजे असे मत शरद पवारांचे होते. आणि त्यासाठी खा. सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यासमोर जयसिंह मोहिते पाटील यांची मुलगी स्वरुपराणी आहे. म्हणूनच राष्ट्रवादी (शरद पवार) ने धैर्यशील मोहिते पाटलांना अद्याप उमेदवारी दिली नाही असे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.
ज्यादिवशी मनोज जरांगे पाटलांचा अकलूजमध्ये मराठा समाजाचा मेळावा होता त्याच्या एक दिवस अगोदर खा. शरद पवार आणि जयसिंह मोहिते पाटील यांची सयाजीराजे वॉटर पार्कवर एक मिटींग झाली होती. त्यामध्ये दस्तुरखुद्द शरद पवारांनी जयसिंह मोहिते पाटील यांच्याबरोबर या विषयावर सविस्तर चर्चा केली होती. परंतु धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी माढा मतदारसंघात केलेले शक्ती प्रदर्शन, दौरे आणि उमेदवारी नाकारल्यामुळे तुतारीकडून लढण्यासाठी कार्यकर्त्यांचा, जनमताचा रेटा, शिवरत्नवर धैर्यशील यांच्या पाठीमागे उभे असलेले कार्यकर्ते यामुळेच जयसिंह मोहिते पाटील यांना स्वरूपराणींच्या उमेदवारीचा विषय कार्यकर्त्यांसमोर व्यवस्थित मांडता आला नाही. खासदार शरद पवारांना सुप्रिया सुळे यांच्याबरोबर राजकारणात स्वरूपराणी असाव्यात असे मनापासून वाटत आहे. यदाकदाचित यश अपयश आले तरी भविष्यकाळात राज्यसभेवर जाणारे एक सक्षम नेतृत्व म्हणून स्वरूपराणीकडे पाहिले जात आहे. बंडखोर परिवारातील आमचे एक मित्र आम्हाला म्हणाले, “एका बापाची सुप्त राजकीय महत्वाकांक्षा शिवरत्नने त्याचवेळी ओळखायला हवी होती, ज्यावेळी जयसिंह मोहिते पाटील जाहीर कार्यक्रमात म्हणाले होते की “कुणी उभे राहिले नाही तर मी स्वतः उभे राहणार.” जयसिहांचे यापूर्वी स्वप्न होते की, आपल्या मुलीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करायचे. पण त्यावेळी शक्य झाले नाही. मात्र कारखाना आणि शिक्षण संस्थेवर मजबूत पकड असणाऱ्या स्वरुपराणी यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व ओळखून खा. शरद पवारांनी व खा. सुप्रिया सुळे यांनी योग्य व्यक्ती निवडली आहे. मात्र राहतो प्रश्न आपल्या भारतीय समाज जीवनातील पुरूषप्रधान संस्कृतीचा!
जास्त ताणले तर तुटते हा निसर्गाचा नियम राजकारणाला सुध्दा लागू होतो. भाजपाबरोबर जास्त ताणण्यात काही अर्थ नाही, नुकसान अधिक आहे याचा अभ्यास करून रणजितसिंह आणि शिवतेजसिंह अलिकडे अलिप्त असताना दिसत आहेत. तर स्वरूपराणी आणि संग्रामसिंह मोहिते पाटलांच्या दौऱ्याचा आणि जनसंपर्काचा वेग अलिकडे वाढलेला दिसत आहे, त्यालाही निश्चित अशी कारणे आहेत. माळशिरस तालुक्यावर कारखाना आणि शिक्षण संस्था या दोन्ही माध्यमातून मजबूत पकड असणाऱ्या या दोघांना भविष्यात गोविंद बागेत इतरांपेक्षा जास्त वजन असल्याचे आज तरी जाणवते.