मोहिते पाटलांकडून मला जीवे मारण्याचा प्रयत्न- राहुल ढेरे
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): काही वर्षांपूर्वी सत्तेच्या जोरावर मोहिते पाटलांनी अकलूजसह परिसरातील विरोधकांवर खोट्या केसेस टाकून किंवा त्यांना मारहाण करून संपविण्याचे काम केले. तर काहीजणांच्या आयुष्याची त्यांनी राखरांगोळी केली. यासाठी मोहिते पाटलांनी ठराविक टोळक्यांना पोसलेले आहे. अशाच पध्दतीने माझ्याही अंगावर आयशार टेंपो घालून मोहिते पाटलांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असे यावेळी साप्ताहिक बंडखोरशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राहुल ढेरे यांनी म्हटले.
राहुल ढेरे यांच्यावर काही वर्षांपूर्वी धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या समर्थकांमार्फत हल्ला करून त्यांच्यावर अन्याय केले होते. अकलूजमध्ये फिरणेही त्यांना मुश्किल झाल्याने मोहिते पाटलांच्या अन्यायाला वैतागून गेल्या दहा वर्षांपूर्वी ते गाव सोडून निमगांव (म) येथील आपल्या शेतात रहायला गेले होते. दरम्यानच्या काळात राहुल ढेरे अत्यंत दहशतीखाली वावरत होते. मात्र हळूहळू त्यांना मोहिते पाटील विरोधकांचे पाठबळ मिळायला लागल्यानंतर २०२१ साली अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ते उभे राहिले. तेव्हा त्यांना ७०० मते मिळाली होती. त्यानंतर राहुल ढेरे यांनी राजकारणाबरोबरच सोशल मीडियावरही सक्रीय होऊन मोहिते पाटलांच्या अन्यायाबद्दल आपले मत मांडायला सुरुवात केली. त्यांच्या फेसबुकवरील पोस्ट पाहून मोहिते पाटील त्यांच्यावर खूप चिडले होते. अधूनमधून राहुल ढेरे यांनी फेसबुकवर मोहिते पाटलांच्या विरोधात पोस्ट टाकून जनतेसमोर त्यांचे कारनामे मांडायला सुरुवात केली. त्यांचे धाडस व कर्तृत्व पाहून अजित पवारांनी राहुल ढेरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या माळशिरस तालुका कार्याध्यक्षपदी निवड केली. त्यामुळे राहुल ढेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे झोकून काम करायला सुरुवात केली. राहुल ढेरे हे नित्यनेमाने नंदेश्वर मंदिरात दर्शनासाठी जात असतात. मात्र दिनांक २२ मार्च २०२४ रोजी ते सकाळी ८:३० वाजता आपल्या मोटारसायकलवर नंदेश्वर मंदिराकडे जात असताना पिलीव-निमगांव (म) रोडवर आयशर टेंपोने ७०-८० च्या स्पीडने राहुल ढेरे यांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राहुल ढेरे यांनी वेळापूर पोलिस स्टेशनला तक्रारअर्ज दिला. त्या तक्रारअर्जात सदर घटनेचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज चेक करुन गाडी व ड्रायव्हरचा शोध घ्यावा. त्याचबरोबर सदरची घटना पूर्वनियोजित कट असून माझ्या जीविताचे काही बरेवाईट झल्यास धैर्यशील मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील व जयसिंह मोहिते पाटील हेच जबाबदार असतील असे वेळापूर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारअर्जात नमूद केले आहे.