सुंभ जळाला तरी पीळ कायम!
एखादा किडा स्वतःच्या तोंडातून तंतू काढून कोष तयार करीत असतो. पण एक वेळ अशी येते की, तो किडा त्या कोषातच अडकून पडतो. अगदी तीच अवस्था जयसिंह मोहिते पाटलांची झाली आहे. जयसिंह मोहिते पाटील यांचे संपूर्ण जीवनच अहंकाराच्या कोषात अडकले आहे. त्याला इगोस्टिक व्यक्तिमत्व म्हटले तरी चालेल. जयसिंहांच्या या अहंकारामुळेच सहकारी संस्थांबरोबरच राजकीय कारकिर्दीतही शिवरत्न बॅकफुटला गेलेला दिसत आहे. नको तिथे नाक खुपसणे आणि हेकेखोरपणा यामुळे राजकीय क्षेत्रात शिवरत्नला मोठी किंमत मोजावी लागली आहे असे त्यांच्याच बहुतांशी समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र शक्तिहीन जयसिंहांनी भाजपाश्रेष्ठींना चॅलेंज देणे म्हणजे ‘सुंभ जळाला तरी पीळ कायम’ असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
राजकीय नेत्यांना अधोगतीला घेऊन जाणारा सर्वात मोठा दुर्गुण कोणता असेल तर तो अहंकार होय. तो अहंकार जयसिंह मोहिते पाटलांमध्ये आजही ठासून भरलेला दिसत आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा टॉप टेनमधील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर “आम्ही सातारा, बारामती, सोलापूर व माढा या चार मतदारसंघातील उमेदवारांना पाडण्याचे काम करणार” असे जयसिंह मोहिते पाटील म्हणाले होते. मात्र भाजपाने मोहिते पाटलांच्या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणाला गांभीर्याने न घेतल्याने विरोधकांच्या गाठीभेटी घेऊन व माढा लोकसभा मतदारसंघात दौरे करून मोहिते पाटलांनी भाजपावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून न्यूज चॅनेलवर मुलाखत देताना “भाजपाश्रेष्ठींना समजलं पाहिजे खरी ताकद कुणाकडे आहे? रणजितसिंहचा जीव फडणवीस यांच्यावर आहे, त्यांनी मदत केल्यामुळे एक नैतिकता म्हणून रणजितसिंहला फडणवीस यांना सोडायला जीवावर येतंय. पण आता ८ तारखेपर्यंत आमच्या घरात यायचे नाही. तू तुझा पक्ष, तुझा मुख्यमंत्री घे. आम्ही रणजितसिंहला वाळीत टाकलंय” असे वक्तव्य जयसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे. वास्तविक पाहता भाजपाश्रेष्ठींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश होतो. या भाजपाश्रेष्ठींवर जयसिंहांनी बोलावे हाच खरा चिंतनाचा विषय आहे. फलटणमध्ये पत्रकारांना उत्तर देताना रामराजे निंबाळकर म्हणतात की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विषय फार पुढचे आहेत, आमच्या डोक्याच्या पुढचे आहेत. मी कितीही ज्येष्ठ असलो तरी लायकी कळते. अजितदादा पवार व देवेंद्रजी फडणवीस यातून मार्ग काढतील”. रामराजे निंबाळकर हे सभापतीपद भूषविलेले ज्येष्ठ नेते आहेत. परंतु मोदी, फडणवीस यांच्याबद्दल बोलताना संयमाने बोलतात. इथे अकलूजमध्ये मात्र इगोस्टिक जयसिंहांनी अहंकाराचा आणि अमर्यादित बोलण्याचा कळसच गाठला आहे. जेव्हा सोलापूरातून स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील उभे होते तेव्हा त्यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अजिबात काम केले नाही. सगळं काम माळशिरस तालुक्यातील आणि अकलूजमधील कार्यकर्त्यांनीच केले असे जयसिंह मोहिते पाटील म्हणतात. पण जयसिंह यांना आमचा प्रश्न आहे की, अकलूजमधील कार्यकर्त्यांना सोलापूरात मतदानाचा हक्क होता का? स्व. प्रतापसिंहांच्या विजयासाठी भाजपामधील आरएसएसची मजबूत फळी संघटितपणे काम करीत होती. तसेच जयसिंह मोहिते पाटील म्हणतात की, आम्ही माढा आणि सोलापूर या भाजपाच्या दोन्ही जागा पाडणार आहोत. जयसिंह यांचे हे चॅलेंज ‘अब की बार ४०० पार’ची घोषणा करणाऱ्या नरेंद्र मोदींना, गृहमंत्री अमित शहांना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. जयसिंह बोलताना म्हणतात की, राजकारणात कुठली सोंगटी कुठं हलवायची याचे मला चांगलेच ज्ञात आहे, पण आपला मुलगा संग्रामसिंह अकलूज शहरातील एका वॉर्डात उभा राहिल्यानंतर तिथे पडतो तेव्हा त्यांची सोंगटी कुठं गेली होती? वास्तविक पाहता हे सर्व अज्ञानातून आणि अहंकारातून घडत आहे. निवडणुकानंतर काय घडणार? याचे ज्यांना ज्ञान आहे ते आमदार रणजितसिंह तुमच्यापासून चार हात दूरच आहेत. पण ते जरी दूर राहिले तरी अडचणीतच येणार आहेत. कारण एकजण इकडे आणि दुसरा तिकडे असले भाजपामध्ये चालत नाही. राजकारणात सोंगट्या हलवित असताना भविष्यावर नजर ठेवून परिणामांची पर्वा करीत जो जबाबदारीने पावले टाकतो तोच यशस्वी राजकारणी होतो. रासपचे महादेव जानकर यांना अजित पवारांनी उमेदवारी दिली म्हणूनच शरद पवार धैर्यशील यांना वेटिंगमधून बाहेर काढून उमेदवारी देत आहेत. राजकारण करताना राजकारण्यांनी आजचा विचार न करता पुढच्या दहा वर्षांचा विचार करूनच निर्णय घ्यायचा असतो. मात्र शिवरत्न आम्हाला आज तरी निर्णयक्षमतेत कमकुवत दिसत आहे. जयसिंहांच्या अहंकारामुळे सुमित्रा पतसंस्थेतील कर्जदार व ठेवीदार अक्षरशः देशोधडीला लागले. त्याचबरोबर त्यांच्या अहंकाराची किंमत आजही शिवरत्नला भोगावी लागत आहे. शिवरत्न सत्तेच्या यशोशिखरावरून पार जमिनीवर आला तरी जयसिंहांचा अहंकार काही कमी झालेला दिसत नाही. म्हणूनच ‘सुंभ जळाला तरी पीळ कायम’ असेच म्हणावे लागेल.