सोलापूरकरांचा वनवास संपविण्यासाठी माळशिरसचा ‘राम’ सोलापूरात
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कर्तृत्ववान आमदार रामभाऊ सातपुते मैदानात
चार महिन्यापूर्वी बंडखोरने केलेला राजकीय अंदाज अखेर खरा ठरला
सोलापूर (बंडखोर वृत्तसेवा): कर्तृत्ववान आमदार रामभाऊ सातपुते यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघातून काम करण्याची संधी मिळताच त्यांनी या मतदारसंघाचा अक्षरशः कायापालट केला. गेल्या अनेक दशकांपासून विकासापासून वंचित राहिलेल्या अनेक गावांचा त्यांनी वनवास संपवला. त्यामुळे आमदार रामभाऊ सातपुते यांचा डंका सर्वत्र वाजू लागला. अशा या विकासाची दूरदृष्टी असलेल्या आमदार रामभाऊ सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन भाजपाने सोलापूरकरांचा वनवास संपविण्यासाठी सोलापूरला पाठवले आहे. याबाबत चारच महिन्यांपूर्वी बंडखोरने वर्तवलेला राजकीय अंदाज अखेर खरा ठरल्याचे दिसत आहे
आमदार रामभाऊ सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी त्यांना पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन करण्याबरोबरच बाहेरचा उमेदवार म्हणून त्यांना चिमटेही काढले होते. याला चोख प्रत्युत्तर देताना सातपुते म्हणाले की, इटलीवरुन आलेल्या सोनिया गांधी यांना आपल्या वाटतात, परंतु सोलापूर जिल्ह्यातील आमदार बाहेरचा वाटतो हे दुर्दैव आहे. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी बाहेरच्या मतदारसंघातून उमेदवारी लढविल्याचे दाखले देऊन प्रणिती शिंदे यांची बोलतीच बंद केली. वास्तविक पाहता आमदार रामभाऊ सातपुते यांच्याकडे जाणाऱ्या व्यक्तिला निराश होऊन कधी माघारी यावे लागले नाही. आपला, परका भेदभाव न करता त्यांनी अनेकांचे प्रश्न मार्गी लावले. मात्र मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेमार्फत कर्तृत्ववान आमदार रामभाऊ सातपुते यांचा माळशिरस पूर्व भागात वारू रोखला. कारण त्यांनी पूर्व भागात लक्ष घातले असते तर मोहिते पाटलांचे अस्तित्वच राहिले नसते. पण माळशिरस पश्चिम भागातील वाड्या वस्त्यांवर त्यांनी विकासाचे जाळे पसरवत आरोग्यदूत आमदार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यामुळे असे कर्तृत्ववान आमदार रामभाऊ सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रणिती शिंदे यांना त्यांचा पराभव डोळ्यासमोर दिसू लागला. मुख्यमंत्री पदापासून केंद्रीय गृहमंत्रीपद भूषविलेल्या सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूरकरांचा विकास करता आला नाही. मग प्रणिती शिंदे तर काय दिवे लावणार? असा सोलापूरकरांतून प्रश्न उपस्थित केला जात असून विकासाभिमुख नेतृत्व म्हणून सुपरिचित असलेल्या आमदार रामभाऊ सातपुते यांच्याकडे सोलापूरकर आशेने पहात आहेत. खासदारकीच्या माध्यमातून रामभाऊ सातपुतेच सोलापूरचा कायापालट करतील असा विश्वास तेथील जनतेतून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान बंडखोर एक टीम आहे, भारतीय राजकारणाचा सखोल अभ्यास करणारा एक समूह आहे. याच बंडखोरने चार महिन्यांपूर्वी “सोलापूर मधून रामभाऊ सातपुते यांना उमेदवारी मिळणार” अशी हेडलाईन लावून एक राजकीय अंदाज वर्तवला होता. तेव्हा आमदार रामभाऊ सातपुते यांनी आम्हाला फोन करून याबाबत विचारणा केली असता “सोलापूरकरांचा वनवास संपविण्यासाठी तुम्हाला लोकसभेच्या सभागृहात जावे लागेल असे आम्हाला मनापासून वाटतंय” असे आम्ही ठामपणे सांगितले होते. त्याचप्रमाणे आम्ही आणखी एक राजकीय अंदाज त्याच हेडलाईनमधून वर्तवला होता की राम सातपुते हे सोलापूर येथे गेल्यावर उत्तमराव जानकर हे आमदार म्हणून माळशिरस तालुक्याचे नेतृत्व करतील. आमचा हा राजकीय अंदाज ही तंतोतंत सत्य ठरत चालला आहे.
आम्हाला मिळालेल्या विश्वसनीय सूत्रानुसार भाजपच्या केंद्रीय पदाधिकांऱ्यामध्ये एक बैठक झाली असून त्या बैठकीत “संसदेच्या सभागृहात निवडून आलेल्या गतवर्षीच्या पहिल्या टॉप टेन खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. त्यामुळे आम्ही अभिमानाने आमचे मत मांडतो की, येणाऱ्या लोकसभेच्या सभागृहात माढा लोकसभा मतदार संघातून निवडून आल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे केंद्रीय मंत्रिमंडळात शपथ घेताना आपणाला दिसून येतील. त्यामुळे राजकीय चक्रव्यूहात सत्ताधारी आणि विरोधकांकडून घेरला गेलेल्या शिवरत्नवरील “आपला माणूस” ला उत्तमराव जानकरांशिवाय पर्यायच उरला नाही. मात्र जेव्हा उत्तमराव जानकर शिवरत्नशी जुळवून घेतील तेव्हा त्यांचे राजकीय अस्तित्व संपलेले असेल हे मात्र निश्चित! भाजपच्या विरोधात रणशिंग फुंकून माढा लोकसभा मतदारसंघातून खासदारकीच्या आखाड्यात उतरलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर कुणाचाच विश्वास न राहिल्याने त्यांची अवस्था “आपला माणूस अपक्ष माणूस” असा बोर्ड लावण्यासारखी झाली आहे.