बाळासाहेब कुणाच्या हिताचं राजकारण करतात?
वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत यावं यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांनी केले. महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्याने वारंवार वंचित बहुजन आघाडी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पक्ष आहे आणि हे संविधान वाचविण्याच्या भूमिकेत बाळासाहेब आंबेडकर आमच्यासोबत असतील असा आशावाद व्यक्त केला. बाळासाहेब आंबेडकर यांनी 2019 ला केलेली चूक पुन्हा करू नये असे माझ्यासारख्या अनेक आंबेडकरी चळवळीतील अनुयायांना मनापासून वाटत राहिले. कारण या मत विभाजनाचा फायदा हा भाजपला होतोय हे 2019 ला स्पष्ट झाले होते. 2019 ला मी वंचित बहुजन आघाडीला मतदान केले. नुसते मतदान केले नाही तर वंचित बहुजन आघाडीचा पदरमोड करून माझ्या परीने गाव खेड्यात फिरून प्रचार प्रसार केला. पण शेवटपर्यंत बाळासाहेबांची भूमिका ही निव्वळ महाविकास आघाडीला गॅसवर ठेवणारी आणि आंबेडकरी जनतेला पुन्हा एकदा पंचवीस वर्षे मागे नेणारीच राहिली. या चळवळीतला अनुयायी म्हणून मी हे बोललंच पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांच्या भक्त संप्रदायाने आणि तमाम आंबेडकरी जनतेने खालील मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करावा.
1) बाळासाहेब आंबेडकरांना खरंच महाविकास आघाडीशी युती करण्यामध्ये रस होता का? जर युती करायची होती तर वारंवार कधी शिवसेनेचे संजय राऊत, कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी यांच्याबद्दलची विरोधी विधाने करून जाणीवपूर्वक समर्थकांमध्ये गोंधळ निर्माण होईल अशी स्थिती ते का निर्माण करत होते?
2) ज्यांच्यासोबत राहून एकत्रितपणे सत्तेचे राजकारण करायचं आहे त्यांच्याच विरोधात बोलणे यात कोणता मुत्सद्दीपणा होता?
3) 2019 ला लोकसभेला लोकांनी भरभरून मतदान केले. मात्र या मत विभाजनाचा फायदा भाजपला होतोय हे लक्षात आल्यानंतर विधानसभेला मात्र आंबेडकर अनुयायांनी हात आखडता घेतला. ज्याचा परिणाम मतांची टक्केवारी निम्म्यावर येऊन ठेपली याचे आत्मपरीक्षण भक्त संप्रदायातील लोक कधीतरी करतील का?
4) आमची युती फक्त शिवसेनेसोबत आहे, आम्हाला काँग्रेसशी बोलण्यात रस नाही असे बाळासाहेब सातत्याने म्हणत होते. पण मग मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर जेव्हा वंचित बहुजन आघाडीची सभा झाली तेव्हा शिवसेनेचे श्री उद्धव ठाकरे यांना सभेला निमंत्रण का दिले नाही ? याच्या उलट आमचा काँग्रेसशी संबंध नाही असं म्हणणाऱ्या बाळासाहेबांनी काँग्रेसच्या राहुल गांधी यांना निमंत्रण का दिले? त्यातही राहुल गांधींनाही निमंत्रण देऊन त्यांनाही पेचात पकडण्याचे राजकारण केले असे चित्र आहे. कारण नेमकं त्याच काळामध्ये राहुल गांधी पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारामध्ये व्यस्त होते. त्यामुळे त्यांचे येणं शक्यच नव्हतं, म्हणजे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण द्यायचेच नाही, काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रण देताना ठरवून ते येऊ शकणार नाहीत. अशी वेळ साधायची असे राजकारण हे कुणाच्या फायद्यासाठी केले जात होते?
5) शिवसेनेसोबत युती आहे असे म्हणताना संजय राऊत यांच्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारले असता कोण संजय राऊत मी ओळखत नाही. किंवा भाजपसोबत झोपून आलेल्यांनी आम्हाला सांगू नये ही वाक्यं खरंच आंबेडकरी चळवळीच्या वैचारिक गरिमेला शोभणारी आहेत का ? याचाही भक्तांनी विचार करावा.
6) आघाडीसाठी आम्हाला चर्चेला बोलवायचे असेल तर नाना पटोले यांची सही नको राहुल गांधी-उद्धव ठाकरे-शरद पवार यांचे एकत्रित सहीचेच पत्र असायला हवे असा आग्रह धरणारे बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकांना चर्चेसाठी मात्र अत्यंत नवख्या तिसऱ्या चौथ्या फळीतल्या कार्यकर्त्याला पाठवतात हे किती संयुक्तिक आहे? उलट अशा तिसऱ्या चौथ्या फळीतल्या नवख्या माणसाला चर्चेला पाठवल्यामुळे बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीशी युती करण्यात अजिबात उत्सुक नाहीत हेच चित्र अधिक स्पष्ट होते.
7) सध्या 2024 मध्ये तर सोशल मीडिया आणि एकूण वातावरण पाहता 2019 च्या विधानसभेतील मत याच्या एक चतुर्थांश सुद्धा वातावरण बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीने नाही हे चित्र स्पष्ट आहे. महाविकास आघाडीसोबत युती करायला हवी असाच बहुसंख्यांक लोकांचा कल असल्याचे दिसते.
8) बाळासाहेबांच्या याच आडमुठेपणाच्या भूमिकेला कंटाळून वंचित बहुजन आघाडीतल्या अनेक लोकांनी बाहेर पडत वेगळी वाट चोखाळली.
9) पण यात विशेष विचार करण्यासारखे आहे की वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेले गोपीचंद पडळकर, शिवानंद हैबतपुरे किंवा अनेक कोर कमिटीतले महत्त्वाचे पदाधिकारी हे सरळ भाजपमध्ये निघून गेले, पण जे भाजपमध्ये गेले त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या आयटी सेलने कधीही ट्रोल केले नाही…! मात्र जे लोक बाहेर पडल्यानंतरही दोन-तीन वर्षे थांबून राहिले, वैचारिक विचार मंथन करत राहिले आणि नंतर भाजपाला पराभूत करण्यासाठी भूमिका घेतली. तेव्हा मात्र बाळासाहेबांच्या भक्त संप्रदायाने त्यांना दलाल ठरवायला सुरुवात केली. ही ट्रोल गॅंग अगदी मोदी भक्तांसारखीच आहे. जसे भाजपच्या समर्थनार्थ लिहिले बोलले तर देशभक्त आणि भाजपला प्रश्न विचारले तर देशद्रोही. अगदी त्याचप्रमाणे बाळासाहेबांच्या कुठल्याही भूमिकेला आंधळेपणाने होयबा करत स्वीकारले तर चळवळीतला..! नाही तर आंबेडकरद्रोही अशी सरसकट विभागणी भक्तसंप्रदायाने सुरू केली. दीपक केदार किंवा सुकुमार कांबळे या लोकांच्या हयाती चळवळीमध्ये गेल्या आहेत. आयटी सेलमधली जी शेंबडी पोरं याच्याबद्दल लिहितात त्यांनी यांच्या दहा टक्केही सोसलेलं नाही हे विशेष.
१०) नांदेडमध्ये निष्ठावंत राहुल प्रधानला डावलून यशपाल भिंगेला उमेदवारी दिली तो यशपाल भिंगे आता कुठे आहे? पण याउलट राहुल प्रधानने मात्र आंबेडकरी चळवळीची नाळ सोडली नाही.
११) बाळासाहेब आंबेडकर यांना जर प्रस्थापित पक्षांचा एवढा राग येतो तर मग भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना या सगळ्याच पक्षांना फाट्यावर मारत आपल्याच समविचारी भावंडांना एकत्र घेण्याचा मनाचा मोठेपणा बाळासाहेबांनी का दाखवला नाही? जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले किंवा बहुजन समाज पार्टी, भीम आर्मी, दलित पॅंथर, भिम टायगर सेना, युवा भीमसेना अशा अनेक संघटनांनी स्वतःहून मैत्रीचा हात पुढे केला तरी बाळासाहेबांनी तो हात का नाकारला? अगदी आपले सख्खे भाऊ भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांना सुद्धा सोबत घ्यायला बाळासाहेब आंबेडकर का उत्सुक नसतात?
१२) म्हणजे वामन मेश्राम, चंद्रशेखर आजाद, दीपक केदार, राहुल प्रधान, सुकुमार कांबळे बहुजन समाज पार्टी, दलित पॅंथर, भीम टायगर सेना, भीम आर्मी, पीएम कांबळे गट, गवई, इंदिसे, राजाभाऊ खोब्रागडे गट, हे सगळे लोक वारंवार सोबत यायला इच्छुक असूनही दलाल आणि सातत्याने ठरवून या सगळ्या लोकांना बाजूला सारत भाजपला पूरक भूमिका घेणारे बाळासाहेब तेवढे खरे अनुयायी ‘ऐसा कैसे चलेगा भाई?’ वरील सगळ्या मुद्द्यांचा विचार करता या निष्कर्षापर्यंत पोचलो आहे की, इथून पुढे भावनिकतेला बळी पडणार नाही. बाबासाहेबांचा वसा वारसा हा विचारांचा आहे तो आम्ही विचारांनी चालवू.
अश्वजीत भातकुले, अमरावती