खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना रोखण्यासाठी गरुडसमोर शिवरत्नच्या पायघड्या!
विरोधकांना उध्वस्त करणाऱ्या मोहिते पाटलांच्या नादी न लागता गरुडने विरोधकांना सक्षम करणाऱ्या खासदार निंबाळकर यांच्याच पाठीशी उभे रहावे
माढा (बंडखोर वृत्तसेवा): राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असे म्हटले जात असले तरी शिवरत्नवरील मोहिते पाटलांनी खासदारकीच्या पाठिंब्यासाठी उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगल्याकडे याचना करणे हे बुध्दीला न पटणारे आहे. कारण सत्तेच्या जोरावर मोहिते पाटलांनी स्वतः उत्तमराव जानकर यांच्यावर तर २७ केसेस केलेल्याच आहेत, मात्र जीवावर उदार होऊन ज्यांनी ज्यांनी लढवय्या उत्तमराव जानकरांना साथ दिली, त्या विरोधक कार्यकर्त्यांचा पण मोहिते पाटलांनी भयानक छळ केला आहे. अनेकांच्या आयुष्याची राखरांगोळी केली आहे. मात्र आता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची जिरविण्याच्या नादात शिवरत्नचे सिंह गरुडसमोर अगतिक झाले असले तरी आपल्या सहकाऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या मोहिते पाटलांच्या नादी न लागता विरोधकांना सक्षम करणाऱ्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच गरुडने साथ द्यावी अशा तीव्र प्रतिक्रिया मोहिते पाटील विरोधकांतून उमटत आहेत.
“शिवरत्न” हे जसे काही कार्यकर्त्यांचे शक्तीस्थळ आहे, तसेच “गरूड बंगला” हे माळशिरस तालुक्यातील विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचे शक्तीस्थळ आहे. पण जसे “शिवरत्न” शक्तीस्थळ पूर्वापार आहे, तसे “गरुड”चे नाही. ३०-३५ वर्षे अनंत संघर्ष करुन, अंगावर केसेस घेऊन, सत्तापिपासू मोहिते पाटलांचा अन्याय सहन करुन हे शक्तीस्थळ उभे राहिले आहे. त्यामुळे अत्याचार पीडित, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणाऱ्या जनतेसाठी हे आशादायी आहे. उत्तमराव जानकर हे थेट मोहिते पाटलांशी भिडून पीडित जनतेच्या पाठीशी उभे राहत असल्यामुळेच त्यांना गत विधानसभा निवडणुकीत एक लाखापेक्षा जास्त मतं पडली. कारण जनतेला माळशिरस तालुक्यात परिवर्तन करायचे आहे. मोहिते पाटलांच्या दहशतीतून, दबावातून, एकाधिकारशाहीतून मुक्त व्हायचे आहे. परंतु मोहिते पाटलांच्या भूलथापांना, आश्वासनांना बळी पडून उत्तमराव जानकर यांनी भविष्यातील आमदारकीसाठी मोहिते पाटलांशी जुळवूनच घेतले तर हे जनतेला अजिबात रुचणार नाही. कारण गरूड बंगल्यावरील कार्यकर्त्यांना शत्रूप्रमाणे वागणूक देऊन, कुरघोड्या करून मोहिते पाटलांनी त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले आहेत.
भाजपाने धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारली, विरोधी पक्ष (शरद पवार गट) त्यांना जवळ करण्यास तयार नाही. दस्तुरखुद्द शरद पवार रासपाच्या महादेव जानकरांना तुतारीकडून माढ्यातून उभे राहण्यासाठी विनंती करीत आहेत. हे सर्व कशामुळे? मोहिते पाटलांनी याचे कधी आत्मपरीक्षण केले आहे का? शरद पवार राजकारणातील बुध्दीमान आणि मुत्सद्दी व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या माघारी राष्ट्रवादी (शरद पवार गट) हायजॅक करण्यासाठी शिवरत्न मागे राहणार नाही. कारण शिवरत्नची सत्ताभिलाषा शरद पवारांना चांगलीच ठाऊक आहे. शिवरत्नची निष्ठा कुठल्याच पक्षावर नसते तर सत्तेवर असते, पदावर असते. भविष्यकाळात भाजपा उत्तमराव जानकर यांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मोहिते पाटलांना आपली होत असलेली राजकीय पिछेहाट दिसत आहे. त्याचबरोबर यावेळीही रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाले, तर आपले राजकीय अस्तित्वच संपुष्टात येईल या भीतीपोटी मोहिते पाटलांनी कट्टर विरोधक उत्तमराव जानकर यांच्याकडे पाठिंब्यासाठी याचना सुरू केली आहे. मात्र त्यांच्या याचनेकडे पाहताना आपले सहकारी, कार्यकर्ते, जनता यांना मोहिते पाटलांच्या अन्याय अत्याचाराला किती तोंड द्यावे लागलंय? कितीजणांना देशोधडीला लावलंय? याचा विचार करावा. उत्तमराव जानकर हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे जिवलग मित्र आहेत. त्यामुळे कठीण परिस्थितीत त्यांची साथ सोडतील असे वाटत नाही. तसेच निंबाळकरांची साथ सोडून जानकरांनी शिवरत्नबरोबर जाणे हजारो कार्यकर्ते सहन करतील का? यादरम्यान सत्तेसाठी वाट्टेल ते करताना शिवरत्नची बुध्दी तर हँग झाली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो. मोहिते पाटलांशी राजकीय तडजोड केल्यावर “गरुड”ला चांगले दिवस येतीलही. पण तुमच्या ३०-३५ वर्षांच्या राजकीय तपश्चर्येवर पाणी फेरले जाईल. जनतेच्या मनातील तुमची प्रतिमा मलीन होईल हे मात्र निश्चित!