मोहिते पाटलांची पक्षनिष्ठा तोंडी लावायच्या लोणच्यासारखी!
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): लोकशाहीत तत्व, विचार आणि नितीमूल्ये यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. लोकप्रतिनिधींनी पक्षनिरीक्षकांसमोर रणजितसिंह नाईक
निंबाळकरांची निवड बहुमताव्दारे केल्यानंतर शिवरत्नवरील मोहिते पाटलांचा तिळपापड झाला. त्यामुळे यापूर्वी भाजपा पक्षश्रेष्ठींचा उदोउदो करणाऱ्या मोहिते पाटील व त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या विरोधात मोहिम उघडून भाजपाच्या विरोधात सोशल मीडियावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका सुरू केल्या आहेत. भाजपाने माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील यांची निवड केली असती म्हणजे हा पक्ष शिवरत्नला गोड वाटला असता. परंतु आपल्याला डावलल्यामुळे मोहिते पाटलांनी भाजपाची उणीदुणी काढायला सुरुवात केल्यानंतर त्यांची पक्षनिष्ठा केवळ तोंडी लावायच्या लोणच्यासारखीच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
भाजपा हा वैचारिक दृष्टिकोनातून भारतातील सर्वोच्च पक्ष आहे. कारण पक्षनिरीक्षकांनी केलेली निवड रद्द करण्याचा अधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच नव्हे, तर केंद्रीय पक्षश्रेष्ठींना सुध्दा नाही, पण हे शिवरत्नला सांगणार कोण? एखाद्या महाविद्यालयातील राज्यशात्राच्या प्राध्यापक पदासाठी सेट, नेट, पीएचडीचे विद्यार्थी मुलाखतीला येतात आणि शिवरत्नवाले सत्तापिपासू केवळ एमए पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्राध्यापक म्हणून नियुक्त करतात, इतरांना चक्क पळवून लावतात ही वशिलेबाजी भाजपात चालत नाही. माणसांची निवड लायकीनुसार केली की नियती सुध्दा आपली दखल घेत असते. आज तुम्ही लोकांचे आशिर्वाद कमी तळतळाटच फार घेतले आहेत. मी जेव्हा धैर्यशील यांना प्रश्न विचारला होता की, सहकारमहर्षी हे पुरोगामी विचारसरणीचे होते, मग आता तुम्ही हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पक्षाचे काम कसे करता? तेव्हा आम्ही पूर्वीपासूनच कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे आहे असे ते म्हणाले होते. मात्र त्यांची राजकीय वाटचाल पाहिली तर मोहिते पाटील सोयीनुसार विचारसरणी बदलतात हे दिसून आले आहे. मोहिते पाटलांना ना कोणती विचारसरणी आहे, ना पक्षनिष्ठा! ‘अपना काम बनता, भाड मे जाए जनता’ या तत्वानुसारच त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे. पक्षाकडून भरभरून घ्यायचे आणि पुन्हा त्याच पक्षाची मापं काढायची. पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडियावर प्रचार करणे हा कृतघ्नपणा नव्हे का? तुम्ही अस्तित्वशून्य झालेले असताना आर्थिक मदत करून व आमदारकी देऊन पुन्हा एकदा शिवरत्नला ताकदवान केले. तरीही सगळे तुम्हालाच पाहिजे का? भाजपा हा शिस्तीचा पक्ष आहे. तिथे ब्लॅकमेलिंगचे राजकारण चालत नाही. लोकशाही प्रणालीनुसार उमेदवाराचे कर्तृत्व पाहूनच हा पक्ष उमेदवारी देत असतो. पण उमेदवारी मलाच पाहिजे हा अट्टाहास इथे चालत नाही. मोहिते पाटलांची कुठल्याच पक्षावर निष्ठा वगैरे काही नाही. ते केवळ आपमतलबीपणाचे राजकारण करतात. पण एका विचाराने, तत्त्वाने, निष्ठेने वागतो तोच राजकारणात टिकतो हे मात्र तितकेच खरे आहे.
बंडखोर परिवाराने सातत्याने पत्रव्यवहार करून टीईटीद्वारे शिक्षक भरती घेण्यास शासनाला भाग पाडून
शिक्षण सम्राटांना त्यांची योग्य जागा दाखवली.
आम्ही शिक्षण, साखर कारखाने, दूधसंघ, पतसंस्था, बँका यामधील सर्व बाबींवर, प्रत्येक घटकांवर बारीक लक्ष ठेवणार आहोत. शेतकऱ्यांच्या कमी भावात जमिनी हडप करून प्लॉटिंगमध्ये बेसुमार धन कमविणारे धनदांडगे आमच्या टार्गेटवर आहेत. आमची लेखणी त्यांचे समाजसेवकरूपी बुरखे दूर करणार आहे. कर्ज फेडण्यासाठी दबावाला कंटाळून आत्महत्या केलेल्या अभागी कुंटुंबाच्या पाठीशी आम्ही यापूर्वीही राहिलो आणि भविष्यातही त्यांना आधार देणार आहोत. आपल्या मदमस्त सत्तेच्या जोरावर शिवरत्नने सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करुन त्यांना देशोधडीला लावल्यामुळेच शिवरत्नची राजकीय पिछेहाट झाल्याचे बोलले जात असून आता माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला देशोधडीला लावण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदारकी पाहिजे काय? अशा संतप्त प्रतिक्रिया अत्याचार पीडित जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत.