धैर्यशील यांना अपक्षच लढावे लागणार?
राजनितीत सत्ताधारी आणि विरोधकांनी सुध्दा
शिवरत्नला घेरले
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पाचव्या पक्ष प्रवेशाच्या आम्ही शुभेच्छा देणारच होतो. मात्र माढा लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर शरद पवारांशी युती करून स्वत:च्या चिन्हावर लढण्याची इच्छा व्यक्त करीत असताना दस्तुरखुद्द शरद पवारच राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकरांना तुतारीकडून लढण्यासाठी विनंती करीत असल्याने मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाचे दोर कापल्याची चर्चा होत आहे. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांनीही शिवरत्नला घेरल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर अपक्षच लढण्याची वेळ येण्याची दाट शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलताना नुकतेच म्हणाले की, “माढ्याची जागा आम्ही मित्र पक्षाला देणार आहोत.” त्यामुळे क्रिकेटच्या टीममध्ये जसा राखीव खेळाडू असतो त्याप्रमाणे धैर्यशील यांच्याकडेराष्ट्रवादी (शरद पवार गट) पाहत आहे. विजयदादा हे बेरजेचे राजकारण खेळण्यात पटाईत होते. म्हणूनच ते राजकारणातील अजातशत्रू म्हणून ओळखले जातात. मात्र शिवरत्नची सध्याची वाटचाल याविरुद्ध होताना दिसत आहे. धैर्यशील यांच्या आततायीपणामुळे शिवरत्नची पाऊलं चुकीच्या दिशेने, विनाशाच्या दिशेने पडताना दिसत आहेत.एका रणजितसिंह नाईक निंबाळकरांची जिरविण्याच्या नादात अहंकारामुळे आणि आततायी वृत्तीमुळे शिवरत्न राजकारणात किती तरी बॅकफुटला जात आहे. आज माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील आणि शिवबाबांचे दौऱ्यावर दौरे होत असताना माजी खासदार तथा विद्यमान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील मात्र कुठल्याही दौऱ्यावर दिसत नाहीत. मात्र पडद्यामागचे खरे सूत्रधार तर तेच दिसत आहेत. राजकारणातील संयमी बाणा हा उन्नती आणि प्रगतीकडे घेऊन जात असतो. नेतृत्व म्हणजे नेतेगिरीची झूल पांघरूण मोठेपणाचे अवडंबर माजवून आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत हे दाखविण्याचा फार्स नसून नेतृत्व म्हणजे उच्च ध्येयवाद निर्माण करूनप्रेरकशक्ती बनून समाजातील प्रत्येक घटकाला पुढे नेण्याची सामाजिक बांधिलकी बाळगणे हेच आहे. आज शिवरत्नने निर्माण केलेले शत्रू राजकारणात त्यांच्या आडवे येत आहेत.सत्ताधारी पक्षाने नाकारले, विरोधी पक्ष जवळ करीत नाही.त्यामुळे दुर्दैवाने अपक्ष उभे राहण्याची वेळ धैर्यशील यांच्या वाट्याला तर येणार नाही ना? असा प्रश्न राजकीय जाणकारांतून विचारला जात आहे.