सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थींची शिष्यवृत्ती अपहार व अनियमितेबाबत एसआयटी चौकशी करण्याची मागणी
पुणे (बंडखोर वृत्तसेवा): अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय हे सरकार महर्षी शंकरराव मोहिते चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्टच्या वतीने चालवले जात असून या महाविद्यालयाला शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये पैशाचा अपहार व अनियमित्ता होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे विद्यार्थ्यांनी शासनाकडे एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. या संस्थेचे अध्यक्ष म्हणून जयसिंह शंकरराव मोहिते पाटील हे काम पहात आहेत. संपूर्ण माळशिरस तालुक्यात त्यांचा कार्यकुशल कार्याचा दबदबा असून अकलूज परिसरात त्यांना त्यांच्या चांगल्या कार्यासाठी ओळखले जाते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांनी इंजिनिअर व्हायचे हे त्यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविले आहे. या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे व ग्रामीण भागातील मुले साहेब व्हावीत यासाठी ते प्रयत्न करत असतात. सन २०१० सालापासून स्थापन झालेले हे अभियांत्रिकी महाविद्यालय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सभासदाच्या पैशातून उभे केले आहे. तसेच हे महाविद्यालय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना यांच्याशी संलग्नित असून महाविद्यालयाला कारखान्याकडून सुद्धा वेळोवेळी निधी दिला जात आहे. त्याचबरोबर या महाविद्यालयाला भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्याकडून शिष्यवृत्ती सुद्धा दिली जात आहे. तरी सुद्धा गेल्या दहा वर्षात या महाविद्यालयाला कोणताही नावलौकिक मिळवता आला नाही, याचे कारण सुद्धा स्पष्ट आहे. वास्तविक पाहता हे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सोयीअभावी व भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले आहे असे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांना २०१५ ते २०२० या काळामध्ये कोणत्याही पद्धतीची पुस्तके, संगणक, मशिनरी खरेदी न करता याचबरोबर या कार्यकाळामध्ये महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना पगार न देता हे सर्व खरेदी केलेले आहे अशी माहिती लेखा परीक्षणामध्ये नमूद केलेली आहे. याचबरोबर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा थकीत पगार सुद्धा लेखा परीक्षणामध्ये नोंद केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने दिलेल्या शिष्यवृत्तीचे काय झाले? हा मोठा यक्षप्रश्न या माध्यमातून दिसून येत आहे. यासाठी महाराष्ट्र शासन व केंद्र शासन, तसेच विद्यार्थ्यांकडून मिळालेली शैक्षणिक फी, त्याचबरोबर कारखान्याकडून मिळालेल्या अनुदानामध्ये अनियमितता व अपहार झाल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य समाजकल्याण विभागाला मिळाल्यामुळे महाविद्यालयाची एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय समाजकल्याण खात्यामार्फत घेण्यात आलेला आहे. या महाविद्यालयाचे सचिव तथा सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले, कार्यालयीन अधीक्षक विक्रम बागल, लेखापाल सीए नितीन कुदळे यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार केलेला असल्याचे समजते. तसेच लेखापाल नितीन कुदळे यांनी महाविद्यालयाच्या लेखा परीक्षणामध्ये खोटी आकडेवारी दाखवून शासनाची फसवणूक करत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भामध्ये महाविद्यालयातून सोडून गेलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वारंवार महाविद्यालयाकडे थकीत पगारासंबंधी विचारणा केली असताना त्यांना धमकी देणे, दमदाटी करणे यासारखे प्रकार मोहिते पाटील समर्थकांकडून केले जात आहेत. तसेच या महाविद्यालयाचा हा प्रकार अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाला सुद्धा या थकीत वेतन शिक्षकांनी तक्रार केल्यानंतर या महाविद्यालयाची कोणतीच दखल घेतलेली नाही आहे. त्यामुळे हे प्रकरण राजकीय दबावामुळे दडपण्याचा प्रकार दिसून येत आहे. त्याचबरोबर शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत व शिक्षकांना पगार न देता इतरत्र वापरले जात आहेत असे दिसून येत आहे. शासनाकडून आलेला निधी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी सुद्धा इतरत्र वळवून विद्यार्थ्यांचे सुद्धा नुकसान केले जात आहे. याला सर्व समितीचे सदस्यच सर्वस्वी जबाबदारी असतात. अशा या संस्था चालकांच्या मनमानी कारभारामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांतून या महाविद्यालयाबद्दल नाराजीचे सूर उमटत आहे.