तो मी नव्हेच!
माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटलांनी शिवरत्न बंगल्यावर बैठक घेऊन दबावतंत्राचे राजकारण करायला सुरूवात केली. यावेळी रामराजे निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांबरोबर भाजपाच्या कृपेने आमदार झालेले रणजितसिंह मोहिते पाटीलही उपस्थित होते. मात्र त्यांनी जाणीवपूर्वक कॅमेऱ्यासमोर येण्याचे टाळले. त्यानंतर जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूत बनून आलेले संकटमोचक ना. गिरीश महाजन शिवरत्न बंगल्यावर आले, तेव्हा मोहिते पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालून त्यांच्या कानाजवळ धैर्यशील मोहिते पाटलांच्या घोषणा दिल्या. यादरम्यान त्यांची दमछाक होत असताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील तिथेच होते आणि हसत होते. मात्र कार्यकर्त्यांना आवाहन करताना ‘मी आहे सगळे सुरळीत होईल’ असे म्हणून ते गिरीश महाजनांसमोर कार्यकर्त्यांना शांत करण्याचे ढोंग करीत होते. वास्तविक पाहता गिरीश महाजन शिवरत्न बंगल्यावर आपल्याला भेटायला येणार आहेत याची त्यांना पूर्वकल्पना असताना रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याच्या सूचना का केल्या नाहीत? यावरून रणजितसिंह व धैर्यशील यांनी कार्यकर्त्यांना भडकाविण्याचे काम कशावरून केले नसेल? हा प्रश्न उपस्थित होतो. दरम्यान भाजपाकडून लाभ घेण्यास अडथळे येऊ नयेत व पक्षश्रेष्ठींवर आपला दबावही रहावा यासाठीच ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतल्याचे दिसून येते.अतिथी देवो भवः ही आपली भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे आपल्याकडे आलेल्या अतिथीला दैवत मानून आपण त्यांचे स्वागत केले पाहिजे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूत म्हणून आलेल्या ना. गिरीश महाजन या अतिथीचे स्वागत आपण त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन करायचे का? यादरम्यान त्यांचा जो काही अपमान झाला, त्यांना जो काही घेराव घालण्यात आला, तो गिरीश महाजनांचा नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांचा अपमान आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान आहे, भाजपाचा अपमान आहे. एकूणच खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात वारंवार कुरघोड्या करणे व आपल्याच कार्यकर्त्यांमार्फत महाजनांना घेराव घालणे यावरून मोहिते पाटील वैफल्यग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. २०१९ मध्ये आम्ही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक लाखाचे मताधिक्य देऊन निवडून आणले असे मोहिते पाटील म्हणत असले तरी विधानसभेच्या मतांवरून त्यांची ताकद किती आहे हे जनतेला चांगले ठाऊक झाले आहे. तसेच ते आम्ही भाजपाला एक लाखाच्या लीडने खासदार निवडून दिला आणि माळशिरस तालुक्यातून आमदारही निवडून दिला असे म्हणत असले तरी भाजपानेही त्यांना भरभरून दिले आहे. आजपर्यंत भाजपामध्ये ज्यांनी आयुष्य घालविले ते वेटिंगला असताना भाजपाने रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेची आमदारकी देणे ही खूप मोठी बाब आहे. जो सदाशिवनगरचा शंकर कारखाना कधीच चालू होणार नव्हता, अशा कारखान्याला उर्जितावस्था देण्यासाठी भाजपाने ११३ कोटींची मदत केली. त्यातून राजकारणात झेप घेण्यासाठी भाजपाने रणजितसिंहांना चांगल्या पध्दतीची ताकद दिली. मोहिते पाटलांच्या शिवरत्न कन्स्ट्रक्शनला श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे ३५० कोटींचे काम दिले, कोट्यवधींचा निधी दिला. परंतु रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील व शिवतेजसिंह मोहिते पाटील या सर्व बंधूंचे वागणे म्हणजे कृतघ्नपणाचे लक्षण आहे. जो केलेले उपकार विसरतो त्याला कृतघ्न म्हणतात. माढ्याच्या राजकारणामध्ये शिवरत्नचे आजपर्यंतचे राजकारण हे कृतघ्नपणाचे राजकारण म्हणूनच ओळखले जाते. आज भाजपा सोडून ते तुतारीकडे जाण्याच्या तयारीत आहेत. परंतु बारामतीकरांना सोडताना यांची काय भूमिका होती हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले आहे. भाजपात प्रवेश करताना मोहिते पाटलांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचा मुद्दा पुढे केला असला तरी त्यामागे अनेक गुपितं दडलेली होती. मात्र राष्ट्रवादीला सरळ विरोध करून आणि डिमांड मांडून ते भाजपामध्ये आले नव्हते. केवळ जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी त्यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे भांडवल केले होते. मात्र पाचच वर्षात मोहिते पाटलांनी भाजपाच्या विरोधात बंडाचा पवित्रा घेतल्याने रणजितसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांची ४ जूननंतर खूपच राजकीय पिछेहाट होणार आहे. २००९ साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात विजयसिंह मोहिते पाटलांचा पराभव झाल्यानंतर ते पाच वर्षे राजकीय विजनवासात गेले होते. तीच अवस्था रणजितसिंह व धैर्यशील यांची होणार आहे. मात्र तेव्हा सुमित्रा पतसंस्था, विजय नागरी पतसंस्था व विजय शुगरची प्रकरणे चव्हाट्यावर आले नव्हती. आता यांची अनेक प्रकरणे बाहेर आल्याने त्यांची अवस्था खूपच भयानक होण्याची शक्यता आहे. आम्हाला एका ज्येष्ठ पत्रकाराकडून मिळालेल्या माहितीनुसार ना. गिरीश महाजन यांनी आमच्याकडे आपल्या आठ फाईली तयार असल्याचे मोहिते पाटलांना सांगितल्याचे समजतेय. त्यामुळे आपला निर्णय घेताना मोहिते पाटलांना पुढची दिशा ओळखूनच निर्णय घ्यावे लागणार आहेत. शिवरत्न बंगल्यावर जेव्हा हे महानाट्य सुरू होते तेव्हा जयसिंह मोहिते पाटील ऊर्फ बाळदादा यांनी ‘आता आम्ही ठरवलंय, माढा, सोलापूर, बारामती व सातारा या चार लोकसभा मतदारसंघात भाजपाला पाडायचे’ असे वक्तव्य करून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीच पंगा घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण ज्यांचे सूपुत्र अकलूजमधील एका वॉर्डात पराभूत होतात त्यांनी भाजपाला चार लोकसभा मतदारसंघात पाडायचे वक्तव्य करणे म्हणजे हास्यास्पदच आहे. दरम्यान रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आमदारकीचा उपभोग घेऊन, भाजपाच्या कृपाशिर्वादाने सदाशिवनगरचा कारखाना चालवून व श्री संत तुकाराम पालखी महामार्गाचे काम घेऊनही तो मी नव्हेच असे दाखवून धैर्यशीलच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपाशी पंगा घेतला तर भविष्यात मात्र मोहिते पाटलांना याची चांगलीच किंमत मोजावी लागेल हे मात्र निश्चित!