शिवरत्नचे राजकीय वर्तन लोकशाहीच्या विरोधात!
माढा लोकसभा मतदारसंघात निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट
माढा (बंडखोर वृत्तसेवा): विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माढा लोकसभा मतदारसंघातून जाहीर झालेली उमेदवारी ही लोकशाही तत्व आणि विचारांच्या माध्यमातून झालेली आहे. ना. गिरीश महाजन यांच्या मध्यस्तीनंतर “थाप मारून थापाड्या गेला” अशा पोस्ट शिवरत्नवरील कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्या. माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व विद्यमान आमदार, १४० पदाधिकारी यांचा कौल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना असताना राजकारणातील ‘बी’ ग्रेडच्या नेत्यांना जमवून शिवरत्नने पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यावरून शिवरत्नचे वर्तनच लोकशाही विरोधी असल्याचे दिसत असल्याने माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.माढा लोकसभा मतदारसंघात ‘ए’ ग्रेडचे नेते आहेत, मात्र त्यांचा पाठिंबा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आहे. त्यामुळे ‘बी’ ग्रेडच्या नेत्यांच्या पाठिंब्यामुळे भाजपा शिवरत्नच्या दबावाला बळी पडेल अशी सुतरामही शक्यता वाटत नाही. लोकसभा निवडणुकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे पारडे जड आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही शिवरत्नला स्वतःचा आमदार निवडून आणताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मोहिते पाटलांनी १९९९, २०१९ आणि २०२४ मध्ये पक्षांतरासंदर्भात झालेल्या चिंतन बैठकांपैकी दिनांक १७/३/२०२४ रोजी शिवरत्नवर झालेल्या चिंतन बैठकीत ना. गिरीश महाजन यांच्यासमोर धैर्यशील मोहिते पाटलांच्या घोषणा देऊन शिवरत्नने नेमके काय साध्य केले? महाजन यांना घेराव घालून धैर्यशीलच्या घोषणा देणे, शिवरत्नचे बेफाम, बेलगाम, झुंडशाहीचे प्रतिक नव्हे काय? आज वर्तमानकाळात शिवरत्नने स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे. राजकारणातील नम्रताच राजकीय नेत्यांना मोठे करीत असते. करकंब, आलेगांवचे साखर कारखाने चालविता येत नाहीत म्हणून विकून टाकले. सदाशिवनगरचा कारखाना भाजपाच्या पुण्याईवर सुरू आहे. शिवरत्नची आजची अवस्था ज्या फांदीवर बसले आहेत त्याच फांदीवर घाव घालून तोडणे अशी झालेली आहे. हे कितपत योग्य आहे? (२००९ साली जे पंढरपूरमध्ये विजयदादांचे झाले ते २०२४ साली धैर्यशील यांचे होऊ नये असे त्यांच्या काही समर्थकांना वाटत आहे.) विजयदादांमध्य़े अपयश सहन करण्याची शक्ती आहे. परंतु धैर्यशील यांच्यामध्ये ती शक्ती नसल्याने त्यांनी यश, अपयश पचविण्याची सहनशक्ती निर्माण करावी. ‘बी’ ग्रेडचे सिनेमे जसे चित्रपटगृहात चालत नसतात, त्याचप्रमाणे राजकारणातील ‘बी’ ग्रेडचे नेते विजयश्री खेचून आणू शकतील का? असे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.