आमदार रामभाऊ सातपुते यांच्या सोलापूरातील खासदारकीने माळशिरस तालुका पुन्हा पोरका होणार!
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): चारच वर्षात माळशिरस विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या गळ्यातला ताईत बनलेल्या आमदार रामभाऊ सातपुते यांची महायुतीकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा असल्याने कार्यसम्राट आमदाराविना माळशिरस तालुका पुन्हा पोरका होणार असल्याने जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर माजी आमदार स्व. हनुमंतराव डोळस यांनी दोन टर्म आमदारकी उपभोगली. मात्र सत्ताधारी मोहिते पाटील यांना विचारल्याशिवाय त्यांनी आपल्या मतदारसंघात कुठलेच काम केले नव्हते. मोहिते पाटलांनी सांगायचे, तेवढेच काम करायचे हे पूर्वीचे धोरण होते. मात्र दहा वर्षांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू रामभाऊ सातपुते यांना आमदारकीची संधी मिळताच त्यांनी मोहिते पाटील विरोधकांचा वनवास संपवून त्यांना सोन्याचे दिवस आणले. आमदार रामभाऊ सातपुते हे कर्तृत्ववान असल्याने त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणला. पैशाअभावी उपचार न करू शकणाऱ्या आपल्या मतदारसंघातील गोरगरीब मतदारांना आरोग्यदूत बनून त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. पूर्वी मोहिते पाटलांकडे एकहाती सत्ता असल्याने त्यांनी जाणीवपूर्वक विरोधकांच्या गावचा विकास होऊ दिला नव्हता. पण आमदार रामभाऊ सातपुते यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून विकासापासून वंचित राहिलेल्या पश्चिम भागातील वाड्या वस्त्यांवर आणि खेडोपाडी विकास केला, रस्त्यांचे प्रश्न सोडवले. आपल्याकडे आलेले लोक कुठलेही असले तरी त्यांचे फोनवरून चुटकीसरशी ते काम मार्गी लावत असत. वारंवार जनता दरबाराचे आयोजन करून आमदार रामभाऊ सातपुते यांनी जनतेच्या व्यथा जाणून घेत त्या सोडविण्यावर भर दिला. आमदार रामभाऊ सातपुते यांनी अल्पावधीतच जनतेच्या मनावर राज्य केल्याने मोहिते पाटलांनाही हे रूचेना, मात्र ते बोलून दाखवत नसत. आमदार रामभाऊ सातपुते यांनी पूर्व भागात लक्ष घालू नये यासाठी मोहिते पाटलांनी पक्षश्रेष्ठींना सूचना द्यायला सांगितल्या असे सातपुते समर्थकांकडूनच समजले. एक आमदार काय करू शकतो? हे सातपुते यांनी चारच वर्षात दाखवून दिले. आमदार रामभाऊ सातपुते यांच्या कार्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांच्या समर्थकांमध्ये वाढ झाली. माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार रामभाऊ सातपुते यांनी पुन्हा निवडणूक लढवावी असे जनतेला मनापासून वाटत होते. मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून आमदार रामभाऊ सातपुते यांच्याविना माळशिरस विधानसभा मतदारसंघ पुन्हा पोरका होणार अशा भावना जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत.