मोहिते पाटलांच्या कारखान्याच्या चिटबॉयमार्फत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गाडीसमोर गाजरफेक !
टेंभुर्णी (बंडखोर वृत्तसेवा): खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबद्दल भाजपाश्रेष्ठींकडे वाईट रिपोर्ट जावा म्हणून प्रतिस्पर्धी असलेल्या मोहिते पाटील यांनी आपल्या कारखान्याच्या चिटबॉयमार्फत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गाडीसमोर गाजरफेक केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजतेय.
आपल्या विरोधकांना ताकद देणारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा माढ्यातून उमेदवारी मिळू नये यासाठी मोहिते पाटलांमार्फत वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून भाजपाश्रेष्ठींसमोर त्यांना बदनाम केले जात आहे. निंबाळकर पुन्हा खासदार झाले तर आपले सर्व विरोधक डोईजड होतील याची मोहिते पाटलांना प्रचंड भीती वाटत आहे. कारण खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आपल्याला मदत करणाऱ्यांना कधीच वाऱ्यावर सोडत नाहीत. त्यांचा माढ्याचे शिंदे बंधू व उत्तमराव जानकर यांच्याशी चांगला दोस्ताना आहे. २०१९ पासून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे मोहिते पाटलांची प्रचंड डोकेदुखी वाढलेली आहे. ते मोहिते पाटलांना अजिबातच गिणत नाहीत. आणि भाजपाश्रेष्ठी तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर खूपच मेहेरबान आहे. मग ‘ज्यांना हरवता येत नाही त्यांना बदनाम करा’ या गोबेल्स नितीचा वापर करून मोहिते पाटलांनी विद्यमान खासदारांच्या विरोधात त्यांच्याच समर्थकांना मैदानात उतरवले असल्याचे आमच्या विश्वसनीय सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. सूत्रानुसार मोहिते पाटलांच्या कारखान्याच्या चिटबॉयने शेतात काम करणाऱ्यांना शेतकऱ्यांना ‘धन’लक्ष्मीचे दर्शन दाखवून चांगल्या कपड्यांचा पेहेराव करायला लावून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गाडीसमोर गाजरफेक करायला सांगितले. मात्र खासदारांच्या बदनामीसाठी तुम्ही कितीही षडयंत्रे केली तरी तुमचे कारनामे न ओळखण्याइतपत पक्षश्रेष्ठी इतकेही दूधखुळे नाहीत असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर समर्थकांतून बोलले जात आहे.