खासदार कसा असावा? सूडबुद्धीचा की मैत्रीभाव जपणारा?
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): गेल्या अनेक दशकांपासून पूर्वीच्या पंढरपूर तर सध्याच्या माढा लोकसभा मतदारसंघावर मोहिते पाटलांचे असलेले अनिर्बंध वर्चस्व २०१९ साली भाजपाने मोडीत काढले. त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रुपाने माढा लोकसभा मतदारसंघाला थेट जनतेशी संपर्क साधणारे खासदार मिळाले. त्यांनी आपल्या टर्ममध्ये गटातटाचे राजकारण न करता ज्यांनी ज्यांनी आपल्याला निवडून दिलंय त्यांच्या संपर्कात राहून त्यांची कामे करण्यावर भर दिला. तर सत्तेच्या चाव्या आपल्याच हातात ठेवून ज्यांनी विरोधकांशी सूडबुद्धीचे राजकारण केले ते धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघातून रणांगणात उतरले. यादरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांचा विरोधकांच्या संपर्कात राहणाऱ्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना प्रखर विरोध आहे. ते निंबाळकरांच्या विरोधात सूडभावनेने पेटून उठल्याने भाजपाने माढ्यातील जनतेला सूडबुध्दीचा नव्हे तर मैत्रीभाव जपणारा खासदार द्यावा अशी जनतेतून मागणी होत आहे.
माढ्यातून आपल्याला खासदारकी मिळावी यासाठी मोहिते पाटलांकडून आपल्या पाठीशी किती मोठी शक्ती आहे हे दाखविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. माढा लोकसभा मतदारसंघात दौरे करून त्यांनी मोठा जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. अकलूजसह काही ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील यांचे भावी खासदार म्हणून फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत. माळशिरस तालुक्यातील सहकारी संस्थांच्या बळावर व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे नेटवर्क वापरून माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांच्या उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु भाजपाने त्यांना उमेदवारी दिल्यास पुन्हा एकदा मोहिते पाटलांच्या माध्यमातून जनतेची मुस्कटदाबी केली जाईल. गटातटाचे राजकारण, विरोधकांची गळचेपी, सूडाचे राजकारण हे जनतेच्या पाचवीलाच पुजले जाईल. मात्र भाजपाने पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खासदारकीची संधी दिली तर माळशिरस तालुका दहशतमुक्त होईल, मोहिते पाटील विरोधक सक्षम होतील. सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन मोहिते पाटलांची एकाधिकारशाही आणि अहंकार नष्ट होईल. त्यामुळे भाजपाने माढा लोकसभा मतदारसंघासह माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटलांची मक्तेदारी संपविण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच माढ्यातून उमेदवारी द्यावी अशी जनतेतून मागणी होत आहे.