‘राम’च्या जनता दरबाराची व संपर्क कार्यालयाची अकलूजकरांना गरज!
माळशिरस विधासभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर २००९ व २०१४ या दोन टर्मला स्व. हनुमंतराव डोळस हे आमदार होते. तर २०१९ ला आमदार म्हणून रामभाऊ सातपुते लाभले. स्व. हनुमंतराव डोळस हे एक अगतिक, असहाय्य आमदार होते. शिवरत्नचे दूत म्हणूनच त्यांनी काम केले. जनतेच्या प्रश्नांचे त्यांना काही देणेघेणे नव्हते. ना जनता दरबार, ना जनतेच्या समस्या जाणून घेण्याची त्यांची मानसिकता! केवळ आणि केवळ शिवरत्नच्या तालावर नाचणे हेच त्यांचे काम होते. मात्र विद्यमान आमदार रामभाऊ सातपुते हे अल्पावधीतच आपल्या कर्तृत्वातून सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहेत. वारंवार जनता दरबार आयोजित करून जनतेचे प्रश्न व विविध समस्या सोडविण्यावर त्यांनी भर दिल्याने कार्यसम्राट आरोग्यदूत आमदार रामभाऊ सातपुते यांच्या जनता दरबाराची व संपर्क कार्यालयाची अकलूजकरांनाही गरज वाटू लागली आहे.
भारत देश हा संविधानानुसार चालतो. परंतु भारतीय संविधानातील विचारस्वातंत्र्य आणि भाषणस्वातंत्र्य स्व. हनुमंतराव डोळस यांच्या नशिबी नव्हते. मात्र विद्यमान आमदार रामभाऊ सातुपुते यांनी या विचारस्वातंत्र्य आणि भाषणस्वातंत्र्याचा पूरेपूर वापर करून जनमाणसांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला. आमदार रामभाऊ सातपुते यांनी सर्वसामान्य जनतेच्या अंतःकरणात ‘राम’ पाहिला. पैशाअभावी औषधोपचार करू न शकणाऱ्या गोरगरीब माणसांच्या जीवनात आमदार रामभाऊ सातपुते हे ‘आरोग्यदूत’ म्हणून धाऊन गेले. रंजल्या गांजल्या गोरगरीबांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य मनात कोरून त्यांनी आमदार निधीतून रूग्णांना आधार दिला. त्यामुळेच आज शेकडो आशीर्वादाचे हात आमदार रामभाऊ सातपुते यांच्या पाठीमागे उभे आहेत.
एक काळ असा होता की माजी आमदार स्व. हनुमंतराव डोळस यांना एखाद्या पुलाच्या उद्घाटनाचा नारळ फोडण्यासाठी सुध्दा शिवरत्नची परवानगी घ्यावी लागत होती. बऱ्याच वेळा त्यांना ती परवानगी मिळत नव्हती. पण आता तो काळ गेला. आता संविधान साक्षर असलेले, संविधानाचा गाढा अभ्यास असलेल्या मित्र परिवारात वावरणारे अभ्यासू स्वतंत्र विचारधारेतील आमदार रामभाऊ सातपुते माळशिरस तालुक्याला लाभले आहेत. जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित करीत असलेल्या आमदार रामभाऊ सातपुते यांच्या जनता दरबाराला उदंड प्रतिसाद मिळत आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून आमदार रामभाऊ सातपुते माळशिरस तालुक्यातील वंचित, शोषित, पीडित, अन्यायग्रस्त जनतेशी संवाद साधतात. काहीजण त्यांच्याकडे वैयक्तिक, तर काहीजण ओळखीच्या व्यक्तींच्या अडचणी घेऊन येतात. तेव्हा त्याच ठिकाणी संबंधित अधिकारी असो वा कुणी व्यक्ती असो थेट फोन लावून विषय मार्गी लावण्याचे काम ते करीत असतात. म्हणूनच जनतेच्या हृदय सिंहासनावर आमदार रामभाऊ सातपुते आरूढ झालेले आहेत. आज माळशिरस तालुक्यातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविणारे आमदार म्हणून रामभाऊ सातपुते यांना महाराष्ट्र ओळखतो. केवळ चार ते साडेचार वर्षांतच आमदार रामभाऊ सातपुते यांचे कार्य मोहिते पाटील यांच्या कार्यापेक्षा कित्येक पटीने वाढलेले आहे.
दरम्यान बंडखोर एक परिवार आहे, बंडखोर एक टीम आहे. बंडखोर प्रखर लोकशाहीवादी विचारांचा एक संघ आहे. या बंडखोर परिवाराची आमदार रामभाऊ सातपुते यांना एकच विनंती आहे की, तुमच्या जनता दरबाराचा केंद्रबिंदू अकलूजला निर्माण झाला पाहिजे. आमदार रामभाऊ सातपुते यांचे स्वतंत्र कार्यालय अकलूजला निर्माण झाले पाहिजे. अकलूजमधील अशी कितीतरी कुटुंबं आहेत ज्या कुटुंबांना विरोधी पक्षाच्या यादीत टाकून शिवरत्नने कुजवलं. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी विरोधकांच्या घरी जाऊन, त्यांच्याशी मैत्री करून त्यांची कामे केली. त्यांच्या जीवनाला भक्कम आधार देऊन विरोधकांना आपलेसे केले. परंतु आज अकलूजच्या गल्लीबोळात स्वखर्चाने “आपला माणूस” असा बोर्ड लावून माणसं आपली होतील का? आपला माणूस या शब्दाचा अर्थ तरी काहीजणांना समजतो का? ज्याचे अंतःकरण मानवतावादी आहे, ज्याच्या वागण्यात नम्रता आहे, गोरगरीबांबद्दल ज्यांना सहानुभूती आहे त्यालाच “आपला माणूस” म्हणावे. ज्या गोरगरीब जनतेने पोटाला चिमटा घेऊन बचत करून आपला पैसा विजय नागरी पतसंस्थेत ठेवला, पण त्यांना तो पैसा परत मिळाला नाही, पैशाअभावी काही कुटुंबं उध्वस्त झाली, मग ही माणसं दयावान कशी? तर या निर्दयी, बेलगाम, खुनशी राजकारण खेळणाऱ्यांना एक दिशा दाखविणारा दीपस्तंभ म्हणजे कार्यसम्राट आरोग्यदूत आमदार रामभाऊ सातपुते. अशा या आमदार रामभाऊ सातपुते यांना पुन्हा पुन्हा जनतेचे काम करण्याची संधी मिळो याच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!