शिवरत्नवरील मोहिते पाटलांच्या नशिबी तुतारी?
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): माढा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पाठिंबा असल्याने व भाजपाश्रेष्ठींचाही त्यांना हिरवा कंदील असल्याने मोहिते पाटलांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना पुढे करून दबावतंत्राचा वापर करीत त्यांना प्रखरपणे विरोध करण्यास सुरूवात केली आहे. तसेच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊनही त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने मोहिते पाटलांनी बारामतीकरांशी संपर्क वाढवून धक्कातंत्राचे राजकारण करण्यास सुरूवात केली आहे. यावरून शिवरत्नच्या नशिबी तुतारी तर नव्हे ना? असा सूर राजकीय जाणकारांतून निघत आहे.
भाजपा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राजकीय विंग म्हणून काढलेला पक्ष आहे. त्यामुळे या पक्षात आरएसएसची शिस्त पाळावी लागते. मात्र ती शिस्त सत्तापिपासू शिवरत्नकडे मूळीच असल्याचे दिसून येत नाही. भाजपामध्ये केडरबेस कार्यकर्ते यांची संख्या प्रचंड आहे. केडरबेस कार्यकर्ते पक्ष, शिस्त, पक्षाची धोरणे, उद्दिष्टे यांच्यावर लक्ष केंद्रीत करतात. उमेदवार कुणीही असो तो निवडून आणणे या केडरबेस कार्यकर्त्यांची सामूहिक जबाबदारी असते. परंतु शिवरत्नच्या ‘आम्ही म्हणेल तीच पूर्वदिशा’ या विचारधारेमुळे भाजपाच्या अडचणी वाढलेल्या आहेत. माढा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संयमीपणा आणि नम्रता जपत प्रसारमाध्यमांना सांगितले की, ‘मी पक्षाच्या बैठकीला आलो आहे, उमेदवार म्हणून आलो नाही. पक्ष देईल तो उमेदवार मला मान्य असेल, पक्षासाठी मी काम करणार.’ विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची ही विचारधारा त्यांच्या मनाचा मोठेपणा, व्यासंगीपणा, पक्षावरील प्रेम आणि श्रध्दा दर्शवते. तर मोहिते पाटलांचे दबावतंत्राचे राजकारण त्यांचा हट्टीपणा व पक्षविरोधी भूमिका दर्शवते.
विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा मतदारसंघात संघटन चातुर्याने माजी राज्यमंत्री स्व. दिगंबरराव बागल यांच्या कन्या रश्मी बागल यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश घडवून आणला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले, ‘रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी प्रभावी भूमिका पार पाडली आहे’. करमाळा तालुक्यातून आमदार संजय शिंदे आणि बागल गटाची ताकद आज रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीशी उभी आहे. पंढरपूर तालुक्यातील ४२ गावे निंबाळकरांच्या पाठीशी उभी करण्यात परिचारकांचा वाटा असणार आहे. माण खटावचे आमदार जयकुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची मैत्री महाराष्ट्राला परिचित आहे. त्यामुळे कुणाचे पारडे जड आहे हे न सांगणे लगे.
टेंभूर्णी येथे केंद्रीय अर्थराज्यमंत्री तथा माढा मतदारसंघाचे निरीक्षक भागवत कराड आणि विद्यमान आमदार प्रसाद लाड इच्छुक खासदारांच्या मुलाखती घेण्यासाठी आले होते. पक्षशिस्त म्हणून त्यांची ती पध्दतच आहे. या मुलाखतीतून आणि जनमताचा कानोसा घेऊन कराड आणि लाड हे माढा मतदारसंघाचा अहवाल तयार करून भाजपाकडे सुपूर्द करणार आहेत. सदरच्या बैठकीला आलेल्या आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार जयवंतराव जगताप, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह १४० प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा, विचार विनिमय करून अहवाल तयार करण्यात आलेला आहे. त्या अहवालावरून लवकरच माढ्याचा तिढा सुटणार आहे.
यापूर्वी सयाजीराजे वॉटर पार्क येथे खासदार शरद पवार आणि जयसिंह मोहिते पाटील यांची झालेली दीर्घ चर्चा चर्चेचा विषय ठरला होता. तसेच नातेपुते येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी खासदार सुप्रिया सुळे यांची झालेली भेट सुध्दा एकप्रकारे दबावतंत्राचाच भाग आहे असे राजकीय जाणकार मत व्यक्त करीत आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देण्यात आलेला आहे. यादरम्यान आपले पारंपारिक मतदारसंघ मिळविण्यात पवारसाहेब यशस्वी झाले असले तरी त्यांची नजर शिवरत्नवर आहे. त्यामुळे लवकरच शिवरत्नच्या हाती तुतारी तर येणार नाही ना? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
सध्याची राजकीय पार्श्वभूमी पाहता ‘एक तुतारी द्या मज आणुनि, फुंकीन मी स्वप्राणाने’ या वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. दरम्यान तुतारी फुंकण्यासाठी शिवरत्नकडे तेवढे बळ आणि शक्ती आहे का? असा प्रश्न जाणकारांतून उपस्थित होत आहे.