खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गाडीसमोर गाजरांचा वर्षाव करणाऱ्यांचा मास्टर माईंड कोण?
माढा (बंडखोर वृत्तसेवा): विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे देशातील आठव्या क्रमांकाचे खासदार आहेत असे वक्तव्य करून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले होते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर पक्षश्रेष्ठी सुध्दा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर मेहेरबान आहेत. त्यामुळे त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी फायनल होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी त्यांची बदनामी करण्याच्या हेतूने काही लोकांमार्फत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या गाड्यांसमोर गाजरांचा वर्षाव केला असला तरी यामागील मास्टरमाईंड कोण? याचा भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी शोध घ्यावा अशी चर्चा माढा लोकसभा मतदारसंघातील खासदार समर्थक कार्यकर्त्यांतून केली जात आहे.
लोकसभेच्या अंतिम उमेदवारांची पहिली यादी भाजपाने प्रसिध्द केली आहे. त्यामुळे दुसरी यादी कधीही प्रसिध्द होऊ शकते. यामध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही यादी फायनल होण्यापूर्वीच त्यांच्याबद्दल वरिष्ठांकडे चुकीचा मॅसेज जाण्यासाठी तर काही लोकांनी या शेतकऱ्यांमार्फत त्यांच्या गाड्यांसमोर गाजरांचा पाऊस पाडला नसेल ना? असा प्रश्न बहुतांशी लोकांना पडत आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आजारी असतानाही आपल्या तब्येतीची पर्वा न करता माढा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी राहिलेली कामे मार्गी लावण्यासाठी ते चांदा ते बांदा फिरत आहेत. मात्र त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी देव पाण्यात ठेवून बसलेले उमेदवारांची यादी फायनल होण्यापूर्वी त्यांच्याबद्दल वरिष्ठांकडे चुकीचा मॅसेज कसा जाईल यासाठी प्रयत्नरत असल्याचे दिसत आहेत. परंतु पक्षश्रेष्ठींनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामांचे मूल्यमापन करून त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळल्याने असल्या स्टंटबाजीला ते घाबरणाऱ्यांपैकी नाहीत. कुठलाही मंत्री, खासदार, आमदार असो तो जनतेचे शंभर टक्के समाधान करूच शकत नाही. शरद पवारांच्या विरोधातही कांदा प्रश्नावरून काही वर्षांपूर्वी मोठे आंदोलन झाले होते. दरम्यान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून पाठिंबा मिळत असताना त्यांच्या गाड्यांसमोर गाजरांचा पाऊस पाडणाऱ्यांच्या मागील खरा मास्टरमाईंड कोण? याचा भाजपाश्रेष्ठींनी शोध घेऊन त्यांचेवर कारवाई करावी अशी मागणी खासदार समर्थकांतून केली जात आहे.