उत्तमराव जानकर खासदारकीच्या माध्यमातून ‘गरूड’भरारी घेण्यासाठी सज्ज
जानकरांची गरूडभरारी करणार शिवरत्नच्या अडचणीत वाढ
सोलापूर (बंडखोर वृत्तसेवा): माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदारकीसाठी प्रबळ दावेदार असल्याने शिवरत्नवरील मोहिते पाटलांची अगोदरच डोकेदुखी वाढली आहे. त्यातच आता सोलापूर लोकसभा मतदारसंघातून मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक उत्तमराव जानकर यांना भाजप पक्षश्रेष्ठींनी तयारीला लागायला सांगितल्याने उत्तमराव जानकर खासदारकीच्या माध्यमातून ‘गरूड’भरारी घेण्यासाठी सज्ज झाले असून त्यांच्या गरूड भरारीमुळे शिवरत्नच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे दिसत आहे.
भाजपाचे राजकारण बघितले तर त्यांनी लढाऊ, कर्तबगार नेतृत्वाला संधी देऊन महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय घराण्यांची मक्तेदारी मोडीत काढल्याचे दिसून येते. माढा लोकसभा मतदारसंघात व माळशिरस विधानसभा मतदारसंघात २०१९ पर्यंत मोहिते पाटलांचे वर्चस्व होते. परंतु माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खासदार करून व माळशिरसमधून रामभाऊ सातपुते यांना आमदार करून मोहिते पाटलांची मक्तेदारी संपुष्टात आणली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे गटातटाचे राजकारण न करता त्यांना ज्यांनी ज्यांनी खासदार करण्यासाठी मदत केलीय त्यांच्या गराड्यात असतात. यामध्ये मोहिते पाटील विरोधक उत्तमराव जानकर, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, प्रशांत परिचारक, के. के. पाटील, राजकुमार पाटील, प्रकाश पाटील, रंजनभाऊ गिरमे यांच्यासह माळशिरस तालुक्यातील कट्टर मोहिते पाटील विरोधकांचा समावेश आहे. तर आमदार रामभाऊ सातपुते यांनी आपल्या विकासकामांच्या जोरावर स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. त्यामुळे मोहिते पाटलांची चांगलीच राजकीय गोची झाल्याचे दिसत आहे.
उत्तमराव जानकर यांनी गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून माळशिरस तालुक्यात कट्टर मोहिते पाटील विरोधक म्हणून प्रामाणिकपणे काम केले आहे. मोहिते पाटलांची सहकारी संस्थांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी त्यांनी सहकारी संस्था उभ्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु सत्तेच्या जोरावर उत्तमराव जानकर यांच्यासमोर अनंत अडथळे निर्माण करून मोहिते पाटलांनी त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडण्याचे काम केले. मात्र आपल्या ठराविक सहकाऱ्यांना सोबत घेऊन उत्तमराव जानकर यांनी त्यांच्या विरोधातील लढा सुरूच ठेवला. वेळप्रसंगी संयमी भूमिका घेऊन संधी मिळेल तिथे आक्रमकपणे ते विरोध करीत असत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उत्तमराव जानकर यांनी एक लाखापेक्षा जास्त मतं घेऊन सर्व महाराष्ट्राचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. तिथेच आगामी निवडणुकीत जानकरांना मोठी लॉटरी लागेल असे दिसले होते. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागल्यानंतर मोहिते पाटलांच्या विरोधात पॅनेल उभे करून एका जागेवरून उत्तमराव जानकर संचालक म्हणून मतदारांतून निवडून गेले. माळशिरस तालुक्यात घडत असलेल्या या घडामोडींकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बारकाईने लक्ष होते. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व उत्तमराव जानकर यांचे असलेले जिव्हाळ्याचे नाते व जिद्द आणि चिकाटीने काम करण्याची त्यांची धडपड पाहूनच भाजपा पक्षश्रेष्ठींनी उत्तमराव जानकर यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून तयारी करण्यास सांगितले आहे. वास्तविक पाहता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पुन्हा एकदा माढा लोकसभा मतदारसंघातून खासदारकीचे प्रबळ दावेदार असल्याने मोहिते पाटील यांची डोकेदुखी वाढली आहे. अशावेळी भाजपाने कट्टर मोहिते पाटील विरोधक उत्तमराव जानकर यांनाही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या जोडीला सोलापूर लोकसभा मतदारसंघातून दिल्लीला जाण्याची तयारी करायला सांगितल्याने आता जानकरांची गरूडझेप मोहिते पाटलांची झोप उडविल्याशिवाय राहणार नाही असे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.