पक्षविरोधी वागणाऱ्या शिवरत्नला आत्मपरीक्षणाची गरज
माढा (बंडखोर वृत्तसेवा): खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाणी अडवा पाणी जिरवा असा मूलमंत्र अनेक सभांमधून जनतेला दिला. मात्र शिवरत्नच्या सरंजामशाही वृत्तीच्या मोहिते पाटलांनी “आपल्यापुढे जाणाऱ्यांना अडवा आणि त्यांची जिरवा” हाच उपक्रम राबवला. ज्या पक्षात राहायचे त्याच पक्षातील नेतृत्वाला आव्हान द्यायचे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. त्यामुळे पक्षविरोधी वागणाऱ्या शिवरत्नला आत्मपरीक्षणाची गरज आहे असे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.
मोहिते पाटील ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील महाराष्ट्र राज्याचे युवा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष असताना बालगंधर्व पुणे येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात शरद पवार म्हणाले होते की, “महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न मला पडल्यानंतर भावी मुख्यमंत्री म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील नक्कीच महाराष्ट्राचे नेतृत्व करतील असा मला विश्वास वाटतो.” बालगंधर्व पुणे सभागृहात इतर युवा नेत्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील यांचा वारंवार उल्लेख केला आणि इथूनच राजकारणाला कलाटणी मिळाली. अत्यंत महत्त्वाकांक्षी अजितदादा पवारांनी मोहिते पाटलांचे पंख छाटायला सुरुवात केली. मोहोळचे राजन पाटील, माढ्याचे बबनराव शिंदे, पंढरपूरचे सुधाकरपंत परिचारक, मंगळवेढ्याचे लक्ष्मण ढोबळे या सर्व आमदारांना सूचना केल्या होत्या की, सोलापूर जिल्ह्यातील तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामे माझ्याकडे घेऊन यायची, कुणाकडेही जायचे नाही. सत्तेच्या सारीपाटावरील सोंगट्या आपल्या आक्रमक राजनितीने हलविणाऱ्या अजितदादांनी संजय शिंदेंच्या माध्यमातून उत्तमराव जानकर यांना राजकीय बळ दिले. उत्तमराव जानकर यांचा अश्व चौफेर उधळू लागला. रियल इस्टेटच्या माध्यमातून जानकरांनी आर्थिकदृष्ट्या भक्कमपणे पावले टाकायला सुरुवात केली. आज अजितदादांची प्रत्यक्ष ताकद जानकरांच्या पाठीशी आहे.
काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची गरुड बंगल्यावर झालेली बैठक माढा मतदारसंघात वादळी झाली आणि शिवरत्नच्या जिव्हारी लागली. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे बेरजेचे राजकारण खेळत आहेत. प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन नम्रतेने आपुलकीने माढा मतदारसंघातील माणसे जोडत आहेत. आरएसएसचा पक्ष म्हणजे भाजपा आहे. आज माळशिरस तालुक्यात गावागावात, घराघरात आरएसएस पोहोचलेला आहे. भविष्यकाळात मोहिते पाटलांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सत्ता पदावरून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न जरी केला तरी माळशिरसमधील आरएसएसचे केडर कार्यकर्ते भाजपा उमेदवाराला निवडून आणतील. कारण आरएसएसचे कार्यकर्ते विचार आणि शिस्त जगत असतात. त्यांच्यासाठी उमेदवार कोण हे महत्वाचे नसून विचारधारा महत्वाची असते. आमदार रामभाऊ सातपुते यांचे जनता दरबार गाजत आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे संघटन शिवरत्नच्या जिव्हारी लागत आहे. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, पंढरपूरचे प्रशांत परिचारक वेळापूरचे उत्तमराव जानकर यांची फार मोठी ताकद खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे उभी आहे हे आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांना माहिती असल्यामुळेच त्यांनी धूर्तपणे पाऊल टाकत धैर्यशील मोहिते पाटलांना लोकसभेसाठी पुढे केले आहे. त्यामुळे आम्ही विचार करतोय की, राज्यसभेवरील खासदारकीचा अनुभव पाठीशी असणारे रणजितसिंह मोहिते पाटील लोकसभेवर खासदार म्हणून जाण्यास का मागे सरतात? लहान भावाला का पुढे करतात. तर त्याचे उत्तर आहे की, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यामध्ये जिंकून येण्याचा आत्मविश्वास नाही. जे आत्मविश्वास हरत असतात, ते अर्धी लढाई इथेच हरत असतात.
यापूर्वी माळशिरस तालुक्याचे स्वर्गीय आमदार हनुमंतराव डोळस यांच्यावर 25/4 येथील कार्यक्रमात जनतेसमोर हात उचलण्याएवढी मजल मोहिते पाटलांची गेली होती. जनतेसमोर राखीव मतदारसंघातील आमदारावर हात उचलण्याएवढी मजल जात असेल, तर एकांतात शिवरत्नवर कोणत्या प्रकारची वागणूक दिली जात असेल? याची कल्पनाच न केलेली बरी! आज आमदार रामभाऊ सातपुते यांचे जनता दरबार होत असताना शिवरत्न शांत आहे. कारण रामभाऊंच्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे. आमदार रामभाऊ सातपुते हा एक विकासाचा चेहरा आहे. अठरापगड जातीचे नेतृत्व आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यापेक्षा आमदार रामभाऊ सातपुते यांचे कार्य दहा पटीने वाढलेले आहे. सत्ताधारी पक्षातील त्यांचे जेवढे नाव घेतात तेवढेच विरोधी पक्षातील नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या अंत:करणावरही रामभाऊ सातपुते राज्य करतात. कृष्णा भीमा विकास प्रकल्पाच्या नेतृत्वात आमदार रणजितसिंह यांचे चिरंजीव विश्वतेज यांचे नाव अध्यक्ष म्हणून पुढे आणले होते. परंतु प्रत्यक्षात शासनाची आज या प्रकल्पाला मान्यता मिळाल्यानंतर साताऱ्याचे महेश शिंदे यांचे नाव जाहीर झालेले आहे.
बारामतीच्या अजितदादांनी आसपासची माणसे खूप मोठी केली. आर्थिकदृष्ट्या मजबूत केली. अजितदादांनी मनी पॉवर, मॅन पॉवर निर्माण करून पॉलिटिक्स पॉवर निर्माण केली. शिवरत्नवरील मोहिते पाटलांच्या अध:पतनाचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या आसपास असणाऱ्या माने-पाटील, देशमुख परिवार कुजविणे. अकलूजमधील सर्वसामान्य कुटुंबातील हुशार माणसांना कुजविण्याचे काम केले, खच्चीकरण करण्याचे काम केले. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी विरोधी पक्षातील माणसांना वात्सल्याने, मायेने, आपुलकीने जोडून विरोधक जवळ केले. मात्र आज सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटलांच्या विचार वाटेवरून न जाता शिवरत्न आडवाटेने पाऊले टाकत आहे. कारण पुन्हा एकदा चमचे आणि खुश-मस्कऱ्यांचे पेव जोमाने वाढलेले आहे. पूर्वी जे राष्ट्रवादीत झाले ते आज भाजपात मोहिते पाटील करीत आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे खच्चीकरण करणे, कमीपणा आणताना भाजपाची बेअब्रू होत आहे. भाजपाला कमीपणा येत आहे. माढा मतदारसंघातील विरोधी पक्षातील उमेदवारांनी जो प्रचार करायचा तोच आज भाजपाच्या विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरुद्ध करणे हे धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांना अशोभनीय आहे. मोहिते पाटील विरोधकांची ताकद अप्रत्यक्षपणे वाढवून पक्षविरोधी कृत्य करीत आहेत. मात्र त्यांच्या या वागण्यामुळे एक दिवस नगरपालिका सुद्धा मोहिते पाटलांच्या हातात राहणार नाही असे अकलूजमधील काही नागरिकांतून बोलले जात आहे.